कव्हर स्टोरी : कठोर दणका; पण…

हेमंत महाजन (ब्रिगेडियर) 

दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानकडून होणारे छुपे हल्ले थांबले नाहीत. उलटपक्षी ते वाढत गेले. यावर भारतीय लष्कराने आम्ही आमच्या सोयीनुसार योग्य त्या पद्धतीने पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगितले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्‍वार्टरवर जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला तरी हा हल्ला त्याहूनही अधिक महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला आक्रमक कारवाईनेच उत्तर देणे गरजेचे असले तरी भारताने अन्य मार्गांचा अवलंब करून पाकिस्तानची कोंडी केली पाहिजे. 

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हाजिरा भागातील प्रशिक्षण केंद्रावर पुन्हा एकदा हल्ला करून ते उद्‌ध्वस्त केले आहे. हा हल्ला बहुतेक तोफखाना, मोटर्स आणि इतर मोठ्या शस्त्रांस्त्रांच्या मदतीने केला असावा. या हल्ल्याच्या आधी गेल्या आठवड्यात पाकिस्तानने पूंछ जिल्ह्यातील ब्रिगेड हेडक्वार्टरवर तोफगोळ्यांचा मारा केला होता. असा हल्ला प्रथमच करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून हाजिरा इथे असलेल्या पाकिस्तानच्या हाजिरा हेडक्‍वार्टरवर हल्ला करण्यात आला.
दोन वर्षांपूर्वी जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता तेव्हा भारतीय सैन्याने लक्ष्य केलेल्या जागा हे दहशतवाद्यांचे लॉंच पॅडस्‌ होते. लॉंच पॅड काय असतात? तर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांना नियंत्रण रेषेच्या जवळ आणले जाते. तिथून भारतीय सीमांची टेहळणी केली जाते. जिथून आत प्रवेश करायला रस्ता मिळेल तिथून घुसखोरीचा प्रयत्न करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्थात ही लॉंचपॅड एलओसीपासून अगदी जवळ म्हणजे एक ते दीड किलोमीटरवर असतात. मात्र पाकिस्तानी सैन्य एलओसीवर तैनात असते. ते पिकेट म्हणजे पोस्ट किंवा छोट्या किल्ल्यांच्या मदतीने सीमेचे रक्षण करत असतात. त्यांचे नेतृत्व बटालियन हेडक्‍वार्टर आणि जनरल हुद्याचा अधिकारी करतो. मात्र भारतीय लष्कराने आता जिथे हल्ला केला आहे ते ब्रिगेड हेडक्‍वार्टर हे बटालियन हेडक्‍वार्टरपेक्षाही वरिष्ठ आहे. म्हणजेच पाकिस्तानी सैन्याच्या एका वरिष्ठ दर्जाच्या मुख्यालयावर भारताने आघात केला.

गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांचा वापर करून काश्‍मीरमध्ये दहशतवाद पसरवत आहे. मात्र आता भारतीय सैन्याच्या दहशतवादविरोधी अभियानामुळे काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दहशतावाद्यांना सीमेवरच रोखण्यात आपल्या लष्कराला बऱ्याच प्रमाणात यश येत आहे. तथापि, या हिंसाचारामध्ये आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये आपले जवान शहीद होताहेत. मात्र पाकिस्तानी सैन्याचे फारसे नुकसान होत नाही. किंबहुना, त्यांना याची कसलीच झळ बसत नाही. कारण ते पडद्यामागे आहेत. पडद्यामागे असले तरी या सर्व दहशतवादाचे ते सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची गरज होतीच. यासाठीच भारताने आता धोरणात्मक बदल करून पाकिस्तानी सैन्याचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. ताजा हल्ला हे याचे एक ठळक उदाहरण आहे.

गेल्या काही महिन्यात भारताने सीमापार गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरामध्येही अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले असावेत, असा अंदाज आहे. ज्या ज्या वेळी पाकिस्तान भारताविरोधात मोठी कुरापत काढतो तेव्हा सर्जिकल स्ट्राईक किंवा हाजिरावरील हल्ला करण्याची गरज भारताला पडणार आहे. कारण पाकिस्तानला जशास तसे हीच भाषा समजते. त्यामुळे आगामी काळातही गरज पडेल तेव्हा तेव्हा पाकिस्तानला समजेल अशाच भाषेत उत्तर द्यावे लागेल. कारण आक्रमक कारवाई करून पाकिस्तानवर दबाव टाकल्याखेरीज हा देश वठणीवर येणार नाही. तसेच अशा प्रकारचा दणका दिल्यामुळे पाकिस्तानी सैन्याचीही त्यांच्या देशात नाचक्‍की होत असते. त्याच वेळी आपल्या देशातील नागरिकांमध्ये समाधानही व्यक्‍त केले जाते. पाकिस्तानच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद होत राहिले आणि आपण केवळ “धडा शिकवू’ची भाषा करत राहिलो तर नागरिकांचे, सैन्याचे मनोधैर्य खच्चीकरण होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अशा कारवाया गरजेच्याच असतात.

तथापि, केवळ तेवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. युद्धशास्राच्या नियमानुसार शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठीचे अन्य मार्गही अवलंबणे गरजेचे आहे. सध्या पाकिस्तान लष्कराची अवस्था वाईट आहे. सर्वसाधारण परिस्थितीत 85 टक्‍के पाकिस्तानी सैन्य हे पाक- भारत सीमेवर तैनात असते आणि केवळ 15 टक्‍के लष्कर अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असते. मात्र आता यामध्ये एक मोठा फरक झाला आहे. पाकिस्तानमध्ये कार्यरत असणाऱ्या तेहरिके ए तालिबान-अफगाणिस्तान या दहशतवादी संघटनेविरुद्धच्या “झर्ब ए अज्ब’ या अभियानांतर्गत वझरिस्तान, फाटा आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या भागात 50 टक्‍के पाकिस्तानी सैन्य व्यग्र आहे. एवढेच नव्हे तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी देखील या त्रासात भर घालत आहे.

चीन – पाकिस्तान आर्थिक परिक्षेत्रांतर्गत जो 4500 किलोमीटर मार्गाचा रस्ता पाकिस्तानातून चीनमध्ये जातो, त्याचे संरक्षण करण्यासाठी 15 ते 30 हजार पाकिस्तान लष्कर गुंतले आहे. दहशतवादी अभियानात सहभागी झाल्याने पाकिस्तान लष्कराचे बऱ्यापैकी नुकसान होत आहे. याशिवाय सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थितीही गंभीर आहे. त्यांना आर्थिक अरिष्टातून बाहेर येण्यासाठी 12 बिलियन डॉलर्सची गरज आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सौदी अरेबियामध्ये गेले; पण तिथून त्यांना 3 अब्ज डॉलर्स किमतीच्या तेलाची मदत मिळणार आहे. कर्जफेडीसाठी सौदी अरेबियाकडून फारशी मदत मिळालेली नाही. कारण सौदी अरेबियाची आर्थिक परिस्थितीच बिकट आहे. त्यांच्या देशातील जनतेवर होणारा खर्च हा त्यांच्या वार्षिक उत्पन्नाहून अधिक आहे. जनतेला सुखात ठेवण्यासाठी बचत केलेल्या पैशातून खर्च करावा लागत आहे. अशा प्रकारे इतर आखाती देश जे पाकिस्तानला मदत करू शकतील त्यांचीही आर्थिक परिस्थिती उत्तम नाहीये. परिणामी, पाकिस्तानची आर्थिक कोंडी झाली आहे.

सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान 7 दिवस चीनच्या दौऱ्यावर आहेत आणि चीनकडूनही ते अशाच प्रकारची मदत मागणार आहे. मात्र भारताच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे चीनची अर्थव्यवस्थाही बिकट अवस्थेतूनच जात आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. आज चीनी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग कमी झाला आहे. चीनने वेगवेगळ्या देशांमध्ये वन बेल्ट वन रोड हा व्यापारासाठी रस्ते बांधण्याचा जो कार्यक्रम सुरु केला होता त्यामध्येही त्यांना नुकसानच होत आहे. आपण पैसा कुठल्याही कामासाठी खर्च केला तर काही कालावधीनंतर त्यातून परतावा मिळणे गरजेचे आहे. ते चीनला मिळत नाही. म्हणूनच पाकिस्तानला मदत करण्याची चीनची क्षमता संशयास्पद आहे. चीन नेमकी किती मदत करु शकते हे येत्या काळात स्पष्ट होईल. त्यामुळे पाकिस्तानसमोर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घेण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही.

पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा महागाईचा दर वाढत आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग कमी झाला आहे. गेल्या काही वर्षात 13 वेळा पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेऊन ते फेडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यासाठी जे उपाय करणे आवश्‍यक आहे ते केलेले नाहीत. उलट जास्त कर्ज घेऊन हा देश आणखी कर्जबाजारी होण्याच्या दिशेने जात आहे. पाकिस्तानी बजेटमध्ये सैन्यावर होणारा खर्च आणि कर्जफेडीकरिता लागणारा पैसा मिळून पाकिस्तानच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. थोडक्‍यात कर्ज घेऊन पाकिस्तानी सैन्याला पोसले जाते आहे. आर्थिक दृष्ट्या हे चुकीचेच आहे. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवायचा असेल तर पाकिस्तानकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे सैन्यावर होणारा खर्च कमी करणे. त्याचबरोबर भरमसाठ आण्विक शस्त्रास्त्रांच्या व्यवस्थापनाचा खर्चही अफाट आहे. आता नव्याने ही शस्त्रास्त्रे निर्माण कऱणे पाकिस्तानला शक्‍य नाही. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आणि सैन्याची अवस्था गंभीर असल्याने आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अमेरिका यांच्या मदतीने पाकिस्तानवर दबाव वाढवणे गरजेचे आहे.

जेणेकरून पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सोडून देत अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करेल. पाकिस्तान असा विचार करेल का, सैन्याची ताकद कमी करेल का, त्यांच्याकडील अणुबॉम्ब कमी होतील का, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे येता काळच देऊ शकेल. परंतु भारतासमोर एक मोठी संधी आहे की पाकिस्तानवर आर्थिक दबाव टाकून आपण त्यांच्या सैन्याचे पाकिस्तानसाठी असलेले महत्त्व कमी कऱण्यास हातभार लावू शकतो. पाकिस्तान सर्जिकल स्ट्राईकसारख्या उपायांनी धडा घेईल की वाटाघाटींनी? या प्रश्‍नाचे उत्तर सोपे आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पोसणे, खतपाणी घालणे थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही वाटाघाटी होऊ शकत नाहीत. फायनान्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्स ही संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची संस्था आहे. ती जगामध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांवर लक्ष ठेवून असते. त्यांचे पाकिस्तानवर बारीक लक्ष आहे.

पुढच्या फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून घोषित करायचे का यावर निर्णय घेतील. म्हणूनच भारताला खूप चांगली संधी आली आहे. त्याचा पुरेपूर वापर करून आर्थिक आणि मुत्सद्दी दबाव वाढवून पाकिस्तानची भारताविरोधातील दहशतवादी कारवाया करण्याची क्षमता नक्‍कीच कमी करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)