कवठे येमाईत पिण्याचे पाण्याचे हाल

विद्युतपुरवठ्यात कपात केल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांत संताप

सविंदणे -शिरूर तालुक्‍यातील कवठे येमाई येथील कमी केलेला विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कवठे येमाई ग्रामपंचायत व पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी शिरूरचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

सध्या डिंभे धरणातून घोडनदीला, उजव्या कॅनॉलला पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले आहे. सविंदणे, कवठे येमाई, टाकळी हाजी, आमदाबाद, आण्णापूर, शिरूर या भागात थ्री फेज लाईट दोनच तास सोडली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेजारी आंबेगाव तालुक्‍याला सहा तास लाईट आणि शिरूर तालुक्‍याला फक्त दोन तास लाईट हा भेदभाव कशासाठी, हा रोखठोक प्रश्न गणेश जामदार यांनी तहसीलदार गुरु बिराजदार यांना विचारला.

दोन तासच विद्युत पुरवठा असल्यामुळे परिसरातील ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍या पूर्ण क्षमतेने भरता येत नसल्यामुळे पुरेसे पाणी नागरिकांना मिळत नाही. कवठेयमाई येथील पाणी पुरवठा योजना फत्तेश्वर बंधाऱ्यावर असून यावरून गावातील ग्रामपंचायतीला विहीरीत पाणीसाठा करून तो गावातील पाण्याच्या टाकीत सोडून गावाला पाणी पुरवठा केला जातो. पण शिरूर तालुक्‍यातील घोडनदी तीरावरील गावांमध्ये भविष्यात उद्‌भवणाऱ्या पाणी टंचाईमुळे नदीपात्रातील उपसा कमी व्हावा, या हेतूने फक्त दोन तासच वीज पुरवठा चालू आहे; परंतु यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. बंधाऱ्याहून जे पाणी पिण्यासाठी उपसून गावातील टाक्‍या भरल्या जातात, त्या दोन तासांत भरत नसल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तरी वीज पुरवठा दोन तास न करता चार ते पाच तास करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, कवठे यमाई ग्रामपंचायत सरपंच अरूण मुंजाळ, आमदाबादचे चेअरमन आबासाहेब जाधव, माजी संघटक गणेश जामदार, सविंदणेचे हनुमंत लंघे, दत्तात्रय गायकवाड, डॉ. कुंडलिक शितोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

  • पाच तास थ्रीफेज पुरवठा हवा
    1. फक्त दोन तास थ्री फेज विद्युत पुरवठा असल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्या असून नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. तहसीलदार गुरु बिराजदार यांना परिस्थितीबाबत सांगून 5 तास विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
    2. महावितरण विभागाला पाच तास थ्री फेज विद्युत पुरवठा सुरळीत करण्याविषयी सूचना दिल्या असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन तहसिलदार गुरू बिराजदार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)