कवठे येमाई-पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या हिलाल मळ्यातील ठाकरवस्तीत आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास एका ठाकर कुटुंबाचे घर आगीत जळून भस्मसात झाले आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हातावरचे पोट असणाऱ्या संजय जाधव यांचे मातीच्या भिंतीवर असलेले पाचटाचे आच्छादन जळून घरात पडल्याने आतील सर्व साहित्य, भांडे, धान्य, पैसे व इतर कागदपत्रे, कपडे जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सरपंच दीपक रत्नपारखी, कामगार तलाठी कोळगे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंडलिक शितोळे, ग्रामपंचायत सदस्य रामदास इचके, ग्रामविकास अधिकारी मिलिंद महाले, पोलीस पाटील गणेश पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत या ठाकर कुटुंबाला धीर दिला. घटनेचा पंचनामा तलाठी कोळगे यांनी केला असून या जळीतात सुमारे साठ हजार रुपयांचे एकूण नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान सरपंच दीपक रत्नपारखी व ग्रामस्थांनी घटनेचे गाम्भीर्य व या कुटुंबावर ओढवलेली अत्यंत बिकट परिस्थिती पाहून त्यांना तातडीने धान्य, घरगुती शिधा, किराणा साहित्य व कपडे उपलब्ध करून देत माणुसकीचे दर्शन घडविले. तसेच रोख स्वरूपात पाच हजार रुपये तातडीची मदत या ठाकर कुटुंबाला ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली. संजय जाधव या ठाकर समाजातील कुटुंबात दोन मुले शालेय शिक्षण घेत आहेत. आई, आजीसह दोन्ही मुले घरासमोरच झोपलेली होती. आगीची झळ लागताच सर्वजण बाजूला पळाल्याने त्यांना कुठलीही हानी पोहचली नाही; परंतु घरातील सर्व साहित्य जळाल्याने हे कुटुंबच बेघर झाल्याचे दिसून आले. शासन पातळीवरून या कुटुंबाला तातडीने सर्व ती मदत मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा