कवठे गाव सेवा रस्त्यापासून वंचित

कवठे ः केवळ मुरुम व मातीचा भराव टाकून बनवण्यात आलेला सेवारस्ता.

मुरुम अन्‌ मातीचा रस्ता उठलाय ग्रामस्थांच्या जीवावर
भुईंज, दि. 24 (वार्ताहर) – थोर स्वातंत्र्य सेनानी कै. किसन वीर आबा यांचे गाव असलेल्या कवठे गावाला रस्ते विकास महामंडळ आणि रिलायन्स कंपनीने सेवारस्त्यापासून वंचित ठेवले आहे. याठिकाणी ग्रामस्थांना महामार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपुल बांधण्यात आला परंतु, महामार्गाच्याकडेला सेवारस्ताच बांधलेला नाही. केवळ मुरुम आणि मातीचा भराव टाकून पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. मात्र, मुरुम अन्‌ मातीचा हा रस्ता ग्रामस्थांच्या जीवावर उठला आहे.
वाई तालुक्‍यातील कवठे या गावातून ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्ग गेला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुला लोकवस्ती आहे. याशिवाय ग्रामस्थांच्या शेतजमिनीदेखील आहेत. ग्रामस्थांच्या सोयीसाठी याठिकाणी उड्डाणपुल बांधण्यात आला आहे. मात्र, महामार्गाच्या बाजुला सेवारस्ता बांधण्यात आला नाही. याठिकाणी केवळ मुरुम आणि मातीचा ढिगारा टाकून कसाबसा सेवारस्त्याला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये याठिकाणी वाहने घसरत आहे. अनेक दुचाकीस्वारांना तर अपघाताला सामोरे जावे लागले आहे. एकंदरी हा तात्पुरता रस्ता कवठे ग्रामस्थांसाठी जीवघेणा ठरत आहेत.
रस्ते विकास महामंडळ आणि रिलायन्स कंपनीच्या नकाशातील आराखड्यात नियोजीत सेवारस्ता असतानासुध्दा त्याचे काम गेली अनेक वर्षापासून रिलायंस कंपनीने केले नसल्याने कवठे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी अनेकदा रस्तारोकोसारखी आंदोलने करुन रस्ते विकास महा मंडळाला आणि रिलायन्स कंपनीला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती आमदार मकरद पाटील यांना मिळताच त्यांनी अडीच वर्षापुर्वी कवठे ग्रमस्थांची तातडीने बैठक घेऊन त्यांच्या व्यथा जाणुन घेतल्या. त्यावर तातडीने उपाय योजना करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसह रिलायन्स कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बैठकीत किसन वीर आबांचा आत्ता उभा असणारा पुतळा जसाचा तसा 10 फुट मागे घेऊन सेवारस्ता करुन देण्याचे गावकऱ्यांसमोर ठरले होते. पण आमदारांसमोर दिलेला शब्द आजपर्यंत न पाळल्याने कवठे ग्रामस्थ अद्यापही सेवारस्त्याच्या प्रतिक्षेतच आहेत. सेवारस्ता नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून ग्रामस्थांमधून संतापाची लाट उसळू लागली आहे. त्यातच रिलायन्स कंपनीची मुदत संपल्याने ती कोणत्याही क्षणी आपला गाशा गुंडाळून जाण्याची शक्‍यता वर्तविली जात असल्याने सेवा रस्त्याचे काम कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)