कवठे-केंजळ योजनेचे पाणी सोडण्याचे आदेश

दै. प्रभातच्या पाठपुराव्याला यश
तालुक्‍याच्या पूर्व भागातील शिवारांमध्ये पाणी पोहोचणार

वाई – धोम धरणाच्या उजव्या कालव्यावरील कवठे-केंजळ योजनेवर तब्बल शंभर कोटी खर्च होवूनही ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू होत नव्हती. त्यामुळे दै. प्रभातने “योजनेचे भवितव्य अंधारात’ या मथळ्याखाली सत्य उजेडात आणले होते. या पाठपुराव्याला यश आले आहे. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष ना. बानुगडे-पाटील यांनी धोम पाटबंधारे खात्याला त्वरित योजनेचे काम पूर्ण झालेल्या गावातील शेतीला पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी सोळा गावातील शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. थोड्याच दिवसात उर्वरित गावांना पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्यांकडून जाहीर करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, ही योजना पूर्ण ताकदीने पूर्ण करणार असल्याची ग्वाही ना. बानुगडे-पाटील यांनी विराज शिंदे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दिली होती. कवठे-केंजळ योजना सुरू झाल्यादिवशी कवठे परिसरात लिकेज झाल्याने या भागात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. तेव्हापासून करोडो रुपये खर्च होवूनही गळतीचे शुक्‍लकाष्ठ योजनेच्या पाठीमागून हटले नव्हते. गतवर्षी कवठे पाईप लाईनला फार मोठी गळती लागली होती. स्थानिक नागरिकांनी सहकार्य करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला होता.

वाई तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या कवठे-केंजळ योजनेवर चार हजार सातशे ऐंशी हेक्‍टर जमिनीचे भवितव्य अवलंबून आहे. योजनेच्या पाण्यावर 27 गावातील शेतजमीन ओलिताखाली येणार आहे, परंतु सध्या सोळा गावातील जमिनीला व परिसरातील बंधारे भरण्यासाठी या योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. ही योजना सुरळीत करण्याची ग्वाही संबधित विभागाने दिल्यानेच कवठे गावाने गावाजवळील ओढ्यावर अकरा बंधारे बांधले आहेत.
योजनेचे वीज बिल परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवली. तरीही स्थानिक राजकीय पदाधिकारी शेतकऱ्यांकडून अवैधरित्या पावत्या वसूल करत आहेत.

त्याविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या आहेत. पाटबंधारे खात्यानेही संबंधित ग्रामपंचायतीना थकीत पाणीपट्टी भरण्यासंदर्भात नोटीसा काढण्यात आलेल्या आहेत. थकीत पाणी पट्टी भरल्याशिवाय ही योजना चालू करण्यात येणार नसल्याचेही संबधित विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु कृष्णा खोरे उपाध्यक्षांच्या रेट्यांमुळे व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी 81% लाईटबिल शासन भरणार असल्याचे कृष्णा खोरेच्या उपाध्यक्षांनी नुकतेच जाहीर केले आहे. उर्वरित 19% लाईट बिल संबंधित ग्रामपंचायतींनी वेळेत भरल्यास योजना व्यवस्थित सुरू राहणार आहे.

वाई तालुक्‍यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह आपण कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पुढेही कवठे-केंजळ संघर्ष समिती स्थापन करून ही योजना या भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असून ती कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

विराज शिंदे
युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)