कल्याण महामार्गावर 14 महिन्यांत 24 जणांचा बळी

अपघातांना चालकच जबाबदार
महामार्ग वा रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची जबाबदारी ही शेवटी चालकाचीच असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक दुसऱ्या गाडीचा असो वा कोणीही. तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्याकडे कोणीही उठतो आणि चालक होतो. महामार्गावर गाडी चालविणे कौशल्याचे काम आहे. अपघातांची संख्या पाहाता येणाऱ्या काळात चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्‍यकता आहे. परंतु फारच थोड्या कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देतात. 90 टक्‍के चालक हे प्रशिक्षणाविनाच महामार्गावर वाहने चालवून मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. यामध्ये चारचाकी वाहन धारकांचे प्रमाण जास्त आहे.

रामदास सांगळे

वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांत वाढ
आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 29 अपघात

अणे – नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मागील 14 महिन्यांत 24 जणांनी आपला जीव या महामार्गावर अपघातांमध्ये गमावला आहे. तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा रस्ता चांगला झाल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहिले नाही. तसेच ठिकठिकाणी गतीरोधक नसल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

नगर-कल्याण महामार्गावर आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत (पेमदरा ते दांगटवाडी) या तीस किलोमीटरच्या अंतरात 1 जानेवारी 2017 ते 31 मार्च 2018 पर्यंत एकूण 29 अपघात झाले आहेत. यामध्ये सहा गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. दुखापती शिवाय पाच अपघात झाले आहेत. यात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 22 पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी 15 झाले आहेत. यात अकरा पुरुष व चार स्रियांचा समावेश आहे. दोन किरकोळ अपघात झाले असून यात दोन पुरुष जखमी झाले आहेत, अशी माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर कुलकर्णी यांनी दिली.

 

अणे घाट उतरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. गुळंवाडी जवळ रस्त्याला खड्डे पडल्याने 4 अपघात झाले होते. खड्डे बुजले असले तरी वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. वाहनांच्या प्रचंड वेगामुळे समर्थ कॉलेज (बांगरवाडी) जवळ अपघात जास्त होतात. कॉलेज जवळ गतिरोधक नाही त्यामुळे वाहणांचा वेग कमी होत नाही. येथेही अपघात मोठ्या संख्येने होतात. बेल्हे बायपास जवळ धोकादायक वळण आहे. समोरून आलेले वाहन पटकन दिसत नाही. येथे शाळा व कॉलेज जवळच असल्याने विद्यार्थ्यांची येथे वर्दळ असते. गतिरोधक असल्याने वाहनांचा वेग कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. अणे येथील सरदार पटेल हायस्कूल जवळ शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याने महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.

मोबाईच्या वापराने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली पाहिजे. आपल्या वाहनांच्या वेगावर मर्यादा असावी. रस्ता सुरक्षा नियमांचे वाहन धारकांना नीट पालन केल्याने अपघातांचे प्रमाण नक्‍कीच कमी होईल.
– शरद सोनवणे, आमदार, जुन्नर

वाहन चालकांनी धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नये. रस्त्यात कुठेही वाहन उभे करू नये. वेगावर नियंत्रण असावे, चारचाकी वाहन चालकाने व प्रवाशाने सीट बेल्टचा वापर करावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. मद्यपान करून वाहन चालवू नये. रस्ते नियम पायदळी तुडवले जात असल्यास कडक कारवाई केली जाईल.
– मारुती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक

महामार्गावर नियमाने गतिरोधक नसतात. मात्र, ग्रामीण भागामध्ये शाळा महाविद्यालय महामार्गाच्या जवळ आहे. ज्या ठिकाणी मानव वस्ती आहे, शाळा आहे, अशा ठिकाणी गतिरोधक आवश्‍यक आहे. महामार्गावर वळण नसावे, कारण वळणे असल्यास समोरील वाहने दिसत नसल्याने अपघात वाढले. तसेच बायपासला सर्कल हवेत. तरच अपघात कमी होतील. – गणेश चोरे, ग्रामस्थ , बेल्हे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)