कल्याणमध्ये विकास केंद्रासाठी भूमिपुत्रांना भागिदार करून घेणार

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


पायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटींची तरतूद

 

मुंबई – नोकरी-धंद्यासाठी मुंबईवर अवलंबून असलेल्या चाकरमान्यांना आता नवीन पर्याय मिळणार आहे. बांद्रा कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याणमध्ये ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. हे ग्रोथ सेंटर कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात असून स्थानिक लोकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांना विकासात भागिदार बनवून घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरातील 27 गावांच्या परिसरात विकास केंद्र राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, संघर्ष समितीचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, मु. म. प्र. वि. प्राधिकरणचे महानगर आयुक्त यु पी एस मदान, अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

-Ads-

स्थानिकांची मागणी असलेल्या 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत शासन सकारात्मक असून याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कल्याण ग्रोथ सेंटर विकसित करताना बांद्रा कुर्ला संकुलाच्या धर्तीवर आधी कल्याण येथे रस्ते व इतर पायाभूत सुविधा उभारण्यात येतील, स्थानिकांनी सहकार्य केल्यास त्याबाबतची जागा निश्‍चिती करण्यात येईल. यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एम एम आर डी ए)मार्फत सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे, असे सांगतानाच हे रस्ते तयार झाल्यास तिथल्या जमिनीच्या किंमती तीन पटीने वाढणार आहेत, आणि भविष्यात दहा पट वाढ निश्‍चित होईल. त्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भू संपादनाच्या कायद्यात आता बदल झाले आहेत. यात शासनाची जबाबदारी वाढली आहे. राज्य शासनाने विविध विकास योजनांसाठी गेल्या तीन वर्षात जेवढे भू संपादन केले ते स्थानिकांच्या संमतीने केले आहे. लोकांना यात आपला फायदा दिसला तर लोक स्वतःहून सहभागी होतात. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणारा आहे. त्याच्यासाठी सोयी सुविधा आणि रोजगार निर्माण करणारा आहे. या परिसरात असलेल्या इतर प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष भूमिपुत्रांना लाभ मिळालेला नाही, मात्र आता या योजनेतून शंभर टक्के फायदा हा स्थानिक भूमिपुत्रांना होणार आहे.

या प्रकल्पासाठी लागणारी पायाभूत सुविधांची उभारणी ही तीन ते चार वर्षात पूर्ण होईल आणि येत्या सात ते आठ वर्षात इथे प्रत्यक्ष गुंतवणूक यायला सुरुवात होइल. प्रकल्प सुरु करण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे, आपल्या सर्व सूचनांवर सकारात्मक विचार करुन पारदर्शकपणे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)