कलेचे कातडे !…..(प्रभात ब्लॉग)

तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर देशात जो आगडोंब उसळला होता, तो या देशाचं समाजमन जीवंत असल्याचं प्रतिक ठरलं, अर्थातच त्यामुळे आणीबाणीची जबर किंमत इंदिरा गांधी यांना मोजावी लागली. त्यांच्यानंतर कॉंग्रेसच्या प्रत्येक सरकारच्या मानगुटीवर आणीबाणीचं भूत अदृश्‍यरित्या वावरतच राहिलं. गेल्या काही वर्षांपासून हे बाटलीत बंद असणारं भूत मधूर भांडारकर या दिग्दर्शकानं बाहेर काढलंय.

कॉंग्रेस कार्यकर्ते या चित्रपटाला ठिकठिकाणी विरोध करुन आपल्या अकलेचे दिवाळे काढत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अथवा कलाकृतीला विरोध करणारी सेल्फ-सेन्सॉरशीप या देशात यापुर्वी उजव्या संघटनांच्या हाती होती. ती आता कॉंग्रेससारख्या मध्यममार्गी संघटनांच्या हाती जातेय का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कॉंग्रेसने हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध न करता उलट चित्रपटाच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे धाडस दाखविले पाहिजे.

खरेतर आणीबाणीसारख्या देशाला वेठीस धरणाऱ्या आणि लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या या कालखंडाचं खरं रुप लोकांसमोर येणं आवश्‍यक आहेच. या काळात लोकशाही समर्थपणे जीवंत ठेवण्यासाठी जनतेने जो लढा दिला तो कदाचित स्वातंत्र्यलढ्याच्या तोडीचा होता. त्यामुळे आणीबाणी ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई ठरली. या लढ्यातील खलनायिका फक्त तत्कालिन इंदिरा गांधी होत्या असं नाही, तर परिस्थिती विरोधात जात असताना सत्ताकेंद्र ताब्यात ठेवण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षाही तेवढ्याच जबाबदार होत्या. त्या केवळ इंदिरा गांधी यांच्यापुरत्याच मर्यादित होत्या असे नाही तर तत्कालिन नोकरशहा आणि काही राजकारण्यांनाही ते हवं होतं.

इंदू सरकार या चित्रपटाच्या निमित्ताने फक्त काही प्रश्न मनात येतात त्याची उत्तरे कदाचित मिळणारही नाहीत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ते समाजमाध्यमांतून विचारणेही आवश्‍यक आहेच. यातील पहिला प्रश्न म्हणजे, खुद्द दिग्दर्शक मधूर भांडारकर, अभिनेता अनुपम खेर, निर्माता भरत शहा ही मंडळी कट्टर कॉंग्रेसविरोधक किंवा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक समर्थक म्हणून ओळखली जातात. अनुपम खेर यांच्या पत्नी तर भाजपच्या खासदार आहेत. बरेचदा कॉंग्रेसवर अगदी टोकाची टिका-टिपण्णी करताना ते मा. पंप्र महोदयांचे तोंडभरुन कौतुकही करीत असतात. हिंदू राष्ट्रवादाचा कट्टर पुरस्कारही ते करतात. त्यामुळे या चित्रपटात विपर्यस्त मांडणी झाली नाही असं छातीठोकपणे म्हणता येऊ शकेल ? दुसरा प्रश्न असा की, आणीबाणीच्या विरोधात केवळ जनसंघ नाही तर इतरही मोठ्या संघटना, पक्ष आणि व्यक्ती ठामपणे उभ्या होत्या. या कालखंडात जनसमान्यातून मोठ्या प्रमाणावर नेतृत्त्व उभे राहिले. त्यांच्या भूमिकेला या चित्रपटात न्याय देण्यात आला असेल काय ?

तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, जी हिम्मत मधूर भांडाकरकर यांनी इंदू सरकार चित्रपट सादर करुन दाखविली आहे, तेवढीच हिम्मत गुजरातमधील नरोडा-पाटीया, बिल्कीस बानो, बेस्ट बेकरी आदी घटनांचे सादरीकरण करुन दाखवतील का ? अर्थातच तिस-या प्रश्नाचे उत्तर देणे मधूर भांडारकरांना शक्‍य होणार नाही. त्यामुळे भांडारकरांनाही आवाहन आहे की, कलाकार म्हणून आपण जे सादर कराल त्याचे अवश्‍य कौतुक आणि स्वागत आहेच पण कार्यकर्ता म्हणून एखादी गोष्ट सादर करणार असाल तर कृपया तेंव्हा कलेचे कातडे पांघरु नका, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गुळणी तुम्हाला फोडावी लागणार नाही.

 

– गिरीश लता पंढरीनाथ

( लेखक ज्येष्ठ राजकीय पत्रकार असून सध्या दै . प्रभातमध्ये मुख्य उपसंपादक (शहर आवृत्ती) म्हणून कार्यरत आहेत. दीड दशकांच्या पत्रकारितेत त्यांनी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. लेखकाचा ई मेल  – girishawaghade@eprabhat.net )

( वरील लेखात व्यक्त केलेली मते ही लेखकाची स्वतःची मते आहेत. त्याच्याशी दै. प्रभात सहमत असेलच असे नाही. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)