कला व शारीरिक शिक्षण विषय शिक्षकांचा मोर्चा

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी)- राज्यातील प्रत्येक शाळेत असलेल्या कला व शारीरिक शिक्षण या विषयांच्या चार तासिका कमी केल्याच्या निषेधार्थ
राज्यस्तरीय कला व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षण आयुक्‍त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी सुमारे 5 हजार कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला व शारीरिक शिक्षण विषय महत्त्वपूर्ण आहेत. गेल्या चाळीस वर्षापासून कला व शारीरिक शिक्षण विषय आठवड्यातून प्रत्येकी चार तासिका होत्या. मात्र शालेय शिक्षण विभागाने 28 एप्रिल रोजी या विषयाच्या तासिका कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या विषयाच्या दोन तासिका होणार असल्याने कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या निर्णयाने या विषयाचे शिक्षकही अतिरिक्‍त होणार असून, त्यांची नोकरीही संकटात सापडली आहे.

कला व शारीरिक शिक्षण हे विषय या दोन तासिकांमध्ये शिकवणे अवघड आहे. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करण्यासाठी राज्यातील शिक्षकांनी 15 ऑगस्ट चौकापासून शिक्षण आयुक्‍त कार्यालयापर्यंत महामोर्चा काढला. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, सुधीर तांबे, दत्ता सावंत, श्रीकांत देशपांडे व माजी आमदार भगवान सांळुखे, संघटनेचे पी. आर. पाटील, शरदचंद्र धारूररकर यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी येत्या पावसाळी अधिवेशनात कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका कमी केल्याचा मुद्दा तारांकित प्रश्‍नाद्वारे उपस्थित केला जाईल. हे परिपत्रक रद्द करण्यासाठी शिक्षण विभागाला भाग पाडू, असे आश्‍वासन शिक्षक आमदारांनी दिले. याबाबतचे निवेदन संघटनेने माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांना दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)