कलमदान

“कलम’ हा खरं तर फार्सी शब्द, पण आपल्या संस्कृतीत तो चपखल बसला. “कलमदान’ या शब्दाला किती वजन आहे ना! थोडा विचार करा ही कलम नसती तर आपलं आयुष्य कसं झालं असतं? लेखन, वाचन याला आपण कदाचित कायमचेच मुकलो असतो. अगदी अक्षरशत्रूच झालो असतो म्हणा ना!

डॉ. नीलम ताटके 

“कलमदान’ यात शाई ठेवण्यासाठी दौत व बोरू, टाक इ. ठेवण्यासाठी लांब नक्षीदार पेट्या असत. दौतीत शाई ठेवली असे व ती शाई वाळू नये म्हणून दौतीला झाकण असे. पूर्वी जेव्हा छपाई कला नव्हती तेव्हा या बोरू, टाक याने बखरी लिहिल्या गेल्या, धार्मिक ग्रंथ लिहिले गेले आणि ही हस्तलिखितेच अक्षरवाङमय बनली. यांनी आपलं अवघं आयुष्यच समृद्ध केलं. आपल्याला इतिहास कळला, उपनिषदं कळली.

त्यावेळी घरात शाईची एक मोठी बाटलीच आणून ठेवली जाई कारण बोरू किंवा टाकात पेनसारखी शाई भरता येत नसे. बरं लिहितानासुद्धा किती काळजी घ्यावी लागे, शाईचे थेंब लिहिताना कागदावर पडू नयेत, कुठलंच अक्षर फिकट येऊ नये; लिहिता लिहिता धक्का लागून दौत कलंडू नये आणि जे लिहिलं जाईल ते दीर्घकाळ टिकलं पाहिजे. त्यामुळे या ग्रंथांचे आकारही खूप मोठे असायचे.

अक्षर वळणदार व्हावे म्हणून विद्यार्थ्यांना मुद्दाम बोरूने लिहायला लावत असत. कारण शालेय जीवनात अक्षराला चांगले वळण की ते कायमचे सुवाच्च होत असे. अशा सुवाच्च अक्षरातले लिखाण कोणाला वाचायला आवडणार नाही. लिखाणासाठी बहुदा काळी शाईच वापरली जायची. या दौत-टाकाची जागाही ठरलेली असाययी बैठकीत ठेवलेल्या डेस्कसारख्या छोट्या टेबलवर किंवा घरात लहान मुलं असतील तर बैठकीच्या खोलीत असलेल्या कोनाड्यात असायची. शेतीचे हिशेब, सावकारी हिशेब, उधारीच्या चोपड्या, महत्त्वाचे करार-मदारही दौत टाकाने लिहिले जायचे.

त्यानंतर शाईची पेनं आली आणि लिहिणं खूप सुलभ झालं, कारण पेन कुठेही बरोबर नेता येऊ लागलं. शालेय विद्यार्थीही पेन वापरू लागले. परंतु त्यामुळे कपड्याला डाग पडणे, पेनची निब खराब होणे ऐन परीक्षेच्या वेळी असे प्रश्‍न यायला लागले. शाईची पेनं जड वाटू लागली आणि त्याची जागा बॉलपेनने घेतली. बॉल पेनं हलकी, शाई भरायची झंझट नाही त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. शाईचे रंगही लाल, हिरवे, निळे, काळे! तरीही आजच्या काळात शाईचे पेन अजिबात न वापरणारी व्यक्ती नाही असं नाही बरं का! काहीजणांना फक्त शाईच्या पेननेच सही करायला आवडते, आणि त्या व्यक्ती आपलं हे वैशिष्ट्य मानतात. अशी ही कलमदानाची कथा!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)