कलंद: आडला स्वाभिमान . .

उत्तम पिंगळे

पुलंनी “नारायण’मध्ये लिहून ठेवले आहे की, मुलगा वा मुलगी सरळ वळणाचे कसे असू शकतात? कारण वळण म्हटलं ते वाकडे असणारच. तर विषय असा आहे की वळण. जसे एखादी गोष्ट अचानक वळण घेते. म्हणजेच अपेक्षित शेवट वाटत असताना अचानक वेगळे वळण घेऊन अचंबित करते. राजकारण ही अगदी तसेच आहे येथे कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो अचानक एखादा पक्ष किंवा एखादा नेता कधी कुठे वळण घेईल हे त्या नेत्यालाही वा त्या पक्षालाही माहीत नसेल. राजकारण इतके अस्थिर झालेले आहे तसेच धक्के देणारे झालेले आहे.

अलीकडेच दस्तूरखुद्द साहेब बारामतीकर थेट तळकोकणात गेले. आता यावर अनेक चर्चांना उधाण आलेले आहे. कोकणच्या स्वाभिमान म्हणवणाऱ्याच्या भेटीस गेले. आता ते स्वतःहून गेले की त्यांना तेथे बोलवले गेले हा एक वेगळा विषय आहे. पण एक नक्की की कोकणच्या स्वाभिमानाच्या पायाखालची वाळू मात्र सरकू लागलेली आहे. आणि हे नेमके निवडणुका जवळ आल्यावर त्यांच्या लक्षात आलेले आहे.

हिंदूहृदयसम्राटांच्या तालमीत तयार झालेले व जय भवानी, जय शिवाजी म्हणणारे अचानक जेव्हा जय महाराष्ट्र करून वेगळे झाले ते कुणालाच कळले नाही. मग एकदम उधोजीराजेंना धडा शिकवायचाच असा जणू विडाच उचलला. मग ज्यांच्या सतत विरोधात असणारे त्यांच्याशीच हातमिळवणी करून विरोधी पक्षनेतेही बनले. तेथे गेल्यावर त्यांना वाटले होते की महाराष्ट्राची गादी पुन्हा त्यांच्या हातीच सोपवण्यात येईल. पण महाराष्ट्रातील ‘हाताचे’ नेते तेवढे ‘हाताबाहेर’ गेलेत की एकवेळ स्वतःला नेतेपद मिळाले नाही तरी चालेल पण दुसऱ्याला मिळणारे नेतेपद कसे घालवता येईल यात एकदम माहीर आहेत. याचा प्रत्यय या मुरब्बी नेत्यास समजायला थोडा वेळ गेला. हाताकडे होऊन हाती काहीच लागत नाही हे पाहून शेवटी त्यांनी महाराष्ट्राचा ‘स्वाभिमान’ जागा करायचे ठरवले.अर्थात, अलीकडच्या राजकारणात स्वाभिमान हा शब्द औषधापुरताच उरलेला आहे.कोणत्याही नाराज व्यक्तीला तो कधीही येऊ शकतो ही परिस्थिती आहे.

स्वाभिमानाने मग काही आंदोलने करावयास सुरुवात केली. इकडे महाराष्ट्राच्या सरदाराला त्यांचे पाठीराखे सत्तेमध्ये राहून बेजार करत होते. अशा वेळी हा ‘स्वाभिमानी’ त्यांच्या हाती लागला. मग कमळाबाईने त्यांना थेट राज्यसभेवर पाठविले. उधोजीरावांना थोडा धाक राहावा अशासाठी जरी केले असले तरी त्यानंतर अलीकडे बरेच पाणी वाहून गेले आहे. कमळाबाई व उधोजीरावांना आता समजून आले आहे ही आपल्याला एकत्रितपणे लढावे लागेल त्यात दोघांचाही फायदा आहे.

तुझं माझं जमेना व तुझ्याशिवाय करमेना अशी परिस्थिती आहे व दोघांना आता मान्य झालेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवर एनडीए आता आपला सहकारी पक्ष गमावू शकत नाही. त्यामुळेच स्वाभिमान आता एका कोपऱ्यात पडला आहे. मराठा आरक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावून आता त्याला स्वतःलाच काय करावे ये समजत नाही. अशा वेळी ते तळकोकणात एकांतवासात केले असतानाच साहेब बारामतीकरांनी त्यांची थेट भेट घ्यावी म्हणजे नक्कीच काहीतरी शिजत आहे.सध्या तरी स्वाभिमानाची बाजू पडेल आहे. त्यामुळे भविष्यात ‘आडला स्वाभिमान धरी घड्याळाचे पाय’ ही म्हणही सत्यतेत आल्यास आश्‍चर्य वाटू नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)