#कलंदर: ।। तयारी गणेशाची ।। 

– उत्तम पिंगळे 
नावावरून वाटले असेल की गणेशचतुर्थी जवळ आली आहे व त्यासाठीची सर्वत्र तयारी चालू आहे. घराची साफसफाई, रंगरंगोटी, खरेदीची लगबग तर ते साफ चुकीचे आहे. ही तयारी आहे कैलास पर्वतावरील! आता गणरायाच्या स्वागतासाठी आपण सारे आता उत्सुक व आतूर झालेलो आहोत. तिकडे स्वर्गलोकात कैलासावर गणरायाच्या वार्षिक दहा दिवसांच्या पृथ्वीतलावर जाण्याची तयारी चालू आहे. त्याचा हा वृत्तांत…
साक्षात माता पार्वतीसमोर धन्वंतरी उभे होते. मातेने त्यांचे आदराने स्वागत करून त्यांना स्थानापन्न होण्यास सांगितले. सालाबादप्रमाणे धन्वंतरीने एक मध्यम आकाराचा बटवा मातेच्या स्वाधीन केला व त्यातील औषधांची माहिती दिली व निरोप घेतला. मग देवर्षी नारदमुनी “नारायण! नारायण!’ असा गजर करीत मातेसमोर हजर झाले. पार्वतीमातेने नारदमुनींना नेहमीप्रमाणे “पृथ्वीतलावर दहा दिवस लक्ष ठेवून रहा,’ अशी विनंती केली. मुनींनी आनंदाने ती मान्य करून मातेचा निरोप घेतला. नंतर श्रीगणेश उंदरावर बसून पार्वतीसमोर उभे ठाकले. गेले काही दिवस श्रीगणेशांच्या खाण्यापिण्यावर पार्वतीमातेचे बारीक लक्ष होते. श्री गणेशास उत्तमोत्तम खाद्य पण अत्यंत अल्प प्रमाणात रोज दिले जात होते. याचे कारण म्हणजे पुढील दहा दिवस पृथ्वी तलावरील नैवेद्य स्वीकारायचा आहे, हे आहे. माता पार्वतीस श्री गजाननाच्या वजनाची चिंता असल्यामुळे पुढील काही दिवस आहार जास्त होणार हे गृहीत धरलेले आहे. गणेशाने मातेस वंदन केले मूषकानेही वंदन केले व तो जाऊ लागला त्याच वेळी मातेने त्यास थांबण्यास सांगितले व गणेशाच्या हाती एक कागद दिला. तो कागद एकदा मोठ्यांनी वाचण्याची गणेशास सूचना केली व तो पृथ्वीतलावर जाताना तुझ्या जवळ ठेव असे सांगितले.
गणेशाने वाचन सुरू केले व त्या कागदावरील मजकूर पुढीलप्रमाणे होता…
नैवेद्य कितीही आवडला तरी एकदम तो खाऊ नये; थोडा थोडा काही काळानंतर खात जावा. याचे मुख्य कारण मध्ये कित्येक ठिकाणी जायचे असल्यामुळे सर्वांकडे थोडाथोडा खावा लागणार, हे आहे. अलीकडे पृथ्वी तलावरील अन्नात खूप भेसळ होत आहे असे ऐकल्याने जास्तीचे तेलकट तुपकट खाऊ नये. तसेच चायनीज नामक कोणताही पदार्थ ग्रहण करू नये. रात्री झोप घेण्याचा मन:पूर्वक प्रयत्न करावा. महाराष्ट्र देशी अनेक खड्डे पडले असल्यामुळे मूषकाने गणेशास काळजीपूर्वक न्यावे. गणेशाने प्रसाद खाल्ल्यावर त्याच्यानंतर मूषकाने तोच ग्रहण करावा.
मूषकाने बाहेरील काहीही खाऊ नये. मंडपाच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी विषारी द्रव्ये टाकलेली असतात. रोज रात्री दूध नियमित प्यावे. मोठमोठ्या स्पीकरचा आवाज होत असल्यामुळे दिलेले कापसाचे बोळे कानात टाकून घ्यावे. बरेच ठिकाणी एलईडी व फोकस लाईट्‌स सतत चालू असल्यामुळे डोळ्यांमध्ये कपिलेचे दूध जे कुपीमध्ये आहे, ते टाकावे. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणाच्या उत्सवापेक्षा शक्‍यतो जास्तीत जास्त घरगुती मूर्तीमध्ये वास करावा. येताना पृथ्वीतलावरील कोणतीही आधुनिक वस्तू कितीही आवडले तरी स्वर्गात आणण्याची परवानगी नाही. तेथेच काय ती बघून घ्यावी. नारदमुनींचे आपल्याकडे बारीक लक्ष आहे हे ध्यानात ठेवावे. दहा दिवसांनंतर विसर्जनाची मिरवणूक सुरू होता होताच मूषकावर बसून त्वरेने स्वर्गाकडे रवाना व्हावे. उगाच मिरवणुकीत जास्त वेळ दवडू नये. तुझ्या पृथ्वीतलावरील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! माता पार्वती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
3 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)