कलंदर : हम सब एक है।   

File Photo

उत्तम पिंगळे 

आज एकदम पहाटेच काकूंच्या सर्व फराळ पदार्थांची सभा भरली. या वर्षी कोणता पदार्थ चांगला झाला आहे याबाबत त्यांची चर्चा चालू होती. एकतर दिवाळीच्या पाडव्यापर्यंत सण झाला होता त्यामुळे लोकांकडूनही अभिप्राय आले होतेच. जो तो आपणच चांगले आहोत असे सांगू लागला. मग करंजीबाई मुरकत पुढे आल्या. त्यांनी लाडू, अनारसे, शंकरपाळे, चकली व चिवडा यांना शांत केले. मग त्यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपापले वैशिष्ट्य्‌ सांगायचे. त्यावरून परीक्षक मीठ, साखर व तिखट निर्णय घेतील सर्वांनी त्यास होकार दिला.

मग करंजीबाईंनी एक मुद्दा आणला की, सोसायटी जशी सभासदांचीच असते त्याप्रमाणे या वेळी काकूंनी चकल्या बाहेरून आणल्यामुळे चकलीला यामध्ये भाग घेता येणार नाही. कारण बाकीचे सर्व पदार्थ काकूंनी घरी केलेले आहेत. चकलीने यावर मीसुद्धा फराळात असल्यामुळे असा भेदभाव केला जाऊ नये असे म्हटले. पण सर्वांनी त्याला विरोध केला कारण त्यामुळे त्यांचा एक स्पर्धक कमी होणार होता.

शेवटी परीक्षकांनीही चकलीबाईंना सांगितले की तुम्ही यावेळी स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. मग बेसनाच्या लाडवाने सुरुवात केली की, मी मऊसर गोड असून आबालवृद्धांना आवडणारा आहे. इतरांनी त्याला डायबिटीसवाले खाऊ शकत नाही म्हणून गप्प केले. करंजीने मुरकत मी मानाची असून खुसखुशीत असते अशा दावा केला. त्यावर इतरांनी तिला जर तू शिल्लक राहिली तर काही दिवसांनी खवट वास येतो असे बोलून गप्प केले. अनरसा म्हणे की, दिवाळीसाठी मला खास बनवले जाते. इतर वेळी मी नसतो. त्यावर लाडू सकट त्याला म्हणाले की, कित्येकांना तू आवडत नाहीस तसेच गोड व तुपट असतो असे बोलून गप्प केले.

शंकरपाळ्याने स्वतःला खुसखुशीत अशी सुरुवात करताच इतरांनी त्याला तेल पिणारे व आरोग्यास चांगले नाही असे बोलून गप्प केले. शेवटी चिवड्याने अशी सुरुवात केली की, पन्नास टक्‍यापेक्षा जास्त मी संपून गेलेलो आहे व लोकांनीही मला दाद दिली. त्यावर बाकीचे म्हणाले की तू ही तेलकट असतोस व जास्त दिवस राहिलास तर चिवट व नरम होतोस. सर्वांचे म्हणणे परीक्षक मीठ, साखर व तिखट यांनी ऐकून घेतले व एकंदरीत सर्व विचार करून ते म्हणू लागले.

सर्वच पदार्थ आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच असतात. करंजी शुभ्र, अनारसे जाळीदार, शंकरपाळे खुसखुशीत, चिवडा चमचमीत, तर चकली हलकी व कुरकुरीत, लाडू गोड व जिभेवर विरघळणारे. त्याचप्रमाणे इतरही पदार्थ जसे कडबोळी खमंग, चिरोटे हलके व गोड. या सर्वांना एकत्र मिळूनच दिवाळीचा फराळ असे संबोधले जाते. त्यात आम्हा परीक्षकांचे म्हणजे चमचमीत पदार्थात तिखट, मीठ तसेच गोड पदार्थात साखर यांचे प्रमाण योग्य असेल तरच तो पदार्थ चांगला होतो. शेवटी कोणतीही गोष्ट अती झाली म्हणजे ती वाईटच. दिवाळीत आठवडाभर सर्वत्र याच पदार्थांची रेलचेल असल्यामुळे बहुतेक सर्वजण जरा जपूनच खातात. पण तुम्हा सर्वांशिवाय दिवाळीची मजा येऊ शकत नाही. म्हणूनच दिवाळीचा चांगला पदार्थ कोणता असं म्हणायचे झाल्यास तुम्हा सर्वांचा समावेश असलेला दिवाळीचा फराळ हाच होय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)