#कलंदर: स्वागत गणरायाचे… 

– उत्तम पिंगळे 
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा।।
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणरायाचे स्मरण करून करत असतो. चौदा विद्या 64 कलांचा स्वामी गजानन यांचे आज आगमन होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणांचा पती तो गणपती. सृष्टीतील सर्वच गणांमध्ये विभागले गेले आहेत पशुगण, पक्षीगण, देवगण त्या सर्व गणांचा जो अधिपती, प्रमुख आहे तो गणपती.गणरायाचे घराघरात तसेच सार्वजनिक आगमन होत आहे अशा मंगलक्षणी गणरायाची यथा साध्य मनोभावे पूजा करून आपले गाऱ्हाणे मांडावे असे प्रत्येकास वाटते.
आम्ही ठरलो मुक्‍त पत्रकार. त्यामुळे आम्हाला सद्यपरिस्थितीचे सर्व पैलू समजावून घेणे आवश्‍यक असते. अगदी आपल्या गल्लीपासून पुढे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश ते थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत. त्याप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक राजकीय, धार्मिक सर्व बाबी समजून घ्याव्या लागतात. आता आपल्याला इराणशी व्यापारसंबंध तोडावे म्हणून अमेरिकेचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष दबाव हळूहळू वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल भडकलेले आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून गेला आहे. पाकिस्तानात सरकारचे परिवर्तन झाले असले, तरी येरे माझ्या मागल्या तीच परिस्थिती आहे.शेजारील चीन आपली छाप नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव या देशांवर पाडत असून भारताला एकटे पाडण्याचा प्रयत्न आहे. आपल्या देशात निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. आघाड्या व युतीचे राजकारण जोर धरू लागले आहे. महागाई आरक्षण यावरील उलटसुलट बंद. मग त्यातील तोडफोड महागाईविरोधी मोर्चे, शैक्षणिक बाबतीतील उतरता आलेख, जातीय, धार्मिक, प्रांतीय सीमावाद, नक्षलवाद प्रशासनातील ढिलाई, भ्रष्टाचार या सर्वामुळे सामान्य माणसाचे जीवन कठीण होत चाललेले आहे. अशा वेळी गजाननाच्या आगमनाने निश्‍चितच मनावरील ताण हलका होण्यास मदत होते. गणरायाच्या कृपेने निश्‍चितच काहीतरी चांगले घडेल असा आशावाद वाढू लागतो. अर्थात हे सगळं घडण्या करता आपणच खरे शिलेदार आहोत हे प्रत्येकाने जाणले पाहिजे.
लोकमान्यांनी सन 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव उदयास आणला. सर्वांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध एकजुटीने लढावे हा या मागचा प्रमुख हेतू होता. सर्व जातीपातीतील दुरावा नष्ट होऊन एकसंध समाज निर्माण व्हावा हेदेखील अपेक्षित होते. त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, व्याख्याने, भाषणे यांची रेलचेल होती. आता फक्त गोंधळ वाढत चाललेला दिसत आहे. अर्थात, सर्वच मंडळे तशी नाहीत. अनेक मंडळे सामाजिक बांधिलकी जाणून अनेक समाजोपयोगी कार्यात हातभार लावताना दिसत आहेत. यातूनच सक्षम भारत निर्माण व्हावा.
संकटेही येत राहणारच त्यातून मार्ग काढून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. गणराया पुढे नतमस्तक होत असताना मनात नवीन उभारी निर्माण होते. मीही आमच्या सार्वजनिक गणपतीसमोर साकडे घालण्याचे ठरवले आहे ठरवले आहे. आधी सांगितलेल्या समस्या नीट समजावून घेतल्या तर…’ सर्वच स्तरावर म्हणजे ग्राम पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नोकरशहा व राजकीय नेते यांना या वेळी गणरायाने सुबुद्धी द्यावी हीच प्रामाणिक प्रार्थना.’ असे घडल्यास सुमारे 80 टक्‍के समस्या निश्‍चित नष्ट होतील.
गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया।।

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)