#कलंदर: स्वच्छ भारत! 

– उत्तम पिंगळे 

दहीहंडीनंतर दुसऱ्या दिवशी प्राध्यापक मराठमोळ्यांच्या घरी गेलो. गेल्या गेल्या ते मला म्हणाले की, नोटाबंदीने हवा तितका फायदा झाला नाही. मुळात छोट्या उद्योगधंद्यांना झळ बसली. मग मला म्हणू लागले की, स्वच्छ भारत अभियानाबद्दल आपल्याला काय वाटते? मी म्हणालो की, ते चांगले आहे व अनेक स्वयंसेवी संस्थाही आता त्यात सहभागी होत झालेल्या आहेत. कार्यक्रमाला गती येत आहे असे मला वाटत आहे. माझ्याकडे पहात ते मंद स्मित करत होते. मग मीच त्यांना विचारले की, तुमचे मत काय आहे? तुम्हाला काय वाटते ते तरी सांगा. 

मग प्राध्यापक सांगू लागले की, आपल्या सरकारची जमेची बाजू म्हणजे स्वच्छ भारत संकल्पना अगदी गावा-गावापर्यंत पोहोचली आहे. अशी काही देशव्यापी योजना आहे हे सर्वांना कळू लागली आहे. पण तुम्ही म्हणता तशी गती येणे आवश्‍यक आहे. माझा एकंदरीत पाहण्यात असे आले आहे की, कोणतीही चांगली गोष्ट करायची असेल तर सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून केली पाहिजे किंवा आपल्यापासून केली पाहिजे. म्हणजे त्याला गती मिळते. सध्याची स्वच्छता मोहीम आपल्या घरापर्यंत सीमित आहे. घरापासून सुरुवात झाली; पण घरापाशीच आहेत अजून. पुढे हलताना दिसत नाही. सरकारने अनुदान देऊन शौचालये बांधली आहेत, तसेच ग्रामपंचायत पातळीवरही अशी कामे केलेली आहेत.

आता यात दुसरी बाजू अशी आहे की, अपले घर स्वच्छ असावे व ते ठेवण्यातही येते. बऱ्याचवेळा आपल्या दाराचा कचरा, घरचा कचरा दुसरीकडे टाकण्यात येतो. एखादा रिकामा असलेला प्लॉट हा इतर आजूबाजूंच्या घरांसाठी डम्पिंग ग्राउंड बनलेला दिसतो. मग प्राध्यापक मोठा श्वास घेऊन म्हणाले की, भारतीय माणूस हा खरोखर कष्टाळू आहे, स्वच्छता बाळगणारा, नियम पाळणारा, रस्त्यावरील नियम पाळणारा आहे. पण तो कुठे? भारताबाहेर असल्यासच. कारण तेथील नागरी नियम खूप कठोर आहेत. तसेच कठोर म्हणण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी तत्परतेने होत असते. ऑस्ट्रेलियासारख्या देशात बाथरूम टॉयलेट क्‍लीनिंगसाठी स्पेसिफाइड क्‍लिनर वापरला जातो. कुठलेही क्‍लिनिंग केमिकल आणून चालत नाही. आपल्याकडे असे काही नाही म्हणूनच अशा कार्यक्रमांना गती येत नाही. 

अर्थात शाळांमधून स्वच्छतेचे धडे दिले जावेत. यासाठी शाळा स्वच्छ असावी. कित्येक सरकारी शाळांमध्ये प्राथमिक सोयींची वानवा आहे. अशा ठिकाणी खर्च केला जावा. स्वच्छतेचे धडे बाल वयातच द्यावे. ग्रामपंचायती व नगरपालिकांनी कचरा उचलण्याची तत्परता दाखवावी. अर्थात तसे केले जात आहे. तसेच ग्रामपंचायती व नगरपालिकांना लोकांना दंड करण्याचा अधिकार द्यावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा सापडणाऱ्या ग्रामपंचायतीस वा नगरपालिकेस दंडही केला जावा. मग सर्वजण कायदे पाळू लागतील. त्यासाठी काही अत्याधुनिक साधनेही लागतील म्हणजे नदीकिनारी व सार्वजनिक ठिकाणी कोण कचरा टाकते हे सीसीटीव्हीवरून पाहिले जावे.

आपल्याकडील लोकांना दंडाचीच भाषा समजत असते. कित्येकदा आपण पाहातो की, दुचाकी वा कारमधून रस्त्यावर जात असता थोडीशी गाडी बाजूला घेऊन हातातील कचरा बाहेर फेकला जातो. आपण फक्त आपले घर स्वच्छ करणे सुरू केले आहे आणि अजून तेथून बाहेर पडलेलो नाही. कित्येक कामात भ्रष्टाचार झालेला आहे. सार्वजनिक शौचालयांच्या सफाईसाठी काही काळजी घेतली नाही, म्हणून पुन्हा बाहेर घाण केली जाते. आपल्या घराबाबतची स्वच्छता पुढे गल्ली, गाव करत पुढे सरकणे आवश्‍यक आहे. गाडगेबाबांनी उभ्या हयातीत तेच काम केले होते. स्वच्छता ही आपली संस्कृती बनली गेली पाहिजे. सुरुवात तर नक्की झालेली आहे; पण पुढे नेणे आपल्या सर्वांच्या हातात आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)