कलंदर: सरदारांना प्रश्‍न? 

उत्तम पिंगळे 

शेवटी त्या लोहपुरुषाने विचार केलाच की एकदा पाहून तर घेऊ, माझा जगातील सर्वात मोठा पुतळा कसा आहे तो. सरदार पटेलांचा आत्मा रात्री त्या पुतळ्यात शिरलाच. दूरपर्यंत नजर टाकणे त्यांना शक्‍य झाले. संपूर्ण भारतासह पाकिस्तान व आजूबाजूचे देशही सहज दिसत होते. कालच्या रात्रीत कित्येक ठिकाणी दाटीदाटीने मोठा उजेड दिसत होता जसे मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, चेन्नई, कराची, जामनगर वगैरे. काळोखाच्या रात्री ते दृश्‍य अतिशय विहंगम वाटत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रथम त्यांनी पाकिस्तान नजरेखालून घातला अगदी किरकोळ ठिकाणीच विजेचे दिवे दिसत होते. बऱ्याचशा ठिकाणी अंधारच होता.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती अन्नधान्याची वानवा सुमार दळणवळणाची साधने. त्यानंतर त्यांनी नजर फिरवून थेट बांगलादेशकडे पाहिले. तेथील परिस्थितीही पाकिस्तानपेक्षा काही वेगळी नव्हती. प्रचंड बेकारी व अनेकजण अनैतिक धंद्यात गुंतले होते. मग पुतळ्याने भारताचा प्रदेशावर पाहणी केली. काही ठिकाणी प्रचंड सुबत्ता म्हणजे एकेका घरी चार-चार मोटारी होत्या तर काहींच्या पायात साधी चप्पलही नाही. हाय-फाय कॉलेजेसमध्ये अत्यंत महागडे शिक्षण दिले जात होते तर कित्येक प्राथमिक शाळांना साधी इमारतही नाही.

शेअरबाजारात दररोज अब्जावधींची उलाढाल होत आहे त्याचवेळी देशातील कित्येक कुटुंबांचे मासिक उत्पन्न दहा हजारही नाही. पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रोटोकॉल म्हणून अनेक महागड्या पदार्थांची नासाडी होत असते, त्याच वेळी कितीतरी बालके कुपोषणाने दगावत आहेत, हे दिसले. एकीकडे बुलेट ट्रेन येणार तसेच मेट्रोची कामे चालू आहेत तर कित्येक खेडेगावात जाण्या करता साधा रस्ताही नाही. शहरात रात्ररात्र रस्त्यावरील दिव्यांचा झगमगाट असताना शेतकऱ्यांना पाण्यासाठी वीजही मिळू शकत नाही. अब्जावधी रुपयांचे देणे ठकवून फरार झालेले उद्योजक येथेच असून केवळ दहा- वीस हजारांच्या कर्जासाठी आत्महत्या करणारा शेतकरीही येथेच आहे. त्यानंतर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषयही त्यांनी पाहिला. स्वातंत्र्यानंतर मध्य प्रदेश, बिहार, मुंबई राज्य, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतून वेगळी राज्ये निर्माण झाली. भाषावार प्रांतरचना करूनही समभाषिक राज्येही विभागली गेली. जम्मू-काश्‍मीर फुटीरतावाद्यांच्या कब्जात गेला.

करोडो रुपये खर्चून महापुरुषांचे पुतळे व स्मारके उभी राहणार आहेत. अब्जावधी रुपयांची बुलेट ट्रेनची योजना असून असलेली रेल्वे नीट सांभाळा येत नसतानाही किती योग्य आहे हा प्रश्‍नच आहे.
अनेक धार्मिक बाबी राजकीय होऊन त्यावरही कोर्टबाजी चालू आहे.एकीकडे संस्थाने खालसा होऊनही त्यांचे वारस अजूनही स्वतःला संस्थानिकच समजत आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात बहुतेक पक्षांमध्ये घराणेशाहीच चालू आहे.

हे सर्व तपासून पाहिल्यावर सरदारांनाही प्रश्‍न पडला की भारताने आजूबाजूंच्या देशापेक्षा केलेल्या प्रगतीची प्रशंसा करावी का जागतिक पातळीवरील विकसित देशांच्या तुलनेतील परिस्थिती पाहून खेद करावा. तसेच देशांतर्गतही एकीकडे सुबत्ता तर दुसरीकडे प्रचंड दारिद्य्राचा लेखाजोखा कसा करावा हाही प्रश्‍न पडलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)