कलंदर: सरदारांची परिषद

उत्तम पिंगळे

शेवटी महाराष्ट्राच्या सरदारांची निवासी, रविवारी खास पत्रकार परिषद भरली. परिषद म्हणजे अनेक पत्रकारांनी सरदारांना सांगितले की चार वर्षे झाली चांगले निर्णय झाले त्या निमित्ताने भेट हवी होती. सरदारांनी सांगितले की वेळ नाही पण तरीही गळ घातल्याने शेवटी घरी येऊन चहापान करा सांगितले. वीसएक पत्रकार बरोबर साडेआठच्या वेळेत पोहोचले. सचिवांनी स्वागत केले दोन मिनिटांत सरदार स्वतः हजर राहिले सर्व पत्रकारांनी उभे राहून स्वागत केले.
सरदारांनी प्रथमच सांगितले की दहा ते बारा मिनिटात काय विचारायचे ते विचारावे किंवा संदर्भ सांगावा सरदार स्व:तच एकत्रित उत्तर देतील व चहापान होईल.पत्रकारांनी आपसात पाहात शेवटी एका कागदावर पाणीटंचाई, नाणार, सरकारी नोकऱ्यांची भरती व आरक्षण असे लिहून दिले. सरदारांनी सर्वत्र पाहात म्हणाले की, सर्वच प्रकारचे व सर्वच पक्षांचे पत्रकार दिसत आहेत. असे म्हणताच सर्वत्र हशा पसरला.

प्रथम पत्रकारांनी अभिनंदन केले (काहींनी मनापासून, काहींनी नाईलाजाने) सरदारांनी मग बोलावयास सुरुवात केली. शेती व पाण्यासाठी जलयुक्‍त शिवाराची अनेक कामे झालेली आहेत व त्यात विरोधक म्हणतात भ्रष्टाचार झाला आहे. पण मुळातच पाऊस यंदा न पडल्यामुळे त्या कामांची प्रचिती दिसून येत नाही या वेळी पाऊस चांगला झाला तर पाहा काय जादू होते ते. नाणारबाबत म्हणाले की, हा प्रकल्प जाणूनबुजून माथी मारला जाणार नाही (कुणीतरी हळूच कुजबुजले म्हणजे नाणार होणार) आरक्षण मामला मिटल्याने आता सरकारी भरती सुरू होईल.

कुणीतरी शेवटी विचारलेत की एवढी सरकारे येऊन गेली पण तुम्हीच कसे हे काम केले? सरदार म्हणाले की, खरोखर मनाची इच्छा असेल तर निर्णय घेता येतो. आम्ही प्रश्‍न तपासला त्याचा अभ्यास केला व सांगोपांग चर्चा करून निर्णय घेतला आहे. आता त्यात वेळ लागल्यामुळे विरोधकांना वाटले की हे काम करणारच नाहीत. पण एकाने विचारलेच की, कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय कसा टिकेल? त्यावर सरदार म्हणतात, मी स्वतः कायद्याचा विद्यार्थी होतो व कायद्याची लढाई लढण्याकरता काय लागेल ते सर्व विचार करूनच निर्णय घेतलेला आहे. घ्या बंर आता चहापान (चहापानाची खूण करतात)

चहा, थालीपीठ, लक्ष्मीनारायण चिवडा, शंकरपाळे मोहनथाळ, गुलाबजाम असा बेत असतो. सर्वजण भरपेट नाष्टा करतात पुन्हा अभिनंदन करून निघून जातात. सरदारही आपल्या कामाकरता निघतात.

मग दोन पत्रकार हळूच बोलताना ऐकले. पहिला म्हणे आरक्षण राहील का जाईल, नाणार जाणार का होणार? मला तर गोलमालच वाटत आहे.त्यावर दुसरा म्हणे अरे सरकारने कायद्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे.

दुसरा म्हणाला तरी जरा गडबड वाटत आहे आता तूच बघ चहापानाला बोलवले; पान कुठे मिळाले? किंवा नाष्ट्‌याला सरळ वडापाव कांदे पोहे बटाटे पोहे असे का नाही केले. कारण त्यांत असलेले पदार्थ सरळ दिसतात. जसं कांदापोहा, वडा, पाव. इथं तूच बघ चहा सोडला तर बाकी कोण तर थालीपीठ थाळीही नाही पीठही नाही. लक्ष्मीनारायण चिवडा, शंकरपाळी, मोहनथाळ, गुलाबजाम. या वस्तूंच्या नावातला एकतरी पदार्थं दिसतो का यात? म्हणूनच म्हणतो नाणार जाणार म्हणजे येणार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)