कलंदर : शुभ दिवाळी !   

उत्तम पिंगळे 

कालच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्राध्यापक मराठमोळ्यांना घरी जाऊन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक म्हणाले की दिवाळी आज काल एकदम कमर्शियल झालेली आहे.त्यावर मी त्यांना म्हणालो आपण अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहात म्हणून सर्व गोष्टी व्यावसायिक वाटतात का? दिवाळी जोरदार चालू आहे सर्वत्र खरेदी चालू आहे दुकाने मॉल खच्चून भरलेले आहेत मोटारसायकल, गाड्यांची खरेदी वाढली आहे नवीन घरगुती वस्तूंचीही खरेदी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तोच धागा पकडून प्राध्यापक म्हणाले की दिवाळीची खरेदी सर्वत्र होत आहे उलाढाल वाढत आहे व वाढेल ही याबाबत कोणाचेही दुमत नाही पूर्ण पूर्वीची दिवाळी व आताची हा फरक राहणारच आहे.प्राध्यापक त्यांच्या दिवाळीची आठवण सांगत होते. दसरा संपला की दिवाळीच्या तयारीची लगबग चालू होत असे. नवे धान्य साठवले जायचे व घराची रंगरंगोटी केली जायची. मग जशी तशी दिवाळी जवळ येत आसे तसे प्रत्येक घरातून फराळांच्या वस्तूंचा घमघमाट सुटत असे. मुख्यतः लाडू चकल्या करंज्या चिवडा शंकरपाळे कडबोळी अनारसे असे विविध पदार्थ असत. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे घरामध्ये माणूस असे तसेच घरातील स्त्रिया एकमेकांच्या घरी फराळाचा मदतीसाठी जात असत. आम्ही मुले साफसफाईच्या कामात वा किल्ला बनवणे व खेळ खेळणे यात गुंग असायचो.

बायका एकमेकींच्या घरी फराळासाठी मदतीला जात, आज एका घरी, दुसऱ्या दिवशी दुसरीकडे, असे एकमेकांच्या घरी जाऊन मदत केली जायची. मग त्यावेळी एकमेकांच्यात चर्चा होत असे की यावेळची दिवाळी कशात? म्हणजे प्रत्येक स्त्रीला विचारले जायचे की या वेळेला तुमच्यासाठी काय खरेदी करणार. मग कुणी साडी सांगायचे कुणी नथ सांगायचे कुणी छल्ला सांगायचे अशा वस्तूंची नावे घेतली जायची. दिवाळीच्या प्रमुख दिवसात एकमेकांना फराळाला बोलणे किंवा आसपासच्या घरांमध्ये फराळाचे ताट नेऊन देणे असा रिवाज होता.अर्थात त्या वेळी आजसारखी दगदग नसे.कुणी एकदम घाईगर्दीत येत नसे. एकदा दिवाळीला म्हणून सर्व पोरंटोरं एकत्रित आली की आठ दहा दिवस काही विचारू नका, एकदम धम्माल असायची.

आताची दिवाळी पूर्वी पेक्षा निश्‍चितच जास्त म्हणजे आर्थिकदृष्ट्‌या साजरी होत आहे यात वादच नाही परंतु तिचे अप्रूप कमी होत आहे हे निश्‍चित. याचे मुख्य कारण म्हणजे दिवाळीचा फराळ हा दिवाळीतच केला जायचा इतर वेळी लोकांना तो परवडतही नसे. कापड चोपड खरेदीही फक्त दिवाळीतच केली जायची किंवा कुणा घरी लग्नकार्य वगैरे असेल तरच केली जायची. आता तसे राहिलेले नाही कोणतीही वस्तू कधीही आपण ऑर्डर करून मागून घेऊ शकतो. त्याच प्रमाणे आता स्पर्धा सगळीकडेच आहे अगदी शाळांपासून नोकरीमध्येही ती असल्यामुळे कुणालाही वेळ नाही. मग आपण पाहातो की भाउबीज वगैरे एखाद्या सुट्टीच्या रविवारी वगैरे साजरी केली जाते म्हणजे त्याच दिवशी साजरी करता येईल असे नाही. दिवाळीच्या दिवसात घरी येणारेही फराऴाचं सोडून बोला असेच म्हणू लागले आहेत. एखादे वेळी फक्त एक चकलीचा तुकडा द्या. असे म्हणतात याचे कारण त्या पदार्थांचे आता अप्रुप असे राहिलेले नाही.

वेळ नसल्यामुळे अनेक जण रेडीमेड फराळ खरेदी करत असल्यामुळे असे पदार्थ बनवणाऱ्यांना मात्र चांगले दिवस आलेले आहेत. पूर्वी ज्या गोष्टीला लोक नाक मुरडत (स्वयंपाक वा खाद्यपदार्थ विकणे) तीच आता चांगली गोष्ट ठरू लागली आहे. लोकांच्या हाती आता पैसा आलेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या गृहोपयोगी नवीन वस्तू किंवा फराळाचे पदार्थ हे केवळ दिवाळीत होत होते ते आता कधीही मिळू लागले आहेत. शेवटी बदल ही एकच स्थिर गोष्ट आहे. कालाय तस्मै नम:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)