कलंदर: विचार मंथन…

file photo

उत्तम पिंगळे

पुलवामा आत्मघाती हल्ल्यात चाळीसवर जवान शहीद झाले. एक एक जवान घडवताना किती कष्ट होतात ते प्रत्यक्ष त्याचे प्रशिक्षण घेतलेल्यांना ठाऊक असते. तसेच हे जवान देशप्रेम व देशासाठी कोणताही त्याग करण्यास कायमच सज्ज असतात. तसेच कोणत्याही वीराला जर रणांगणामध्ये शत्रू समोर लढताना वीरमरण आले तर तो त्यास अभिमानच वाटतो. कारण त्याने देशासाठी सर्वोच्च त्याग केलेला असतो. याचा अर्थ काल झालेल्या शहीद वीरांचे बलिदान व्यर्थ होते असा कुणी काढू नये. पण या वीरांना अतिशय बेसावध असताना किंवा प्रत्यक्ष रणांगणावर नसताना काळाने अलगद झडप घातली यासारखे देशाचे दुर्दैव नाही.

आता नेहमीप्रमाणे आपण खापर पाकिस्तानवर फोडतो व ते सत्यही आहे. कारण एवढी रसद दहशतवाद्यांना मिळण्याचा एकमेव मार्ग तोच आहे. दुसरे म्हणजे सध्या अमेरिकेने अफगाणमधील आपले सैन्य मागे घेण्याचे सुरू केले असल्याने तेथूनही अतिरेकी रसद पाकिस्तानला मिळू लागली आहे. अर्थात हे चालूच राहणार आहे पण मग आपली संरक्षण व गुप्तहेर यंत्रणा काय करीत होती? हा प्रश्‍न येतोच. तसेच देशामधील फुटीरवाद्यांच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला होणे शक्‍यच नाही. मग आपण कमी कुठे पडलो ते पाहणे महत्त्वाचे ठरते. अर्थात आपला संरक्षण विभाग व गुप्तचर यंत्रणा हे शोधून काढील पण कधी एवढे जवान हकनाक शहीद झाल्यावर. गुप्तचर यंत्रणा म्हणजे आपल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संभाव्य घटनांचा ज्योतिषी म्हणल्यास वावगे ठरू नये.

आता दुसरा महत्त्वाचा प्रश्‍न पुढे आहे की, आपल्या संरक्षण दल व गुप्तचर खाते यांच्याकडे सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत की नाही? कारण, अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. एकीकडे कर सुधारणा होत असताना कर संकलन वाढत आहे. असे होत असताना सरकारचा खर्च योग्य ठिकाणी होत आहे की नाही ते पाहणे आवश्‍यक आहे. कारण सर्वात प्रथम देशाच्या सीमा सुरक्षित असल्यासच अंतर्गत कारभार व्यवस्थित चालू राहू शकतो. हे सांगण्याचे कारण असे की आपण कित्येक गोष्टी गांभीर्याने घेत आहोत की नाही? आपण सामाजिकदृष्ट्या एकजीव आहोत की नाही? एकीकडे नसलेल्या नोकऱ्यांसाठी जातीपातीचे राजकारण करून आरक्षण, बंद, संप तोडफोड यांना राजकीय पक्ष चिथावणी देत आहेत, त्यात देशाचे केवळ आर्थिक नाही, तर प्रचंड सामाजिक नुकसान होत आहे.

दुसरीकडे राजकीय सम्राट बनलेले आपल्या हवे असे निर्णय घेण्यास भाग पाडत आहेत. अशात शेतकऱ्यांची कर्जमाफी हा हक्‍काचा प्रश्‍न मांडून आता शेतकऱ्यांचं कर्ज हे माफीसाठीच असते असा समज पसरत चालला आहे बरं एवढे करूनही गरीब शेतकरी खरंच कर्जमुक्‍त होत आहे का? मोठ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. कर्जमुक्‍त व सवलती देऊन आपण अनेक गटांना आळशी बनवत आहोत. शेतकऱ्यांना योग्य भावाने कायमस्वरूपी बाजारपेठ आपण का मिळवून देऊ शकत नाही? सत्तर वर्षे होऊनही हा प्रश्‍न कोणाला पडलेला नाही. सरकारी तिजोरीतील कर रूपाने आलेला पैसा सरसकट अनुत्पादक गोष्टीत उघडला जात आहे. यातून श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत. योग्य भाव व हमी मिळाली तसेच सवलती ऐवजी काही रोजगार देऊन मोबदला दिला गेला तर नक्‍कीच पैसा निर्माण होईल व सवलतींचा पैसा संरक्षण, टेक्‍नॉलॉजी, शिक्षण व आरोग्य अशा ठिकाणी वापरता येईल.

अशाने आपली संरक्षणसंस्था गुप्तचर यंत्रणा व लष्करालाही आधुनिक साधनांची कुमक मिळेल. आपण नुसतेच बोफोर्स, वेस्टलॅंड, राफेल यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करतोय पण अंतर्गत पैसा योग्य ठिकाणी वापरत आहोत का?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)