कलंदर : राजकीय पर्वणी ?   

उत्तम पिंगळे 
पाच राज्यांच्या निवडणुका या 2019 च्या निवडणुकांची सेमीफायनल असेच मानले जात आहे. अर्थात, एका अर्थी खरेच आहे कारण पाचही महत्त्वाच्या राज्यात निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच घेतल्या जाणार आहेत. राजकीय नेते प्रकाशझोतात राहण्याकरता वेगवेगळ्या क्‍लृप्त्या योजत असतात आणि त्यात जर निवडणुकीचं वारं सुटलं तर विचारूच नका. स्वातंत्र्यापूर्वी आपले सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या आयोजित करून जनजागृतीचे कार्यक्रम केले जात असत. लोकमान्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती लोकाभिमुख केली. विविध नाटककारांनी त्या त्या समयास अनुकूल अशीच नाटके लिहून ब्रिटिशांवर रान उठवले होते.
स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणाने हळूहळू राजकारणाकडून अर्थकारणाकडे वाटचाल केली आता तर समाजकारण नावापुरते उरले असून केवळ राजकारण केले जात आहे व त्यासाठी प्रकाशझोतात राहणे आवश्‍यक ठरते. आपली छबी कशी लोकांसमोर येईल ते पाहिले जाते. त्यासाठी मग कारण काहीही असो.अगदी गावपातळीवर सरपंच चषक, यानंतर आमदार चषक अशा क्रिकेटच्या स्पर्धा वा वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धाही केल्या जातात. वाढदिवसाची पोस्टरबाजी जेणेकरून आपली छबी लोकांना दिसेल हे पाहिले जाते. सर्वत्र अनधिकृत होर्डिंग उभारणे. अगदी नववर्षापासून नंतर होळी, आषाढी, गोकुळ अष्टमी, नंतर गणेशोत्सव मग नवरात्री व दिवाळी तसेच स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताकदिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करणे, मुलांना बक्षिसे देण्यात हे केले जाते.
अर्थात, या सर्वाचा मूळ हेतू आपली स्वतःची प्रसिद्धी होणे व स्वतःची छबी लोकांपर्यंत पोहोचवणे व त्यांच्या डोळ्यासमोर सतत राहणे हाच असतो. अलीकडे नाट्य संमेलन व साहित्य संमेलन यांच्या शुभेच्छा देणे हेही केले जाते. नेत्याला साहित्य व नाटकातले काय समजते तो वेगळा विषय आहे पण ज्या ठिकाणी गर्दी भरणार आहे त्या तिच्या ठिकाणी आपले होर्डिंग असणे आवश्‍यक ठरते. त्यातही आपण पाहतो ते आषाढी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव मुख्यतः पावसात असतात म्हणून बहुतेक नेते नवरात्राची वाट पाहात असतात. म्हणूनच नवरात्रोत्सव हा राजकीय लोकांना पर्वणी वाटत असतो.त्यातही जर विविध राज्ये व लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या असतील तर मग विचारूच नका.
देवीने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून नंतर त्याचा वध केला म्हणून तिला महिषासुरमर्दिनी संबोधले गेले आहे. वेगवेगळ्या राज्यांतून वेगळ्या कथा सांगून वेगळ्या प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. अर्थात, सर्वत्र नाच, गाणे दांडिया रास विविध प्रकारचे खेळ यांचे आयोजन केले असते व प्रचंड गर्दी सर्वत्र होत असते. अशावेळी राजकीय लोकांची बुद्धी न चालेल तर मग काय?
विविध ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करणे मोठमोठे मंडप होर्डिंग्ज लावणे. रात्री प्रकाशझोतात डीजे वा स्पीकर लावून गरबा आयोजित केला जातो. कित्येक वेळेला आचारसंहिता जरी असेल तरी धार्मिक कारण पुढे करून वेगळ्या प्रकारे उदाहरणार्थ हळदीकुंकू वगैरे आयोजन करून भेटवस्तू देणे व प्रचार करणे चालू असते.
आजच्या घडीला आपल्या राज्यात ताबडतोबीने निवडणूक नाही पण घोडा मैदान जवळ असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षातील नेते जागरूक होत आहेत. या नवरात्रीच्या निमित्ताने जनतारूपी देवीसमोर विविध प्रलोभने दाखवत आहेत ते समजते. आता या पाच राज्यातील जनता रुपी देवी नवरात्रीतील रणधुमाळीनंतर होऊ घातलेल्या निवडणुकांत कुणाला मोक्ष व कुणाला लक्ष्य करील हे आता सांगणे कठीण आहे. जो तो पक्ष या धार्मिक उत्सवाची स्वतःसाठी पर्वणी म्हणून उपयोग करून घेत आहे हे मात्र नक्‍की.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)