#कलंदर: ‘युवराजांचा’ टायर फट्ट… 

– उत्तम पिंगळे 
स्थळ उधोजीराजांचे कार्यालय. अत्यंत विश्‍वासू अशा नेतेवजा सरदारांची सभा. सभा अत्यंत गोपनीय; कारणच तसे होते. छात्र युवराज यांच्या आलिशान गाडीला झालेला अपघात व त्यामुळे सगळीकडे उलटसुलट चर्चेला आलेला ऊत. छात्र युवराज रात्रीला नाशिककडे जात असताना त्यांच्या गाडीचा टायर खड्ड्यांमुळे फुटला. याच कारणामुळे अंतर्गत चौकशी व पुढील उपाययोजना यासाठी हा खास दरबार होता. छात्र युवराज धडाडीचे कार्यकर्ते आहेत विद्यापीठ सिनेटवर त्यांचे पूर्ण वर्चस्व आहे. भावी राजे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे अशावेळी त्यांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय असणे स्वाभाविक आहे. सदर अपघात झाला झाल्याच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना ताबडतोबीने संदेश गेला की, रस्त्याचे काम ताबडतोब करावे. आता या अपघाताची एवढी चर्चा झाल्याने बऱ्याच गोष्टी बाहेर येत गेल्या. काही नेत्यांनी रात्रीचा प्रवास करू नये असा सल्ला दिला. तसेच इतकी डिटेल बातमी आपल्या पैकीच कुणीतरी मीडियाला दिली असणार म्हणून सदर मोहिमेतील सर्वांची उलट तपासणी व्हावी असेही सुचविले गेले. कारण ही बातमी सार्वजनिक झाल्यामुळेच लोकांमध्ये पुढील प्रमाणे उत्सुकता दिसून आली…
1. युवराज एवढ्या रात्री नाशिककडे कशाला जात होते? 2. नेमकी ‘मुंडे’ नावाच्या
गावाजवळच गाडी कशी खराब झाली? 3. युवराजांकडे रेंज रोव्हर होती, ती कुणाची?
4. यापूर्वीची आलिशान गाडी कोणाची होती?
असे विविध प्रश्‍न लोक एकमेकांना विचारत आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आपल्याच पक्षाचे असून त्यामुळे या खड्ड्यांबाबत काही बोलता येत नाही. तोंड दाबून बुक्‍यांचा मार करणे क्रमप्राप्त झाले आहे.
सर्वानुमते उधोजीराजांना आश्‍वासित करण्यात आले की यापुढे युवराजांची जास्त काळजी घेतली जाईल. रात्री बेरात्री प्रवास होणार नाही याकडे लक्षपूर्वक पाहिले जाईल. प्रवासात सोबत त्याच तोडीची दुसरी गाडीही ठेवण्यात येईल. मीडियाकडे अशा बातम्या परस्पर जाणार नाहीत हे निश्‍चितपणे पाहिले जाईल. जेथे जेथे विमान प्रवास करणे शक्‍य असेल तेथे शक्‍यतो विमानाने जाण्याचे पाहण्यात येईल. सदरचा अपघात हा घातपात होता का याचीही चौकशी केली जाईल.
चालकाची खासगीरीत्या वेगळी चौकशी करण्यात यावी असा ठरावही मंजूर करण्यात आला. उधोजीराजांनी सर्वांचे हे म्हणणे मान्य करून आवश्‍यक त्या कारवाईचे निर्देश दिले. चौकशीचा अहवाल दोन दिवसांत सादर केला जावा तसेच नवीन सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जावे असे निर्देश दिले. चहापानानंतर सर्व सरदार दरबाराबाहेर पडून आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. शेवटचे दोन सरदार खासगीत बोलताना मी ऐकले. त्यातील पहिला दुसऱ्याला सांगत होता, वास्तविक निवडणूक आता जवळ आली असल्याने युवराजांनी सार्वजनिक वाहनाचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे बघा मुंबई-नाशिक शिवशाहीतून युवराज गेले तर किती मोठी बातमी होईल? दुसरा त्याला विचारत होता, शिवशाहीचे किती अपघात होतात माहितेय का? मग पहिला म्हणे, मुंबई नाशिक रेल्वेसेवा आहे तर ‘इंजिनाच्या’ मदतीने नाशिकला गेल्यास योग्य ठरेल. म्हणजे लोकांना ते आपले वाटतील व लोकांत आदर वाढ… त्याला वाक्‍य पुरे न करू देता दुसरा सरदार म्हणाला अरे ‘भवनासमोर’ उभा राहून ‘इंजिनाचं’ नाव काढतो काय टकूऱ्यात अक्कल हाय का नुसताच खोका?

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)