कलंदर: मोबाइल उपवास? 

उत्तम पिंगळे

मोबाइल उपवास वाचून आश्‍चर्य वाटले असेलच. पण एकंदरीत आजची परिस्थिती पाहता तो दिवस दूर नाही की लोकांमध्ये मोबाइल उपवास ही संकल्पना स्थिरावेल. कारणही तसेच आहे आज आपण मोबाइलचे दुष्परिणाम पाहतोच लहान मुलांना डोळ्यांचे आजार तरुणाई मोबाइल आधीन होऊन त्यातून होणारे अपघात. एकीकडे अडाणी लोकांसाठी मोबाइल कसा वापरावा हे सांगत असताना त्याचे व्यसन जडलेल्यांना त्यातून कसे सोडवायचे हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोबाइल रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला असल्याने त्याच्यापासून वेगळे राहणे वा त्याचा उपवास धरणे म्हणजे थोडे अप्रूप किंवा वरच्या लेवलचे समजले जाईल.

यातून काय घडेल याची यादीच समोर आली.काही लोक काही विशिष्ट दिवसात म्हणजे सुट्टीच्या दिवशी मोबाइल उपयोग टाळतील. जसे गुरुवारचा किंवा शनिवारला उपास करतात तसे. कोणी संकष्टी व महिन्यातील एकादशीने सुरुवात करतात म्हणजे महिन्यात एक किंवा दोन दिवस तसेही कुणी विशिष्ट तारखेला मोबाइल वापरणार नाहीत.त्यातही कोणाचा लंगडा उपवास म्हणजे मोबाइल फक्‍त कॉलसाठी वापरतील इतर गोष्टींसाठी नाही.काही अत्यंत कडक उपवास करतील. म्हणजे मोबाइल पूर्ण बंद ठेवतील. काही जण डॉक्‍टरांनी सांगितल्यामुळे पथ्य म्हणून उपवास करतील. मग त्यात काहींना आठवडावर वा दोन आठवडे किंवा चक्‍क महिनाभरही मोबाइल वापरास मनाई असेल. कुणी स्वतःला असे व्यसन सुटावे याकरता उपवास करतील. मग पारायणाच्या दिवशी लहान मुलांना बोलवून त्यांना चॉकलेट व पुस्तके देतील.कुणी नातलगांना भेटावयास गेल्यावर मोबाइल बंद ठेवतील.

तसेच हे उपवास धर्मातीत असतील जात, धर्म यांचा त्यावर काही परिणाम होणार नाही. तसेच एखाद्या लहान मुलाने रोजा पूर्ण केल्यावर कसे होते तसे एखाद्या लहान मुलाने पूर्ण महिनाभर मोबाइल न वापरल्यास त्यांचाही सत्कार केला जाईल. शाळांमधून अशा विद्यार्थ्याला विशेष पारितोषिक दिले जाईल. एखादे व्यसन सोडवण्याकरता दुसरे व्यसन लागावे लागते असे म्हणतात मग डॉक्‍टरच सांगतील ही काही वेळ टीव्ही पाहा किंवा डेस्कटॉपवर बसा किंवा वाचन करा. तसेच पथ्य म्हणून रोज चार पाने लिहून आणाही सांगतील.

कित्येक धार्मिक ठिकाणी आपण फोटो काढायला मनाई पाहतो तसेच कित्येक धाडसाच्या ठिकाणी म्हणजे धोक्‍याच्या पिकनिक स्पॉटवर मोबाइल नेण्याकरता बंदीच असेल. सेल्फीच्या नादात अपघात होतात अशा ठिकाणी हे केले जाईल तसेच अशा ठिकाणी नाहीतर विना कॅमेऱ्याच्या मोबाइलसाठी परवानगी दिली जाईल. म्हणजेच सक्‍तीचा मोबाइल उपवास घडेल. वरील विवेचन वाचले असता एकंदरच परिस्थिती गंभीर होत असून प्रत्येकानेच विचार करावयास हवा. मध्यंतरी वाचनात आले की एक बाई आपल्या सात वर्षांच्या मुलासह ट्रेनने प्रवासाला जात असते दोघेही पुस्तक वाचत असतात. शेवटी न राहून जवळची स्त्री विचारते तुमचा मुलगा मोबाइल वापरत नाही? आमच्या मुलगा कितीही सांगितलं तरी मोबाइल सोडतच नाही. त्यावर त्या बाईने उत्तर दिले की लहान मुले मोठ्यांचे ऐकत नाहीत, पण त्यांचे अनुकरण नक्‍कीच करतात. उत्तरातूनच समोरच्याचा प्रश्‍न निकालात निघतो. एकंदरीत मोबाइल उपवास हे येऊ घातलेल्या आजारावरील पथ्य होणार हे निश्‍चित.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)