कलंदर: मतदान?

file photo

उत्तम पिंगळे

परवाच एका स्नेह्यांकडे गेलो होतो. त्यांच्या नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच संपली होती व उमेदवारांची विजयी मिरवणूक चालू होती. ढोल ताशे गुलाल उधळून डीजेच्या आवाजात त्यांच्या घरासमोरून मिरवणूक जात होती. मला म्हणाले आमचा माणूस निवडून आला. मी त्यांना चांगलाच ओळखत होतो म्हणून मी म्हणालो, हा थोडाच तुमच्या पक्षात आहे? अहो पक्ष वगैरे सर्व विधानसभा लोकसभा यावेळी ठीक आहे स्थानिक पातळीवर पक्ष वगैरे असे काही नसते. आम्हाला जो काही देणार तोच आमचे मत घेणार. मी म्हणालो, तुमच्या सारखे सुशिक्षित लोकही असं म्हणतात? त्यावर ते म्हणाले सर्व उमेदवार प्रचार करून गेले माझा पक्षही येऊन गेला त्याच्या समोर मी आमच्या लोकांनाही मत देण्यास सांगितले पण पुढे काही नाही. मी म्हणालो, पुढे म्हणजे? आमच्या सोसायटीची मीटिंग झाली होती जो उमेदवार आपल्या सोसायटीच्या दोन्ही इमारती बाहेरून रंगवून देईल त्यालाच मत द्यायचे. ते या उमेदवाराने केले व सोसायटीची एक गठ्ठा मते यालाच मिळाली.

मग मी विचार करू लागलो सुशिक्षित व नोकरदार वर्ग असा विचार करत असेल तर गरिबांचे काय? ग्राम व जिल्हा पातळीवर अशी मते विकली जातात हे ऐकले होते तेथे पक्ष गौण ठरतो. आज आपण पाहतो गरिबी व बेकारीमुळे अनेक ठिकाणी झोपडपट्टीवर अनधिकृत घरे मोठमोठ्या पक्षांच्या नेत्यांच्या आशीर्वादानेच उभी असतात. अशातील मतदार आपले मत विकू लागले आहेत त्यांच्या दृष्टीने कोणी का निवडून येइना. मला काय फरक पडणार आहे? मला आज तर पैसे मिळत आहेत हा विचार दृढ होत चाललेला आहे. त्यामुळे निवडणूक लढणार-यालाही आता पाण्यासारखा पैसा ओतावा लागत आहे. कार्यकर्ते (कित्येक वेळेला तेही भाडोत्रीच) त्यांचे खाणे पिणे त्यांच्या गाड्या त्यात पेट्रोल डिझेल टाकणे, स्थानिक वस्तीला जेवणावळ घालणे यातच प्रचंड खर्च होत आहे. पूर्वीसारखे मोठमोठी पोस्टर्स व प्रचार रॅलीज कमी होउन थेट व्यवहार बघितला जात आहे.

अशा वेळी निवडणूक खर्च प्रचंड वाढून (अर्थात हा बेकायदेशीरच आहे जो रोख व्यवहार, वस्तू,सेवा यामार्फत केला जातो) सामान्य माणूस ही निवडणूक लढू शकत नाही. एखाद्याला वाटले की आपण खूप काम करतो व त्याला पैशाचे पाठबळ नसेल तर तो स्वतःचा पैसा खर्च करतो व जर तो कमी पडला तर बाकी आयुष्यातून उठतो. सर्व जमापुंजी खर्च होऊन तो रस्त्यावर येतो. बरं आता यातून जे खर्च करून जिंकलेले आहेत ते चॅरिटी म्हणून थोडेच काम करणार आहेत? आपण केलेल्या खर्चाची दामदुपटीने वसुली करणे व पुढील निवडणुकीसाठी पैसा तयार करणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते. मग कित्येक वेळी विकासाची सुमार कामे दाखवली जातात व निधी हडप केला जातो. बरं असे मत विकून आपण त्या उमेदवारांना जाबही विचारू शकत नाही कारण त्यांच्या दृष्टीने तो एक व्यवहार असतो. निवडून आल्यावर उमेदवाराने कसे वागायचे हे तो ठरवत असतो तुम्ही नव्हे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)