कलंदर: भौतिक भव्य ?

उत्तम पिंगळे

दोन दिवसांपूर्वी दोन वेगवेगळ्या बातम्या होत्या. पहिल्या बातमीत चीनमधील सर्वात मोठ्या पुलाचे उद्‌घाटन व दुसरे मुंबई समुद्रातील शिवस्मारक उद्‌घाटनाच्या आदल्या दिवशी बोट बुडून एकाचा मृत्यू व उद्‌घाटनाचा कार्यक्रम स्थगित. मी प्राध्यापक मराठमोळ्यांच्या घरी गेलो होतो प्राध्यापक पेपर वाचत होते. त्यांच्यापाशी हा विषय काढला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राध्यापक म्हणाले, मी व्यक्तिश: अशा भव्य स्मारकांच्या विरोधात आहे. मी जागेवरच उडालो. प्राध्यापक म्हणाले, माझ्या मते अशी स्मारके बांधून लोकांना जर प्रेरणा देता आली असती तर सर्वात श्रीमंत देशांनी कित्येक अशी स्मारके उभारली असती. त्यावर मी म्हणालो की, आहेत ना अशी कित्येक देशात स्मारके.त्यावर ते म्हणाले, आहेत काही ठिकाणी पण आपण आपल्या देशापुरता विचार करू या. अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून सांगतो बाबासाहेबांच्या “स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चा खर्च सहाशे कोटींच्या वर जाणार आहे. समुद्रातील शिवस्मारकाचा खर्च तीन हजार कोटींच्यावर जाणार आहे.

पटेलांच्या “स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा खर्चही तीन हजार कोटींच्या वर जाणार आहे. आशा रितीने सुमारे सात हजार कोटी प्रस्तावित खर्च आहे. प्रत्यक्ष स्मारके साकार होईपर्यंत कितीतरी वाढेल. मला स्वतःला या तीनही महान नेत्यांबाबत अत्यंत आदर आहे. तसेच इतरही अनेक नेत्यांबद्दल माझ्या मनात नक्कीच आदर आहे. शिवरायांनी आपल्या पराक्रमाने स्वराज्य निर्माण केले. आजही आपण त्या शिवशाहीची आठवण काढत असतो. राजांच्या राज्यात शिस्त होती गुन्हेगारास कोणत्याही प्रकारची दयामाया मिळत नसे मग तो कोणीही आप्तस्वकीय असला तरी. बाबासाहेबांनीही आपल्या कार्यकर्त्यांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला होता. सरदार पटेल तर पोलादी पुरुष म्हणून जाणले जातात.

त्यांच्यामुळे स्वातंत्र्योत्तर भारतातील संस्थाने देशामध्ये विलीन झाली. आपापल्या कामामुळे हे तीनही नेते महान बनले. आपण यांच्याकडून काय घेतले? जातीयवाद, प्रांतवाद, धार्मिकवाद अजूनही चालूच आहे. कायद्याचा धाक किती आहे आणि कुणाला आहे ते आपण पाहातोच. आजही किती तरी अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरत आहेत. मग या सर्वांनी दिलेली शिकवण गेली कुठे? तसेच या सर्व स्मारकांच्या बाबतीतही अनेक वाद उसळलेले होते व अजूनही चालू आहेत. मग अशी स्मारके बांधून आपण त्यातून नक्की काय मिळवणार आहोत?

आज देशाची वाटचाल हळूहळू भांडवलशाही कडे जात आहे असे वाटते. देशातील अब्जाधीश व कोट्यधीशांची संख्या वाढली पण गरीब श्रीमंतांतील दरीही प्रचंड वाढली आहे व ते सामाजिकदृष्टया योग्य नव्हे. कुपोषण, दुष्काळ, वीज व पाणीपुरवठा दळणवळण या बाबतीत अजूनही बराच पल्ला गाठावयाचा आहे.वार्षिक ऑक्‍सफॅम सर्वेक्षणात भारताच्या बाबतीत असे आढळून आले की एक टक्के लोकांनी 73 टक्के संपत्तीतील वाढ गटवली आहे. तसेच 67 कोटी गरिबांचे उत्पन्न जेमतेम एक टक्‍क्‍याने वाढले.

अशा वेळी मतांचा बाजार व लोकांच्या भावनेला हात घालून इतरांवर कुरघोडी करण्याकरिता अशी भव्य स्मारक उभारणे योग्य नव्हे. या भव्य स्मारकांचा तळागाळातील 67 कोटी गरीब लोकांना नक्की काय फायदा होणार आहे? उलट हीच संपत्ती कृषी,आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास व रोजगार या करता वापरली तर या महान नेत्यांच्या आत्म्यांसही आनंदच होईल. दुसरीकडे चीनमध्ये कोणताही मोठा गाजावाजा न होता समुद्रावरील सर्वात मोठा पंचावन्न किलोमीटरचा पूल लोकार्पण झाला. यातील सुमारे सात किलोमीटर समुद्राखालून आहे याच्यासाठी सव्वा चार लाख टन लोखंड वापरले गेले व पुलाचा खर्चही भारतीय चलनात सुमारे दीड लाख कोटी आहे. अर्थात तेथेही समर्थक व विरोधक आहेत. पण त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी रोजच्या जाण्या येण्याकरता होणार आहे हे निश्‍चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)