#कलंदर: बाप्पा एसटीला पाव रे ! 

संग्रहित छायाचित्र
– उत्तम पिंगळे 
कोकणी माणसाला गणेशोत्सव आणि होळी या दोन सणांचे प्रमुख महत्त्व. चाकरमानी मुंबई व विविध ठिकाणाहून या दोन सणांच्या वेळी आपल्या गावी जाणारच. नेहमीप्रमाणे एसटी प्रशासनाने या वेळी 1750 जादा विशेष गाडया ठेवल्या व त्या फुल्लही झाल्या. कोकणातील विशिष्ट अशा भौगोलिक परिस्थितीमुळे चाकरमान्यांना आजही एसटीच आपली वाटत असते. यावेळी विशेष सोडल्या जाणाऱ्या गाड्या या मागणीप्रमाणे जनतेच्या गावापर्यंत थेट जातात.
रेल्वे जरी स्वस्त असली तरी आपले सर्व सामानसुमान घेऊन रेल्वे स्टेशनवर उतरून पुढे आपल्या गावापर्यंत जाणे हे खूप अवघड, कष्टाचे व खर्चिक असते. म्हणूनच चाकरमान्यांना एसटीचाच आधार वाटत असतो. बरे यातून काही एसटीचा विशेष फायदा होत असेल असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण येताना या गाड्या सगळ्या रिकाम्याच परत येतात. नंतर परतीसाठी गाड्या पाठवाव्या लागतात म्हणजे एकूणच एकावेळी जाऊन येऊन येण्याच्या ट्रिपला एसटीला दोन वेळा जावे लागते. अर्थात प्रवाशांच्या सेवेसाठी म्हटल्यावर एसटी तो भार नेहमीच उचलत असते.
आता एसटीकडे पाहता जवळजवळ तीन हजार कोटींच्या आसपास संचित तोटा आहे व तो दर वर्षी वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासकीय खर्च, इंधन खर्च व दुरुस्तीचा खर्च. यामध्ये सुधारणा केली असता एसटीचा तोटा निश्‍चित कमी होऊ शकतो. अर्थात यासाठी योग्य असे नेतृत्व एसटीला हवे तसेच केवळ टाइमटेबलप्रमाणे गाड्या सोडणे व अंदाज पाहून गाड्या सोडणे हेही महत्त्वाचे आहे. कामगारांचे वेतन वाढलेले आहे, इंधनवाढ प्रचंड झाली आहे तसेच खराब रस्त्यांमुळे दुरुस्तीचे कामही वाढत आहे. त्याचप्रमाणे कोणताही संप बंद वा रास्ता रोको म्हणला की सर्वात प्रथम एसटीवर दगडफेक, तोडफोड व जाळपोळ होत असते त्यातही प्रचंड नुकसान होत असते. हायवेवरील टोल वसुली यामुळे एसटीचा तोटा वाढत आहे.
दूरगामी विचार करून योग्य अशा व्यावसायिक दृष्टिकोन घेतला असता सर्वांच्या उपयोगी पडणारी एसटी हे ब्रीद वाक्‍य कायम ठेवूनही विकास होणे शक्‍य आहे. सरकारने योग्य पावले उचलणे आवश्‍यक असून नाहीतर हा केवळ पांढरा हत्ती अधिक अवजड होत जाईल. सध्याच्या सोयी सवलतींना कात्री न लावता एसटीचा योग्य असा विकास होऊ शकतो. यासाठी एसटी प्रशासनाने त्यांच्या सध्याच्या जागा स्वतः विकसित करण्याची गरज आहे.
सर्वसाधारण पणे सध्याची एसटी स्थानके ही बहुतेक त्या त्या शहराच्या किंवा गावाच्या मोक्‍याच्या ठिकाणी आहेत. या सर्व स्थानकांचा आधुनिकपणे विकास करणे सहज शक्‍य आहे. यासाठी उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सल्लागार व त्यांच्या सह उत्कृष्ट बांधकाम करणाऱ्या कंपन्या जसे टाटा, गोदरेज यांचे सहकार्य घेऊन ही सर्व स्थानके आधुनिक बनवणे. आजकाल बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान सहजपणे उपलब्ध आहे. अशावेळी सध्याचे स्थानक एकदम सुटसुटीत बनवून त्याच्या वरती बांधकाम करून त्यावर हॉटेल्स, मॉल, वेगवेगळी व्यावसायिक कार्यालये व मोठी दुकाने, थिएटर, बॅंका, विमा कंपन्या यांना भाडेतत्त्वावर देणे सहज शक्‍य आहे.
एसटीने यासाठी सुरुवातीला काही मोजकी स्थानके पायलट प्रोजेक्‍ट म्हणून करून पाहावी. प्रवाशांवर कोणताही बोजा न टाकता ही स्थानके आधुनिक करणे शक्‍य आहे. बहुतेक जागा मोक्‍याच्या असल्याने त्यांना नक्‍कीच डिमांड आहे. एसटीने स्वतःच यासाठी एक उपकंपनी काढून केवळ याच प्रोजेक्‍टवर लक्ष द्यावे. अशी कंपनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातून कमीत कमी व्याजाने कर्ज उभारू शकेल. टाईम बाऊंड असा प्रोजेक्‍ट करून हळूहळू सर्व स्थानके अशा पद्धतीने आधुनिक केल्यास एसटी निश्‍तितपणे तोट्यातून बाहेर येऊ शकेल. आपणास काय वाटते?

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)