#कलंदर: बदल? 

– उत्तम पिंगळे 
परवाच्या रविवारची गोष्ट. रविवार असूनही तसे ते दोघे लवकरच उठले. कारणही तसेच होते.त्याच्या आई वडिलांची तिथी होती. सन 2013 ला चारधामच्या महापूरात त्या दोघांचा मृत्यू झाला होता. या दोघांना राहून राहून तेच वाटत असे की आपण अगदी हौशीने चार धामच्या यात्रेला पाठवले आणि नंतर अपघातात ते दोघेही गेले. त्या दोघांच्या मनात अपराधीपणाची भावना कायम राहिली होती. तेव्हापासून पितृपक्षाला त्यांच्या तिथीला म्हणजेच पंचमीला दोघं आवर्जून ताट ठेवत असत. अगदी दोघंही ऑफिसला सुट्टी घेऊन पंचमीला ताट ठेवत असत. यावेळी पंचमी नेमकी रविवारी असल्यामुळे सुट्टीचा प्रश्न नव्हताच. आंघोळ वगैरे झाल्यावर तिनं श्राद्ध स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. थोड्या थोड्या प्रमाणात बाकीच्या वस्तू करण्यास सुरुवात केली. तो ही तिला यथाशक्ती मदत करत होता. तांदळाची खीर, गवार भोपळ्याची भाजी, कारल्याची भाजी, कढी, आमसुलाची चटणी हे पदार्थ अगदी अल्प स्वरूपात तयारही केले.
थोड्याच वेळाने म्हणजे साधारण नऊच्या आसपास त्यांची मुलगी नेहा उठली. ती सातवीत आहे. सन 2013 ला ती पहिलीतून जेमतेम दुसरीत गेली होती. आजी आजोबांची अतिशय लाडकी होती. पण गेली पाच वर्षे आजी आजोबा नसल्यामुळे एक केअर टेकर त्यांच्या घरी येत असे. ते दोघेही ऑफिसला जायच्या आत म्हणजे बरोबर सकाळी आठ वाजता त्या केअरटेकर बाई येत असत. त्या विधवा होत्या व ओळखीच्या होत्या त्यांचा मुलगा व सून बेंगलोरात असल्यामुळे मुंबई त्या एकट्याच असत. मग रोज सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत यांच्याकडेच असत. सकाळचे जेवण यांच्याकडेच होत असे. मग नेहाला शाळेत पाठवण्यापासून व सायंकाळी पाचला नेहा परत येईपर्यंत त्यांची जबाबदारी असे. आज रविवार असल्याने त्यांना सुट्टी होती.नेहाने सकाळी उठल्या उठल्या बाबांना सांगितले की काल तुम्ही कबूल केल्याप्रमाणे आज मला पिझ्झा हवा आहे.त्याप्रमाणे ऑनलाइन ऑर्डरही दिली गेली.
तिने नंतर नेहमीच्या जेवणासाठी पोळी भाजीही केली कुकर तर तयार होताच कारण बाहेर पान ठेवायचे असल्यामुळे त्यामध्ये भात व वरण होतेच. साडेअकराच्या सुमारास डिलिव्हरी बॉय नेहाच्या आवडीचा मेक्‍सिकन पिझ्झा घेऊन आला. मग सर्वजण जेवणाची तयारी करु लागले. प्रथम श्राद्ध स्वयंपाकाचे पान व्यवस्थित वाढून तयार केले. नंतर ते बाहेर ठेवले. तिथेही तिघांनी मनापासून नमस्कार केला. नंतर तो काव काव करत हाळी मारली. थोड्याच वेळात तेथे दोन कावळे हजर झाले. सुमारे 15 मिनिटे तिथेच घुटमळत राहिले पण वाढलेल्या पानाला त्यांनी काही चोच लावली नाही. शेवटी ते दोघे आत निघून गेले. त्यामुळे तरी कावळा पानाला शिवेल, असे त्यांना वाटले. शेवटी ती म्हणते की, दोघांचेही पान वाढते.
“आज तुमचे आई बाबा काही पानाला चोच लावत नाहीत.’ नेहा ऐकत असते. तिने आपला गरमगरम पिझ्झा बाहेर काढला व खाऊ लागली. अचानक ती म्हणाली की, “मी माझ्यातील पिझ्झा बाहेर आजी आजोबांना देऊ का? त्यावर ते दोघेही म्हणाले, “अगं आजी-आजोबा असलं काही खात नव्हते.’ पण तरीही तिने हट्ट केला व शेवटी दोन छोटे तुकडे एका वाटीत घेऊन तिने बाहेर त्या पानाजवळ ठेवले. आणि काय आश्‍चर्य केवळ एका मिनिटात त्या दोन्ही कावळ्यांनी पिझ्झाचे दोन्ही तुकडे खाले. तसेच पानाला थोडेसे तोंड लावून भुर्रकन उडून गेले. ते दोघेही एकमेकांकडे पाहात राहिले. मग त्यालाही पटले की, त्याचे आई-वडील खरे प्रॅक्‍टिकल होते. त्याला असे वाटले की, पितरांसाठी श्राद्ध स्वयंपाकच केला पाहिजे असे काही नाही. आपण जे खातो तेच आपण जर का पितरांना दिले तर काय हरकत आहे?
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)