#कलंदर: फ्रेंडशिप डे ! 

 उत्तम पिंगळे 
आभासी चलन जसे असते ना म्हणजे “बिटकॉइन’ वगैरे, तशीच आभासी भेटही होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? मग वाचा. त्याला कारणही तसेच आहे. जळगाव, सांगली महापालिकेत “वर्षा’वरील सुभेदाराचा एक हाती विजय झाल्यामुळे सहकारी मित्र पक्ष म्हणून (कागदोपत्री तरी) असल्याने उधोजीराजांनीही सुभेदारांना फोन केला व अभिनंदन केले. सुभेदारांनीही त्यांचे आभार मानून त्यांच्याकडे रविवारी रात्री भेट घेण्यासाठी वेळ मागितली. उधोजीराजांनीही नकार देण्याचे काही कारण नव्हते. त्यांनी वेळ दिलीही. उधोजीराजांच्या दरबारी सकाळपासूनच सर्व सरदारांची वर्दळ वाढत गेली कारण “फ्रेंडशिप डे’ जरी इंग्रजी असला तरी सर्व सरदारांना त्यानिमित्ताने दरबारी जाऊन साहेबांना भेटता आले. रात्री दहापर्यंत वर्दळ होती. नंतर सर्वत्र सामसूम झाले. उधोजीराजे येरझाऱ्या घालत होते.
छात्र युवराज : डॅड, काही विचार करत आहात का?
उधोजीराजे : (लक्ष न देता) अं…हं… (“वर्षा’वरील सुभेदार गाडीतून येतात व आत शिरतात)
सेवक : साहेब, सुभेदार साहेब आले आहेत.
उधोजीराजे : जय महाराष्ट्र पुन्हा एकदा अभिनंदन, या बसा.
सुभेदार : धन्यवाद, मग. छात्र युवराज! कसे काय चालले आहे?
छात्र युवराज : कॉलेजेस चालू झालेली आहेत. युवकांकडून नवनवीन प्रयोग करायचे आहेत.
सुभेदार : उधोजीराजे, आपल्या सरकारच्या कामामुळे आम्हास दोन्ही ठिकाणी विजय मिळाला.
उधोजीराजे : हं… बरोबर आहे.
सुभेदार : मी एवढ्याकरिता आलो आहे की आपण आपापले लढूनही एवढा मोठा विजय झाला जर आपण एकत्र लढलो असतो, तर खूप मोठा विजय झाला असता.
उधोजीराजे : हं… म्हणता ते खरे आहे…
सुभेदार : तसे नव्हे थोरले महाराज व महाजन काका असताना असे कधी झाले नाही व आपापसात त्यावेळीही मतभेद होते. पण ते येथेच सोडून द्यायचे.
उधोजीराजे : होय. पण कित्येक बाबतीत परस्पर निर्णय घेतले जात आहेत त्याचे काय?
सुभेदार : नाणारबाबत ना? हे बघा मी अजूनही सांगितले आहे की तो प्रकल्प लोकांच्या माथ्यावर मारला जाणार नाही. सर्वांचे मतभेद व सर्व शंका यांचे निरसन करूनच निर्णय घेऊ.
उधोजीराजे : आम्ही या बाबतीत आमच्या सरदारांशी विचारविनिमय करू.
सुभेदार : मी स्वतः या बाबीत लवचिक धोरण अवलंबले आहे आणि तसे वेळोवेळी दाखवलेही आहे (इतक्‍यात कॉफी येथे होती सर्व पिऊ लागतात) या ठिकाणाचा इतिहासच असा आहे की येथे सर्व मतभेद मिटवले जातात म्हणून मी मंत्रालय सोडून येथे आलो आहे.
सुभेदार : ठीक आहे. येतो आम्ही. पुढील वर्षी निवडणुका आहेत त्याची सुरुवात आतापासूनच करावी लागेल. (छात्र युवराजांकडे पाहात) आज “फ्रेंडशिप डे’ असल्यामुळे आजचा मुहूर्त गाठून मी आलो आहे. आपापसातील मतभेद आपणच मिटवले तर बरं होईल. (थोरल्या महाराजांच्या फोटोला मुजरा करून सुभेदार निघून जातात).
छात्र युवराज : डॅडी. काय निर्णय घेतला? मला त्यांचे म्हणणे पटले आहे. तुम्ही काय निर्णय घेताय, ते सांगा. गुडनाइट डॅड.
(हॅप्पी फ्रेंडशिप डे बोलायचे विसरल्याने छात्र युवराज सुभेदारांच्या मोबाइलवर एसएमएस पाठवतात)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)