#कलंदर: ‘पोच’ गायब… 

– उत्तम पिंगळे 
पुलंच्या ‘व्यक्‍ती आणि वल्ली’ मधील ‘सखाराम गटणे’ वाचत असताना ‘सेक्रेटरी या व्यक्ती विशेषणास ‘पोच’ असता कामा नये असा अलिखित नियम आहे असे वाटते’ अशा आशयाचे वाक्‍य होते व त्यातील ‘पोच’ शब्द माझ्या चांगला लक्षांत राहीला. मग परवा प्राध्यापक मराठमोळ्यांकडे गेलो. पाऊसपाणी, केरळमधील पूर अशा चर्चा झाल्या. अचानक प्राध्यापक म्हणाले, अलीकडच्या नेत्यांना ‘पोच’ नाही. मी विचारले म्हणजे नेमके काय? त्यावर माझ्याशी ते विस्तृत बोलले.
एखाद्या पदावर किंवा वयानुपरत्वे व्यक्‍ती समजूतदार बनते व कुठे कधी कसे वागावे याची त्याला चांगली जाणकारी होते त्याला ‘पोच’ म्हाणतात. अलीकडे अटलजींना श्रद्धांजली देण्यासाठी औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी शोक प्रस्तावाला विरोध केला. मग झालेली मारहाण वगैरे पाहता, ‘या सदस्याला ‘पोच’ नाही’, असे ते म्हणाले. मुळातच आपल्या संस्कृतीमध्ये मरणानंतर वैरभाव संपतो असे सांगितले आहे. त्यामुळे खरेतर अटलचीच काय पण इतर कोणाच्याही बाबतीत असा शोक प्रस्ताव एकमताने संमत होत असतो. अटलजी अजातशत्रू होते विरोधकांमध्ये देखील त्यांना कुणी शत्रू नव्हते. अशावेळी औरंगाबादेत झालेला प्रकार नक्कीच भूषणावह नाही.
लोकशाहीत प्रत्येकाचे स्वतःचे असे मत असते हे मान्य. आपल्या देशाची घटनाही आपण ब्रिटनच्या घटनेवरून घेतलेली आहे. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मोठया अक्षरात असे लिहिले आहे की, “मला तुझ्या मतांबद्दल अत्यंत घृणा आहे पण तुझे ते मत तुला मांडू देण्यासाठी मी माझ्या प्राणांची बाजी लावेन,’ अशा अशयाचे ते आहे. पण याच ब्रिटनमध्ये काही लोकांनी व गटांनी माजी प्रधानमंत्री मार्गारेट थॅचर यांच्या 2013 साली निधनानंतर आनंदोत्सव साजरा केला. मिठाई वाटली. आपल्याकडे असे होईल का? असा प्रश्‍न मला केल्यावर मी नकारार्थी मान डोलावली. त्यावर ते पुढे म्हणाले, “म्हणजे या गटाला किंवा समूहाला ‘पोच’ नव्हती.’ कारणे काहीही असोत. थॅचरबाईंनी खाजगीकरण केले, अंमलीपदार्थ बंद केले, तसेच त्यांच्या कारकिर्दीत प्रदीर्घ लांबलेला खाण कामगारांचा संप. पण तरीही सलग तीन वेळा त्या प्रधानमंत्री झाल्याच. सलग अकरा वर्ष राज्य केले.
आपण पाहतो की आता सामाजिक वातावरण बदलत चालले आहे. नवनवीन तरुण मंडळी नगरसेवक, आमदार, सचिव, प्राध्यापक, न्यायाधीश असे बनत असताना त्यांच्यामध्ये ते पद घेण्याची ‘पोच’ कमी पडत आहे. ज्ञान आणि ‘पोच’ यांची कृपया गल्लत करू नये. ज्ञानी माणसाला ‘पोच’ असतेच असे नाही; तसेच अज्ञानी, अडाणी माणसासही ‘पोच’ असू शकते. सभोवारच्या परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे तसेच आपण यांमध्ये कोणत्या भूमिकेतून काम करीत आहोत व कोणत्या पदावर आहोत याचा सखोल विचार करणे आवश्‍यक आहे.
इतर मोठमोठ्या व्यक्ती त्या त्या पदावर कशा वागतात. त्यांचे सामाजिक वर्तन कसे असते याचा अभ्यास नवीन पदाधिकाऱ्यांनी करणे आवश्‍यक आहे. दुर्दैवाने बऱ्याच ठिकाणी नवीन पिढीलाही ‘पोच’ कमी पडताना दिसत आहे. मग आपण पाहतो की एखाद्या अशा पदाधिकाऱ्यास त्याच्या पाठीमागून लोकं जोकर वगैरे काही म्हणत असतात ते ‘पोच’ नसल्यामुळेच. म्हणून नवीन पिढीने ती ‘पोच’ अंगीकारणे आवश्‍यक आहे जेणे करून औरंगाबाद सारखे प्रकार पुन्हा होणार नाहीत. आपणांस काय वाटते?

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)