कलंदर: पाणी अडवा त्यांची जिरवा

उत्तम पिंगळे

परवाच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो. पुलवामा हत्याकांडामुळे पाकविरुद्ध उचलल्या जाणाऱ्या कारवाया व सिंधू नदीचे पाणी अडवण्याची शक्‍यता वाचली व मी त्यांना विचारले…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी : काय साहेब, आपण हे पाकला जाणारे पाणी अडवले तर पाक वठणीवर येईल की नाही?
विसरभोळे : असे तुम्ही सहजासहजी करू शकत नाही. कारण आपण पाकशी तसा करार केलेला आहे व त्यातून कधीही तंटा निर्माण झालेला नाही.
मी : मग या अतिरेकी कारवाया चालू आहेत आणि आपण गप्प बसायचे का?
विसरभोळे : तसं नव्हे. आता सरकार योग्य तो निर्णय घेईल. पण कराराशी फारकत घेऊन चालणार नाही.
मी : म्हणजे पाकने काहीही केले तरी आपण करार आहे, म्हणून गप्प बसायचे?
विसरभोळे : हे बघा 1960 च्या सिंधू करारानुसार पाणी कसे, कोणी, किती वापरायचे स्पष्ट केलेले आहे व ते दोन्ही सरकारांनी मान्य केले आहे
मी : मग मला सांगा 1972 ला आपण सिमला करारही केला आहे. त्यावेळी काश्‍मीर विषय हा द्विपक्षीय चर्चेने सोडवावा असे नमूद केलेले आहे. तसेच कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा, देशाचा वा अगदी यूएनचाही त्यात हस्तक्षेप नसावा, असे स्पष्ट केलेले आहे. असे असताना पाक वारंवार तो संयुक्‍त राष्ट्रांमध्ये उपस्थित करत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंना शस्त्रसंधी लागू आहे. कोणीही एकतर्फी सैनिकी कारवाई करू शकत नाही. पण ही शस्त्रसंधी आता थट्टेचा विषय झाली आहे. दिवसातून किती तरी वेळा पाक त्या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असतो. मग आपण सिंधू करार का पाळावा?
विसरभोळे : आपले म्हणणे जरी बरोबर असले तरी आपण हा करार एकतर्फी बदलू शकत नाही. मग पाक व आपल्यामध्ये फरक तो काय? म्हणजे आपण पाक करीत असलेल्या गोष्टी सहन कराव्यात असे नाही. इतरही व्यासपीठे आहेत जेथे हा मुद्दा पण उपस्थित करू शकतो. तसेच कूटनीतीने इतर देशांच्या मदतीने आपण पाकवर दवाव अणू शकतो व तसे आपण करीत आहोतच. व्यापारी संबंधही आपण संपुष्टात आणू शकतो. आपण पाहात आहोत की भारतातून धान्य, फळे, भाज्या यांची पाकिस्तानला निर्यात बंद झाल्याने तेथे महागाई वाढत आहे. अर्थात, या सर्वांचा त्रास सामान्य लोकांना होणार आहे.
मी : तुम्हाला पाक जनतेचा कळवळा आहे?
विसरभोळे : तसं नाही. पण आपल्या देशात फुटीरवादी पोसले जात आहेत त्यांचे काय? आता त्यांच्या सुविधा काढून घेतल्या जात आहेत म्हणा.
मी : म्हणजे आपण करार मोडू शकत नाही?
विसरभोळे : नाही. तुम्ही नीट पाहा मूळ सिंधू नदी तिबेट पठारातून म्हणजेच सध्याच्या चीनमधून उगम पावते. तेथून पूर्वेकडील काश्‍मीरकडून पश्‍चिमोत्तर काश्‍मीरपर्यंत वरच्या बाजूला जाते व तेथून सरळ खाली पूर्ण पाकिस्तान पार करून कराची जवळून अरबी समुद्राला मिळते. अर्थात त्यात भारतातून उगम पावणाऱ्या चिनाब, रावी, सतलज पाकमध्ये याच नदीला जाऊन मिळतात. आता या करारामध्ये चीन कुठेच नाही. मग उद्या चीनने सिंधूचे पाणी रोखून चीनमध्ये वळवले तर सिंधू नदीच्या प्रवाहावरही परिणाम होईल त्याचे काय? पाक व चीनचे आजचे संबंध बघता हे सहज शक्‍य आहे. म्हणून कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करावी लागत असते. राजकारण कशावरही करता येते. उलट आपण आपलेच वीस टक्के पाणी पूर्णपणे वापरले नाही, त्याचे काय? आपल्यावर होत असलेल्या हल्ल्यांवर सध्या तरी कूटनीती, आंतरराष्ट्रीय दबाव, व्यापारी व सांस्कृतिक आदान-प्रदानावर बंधने व शेवटचा उपाय अगदी लष्करी कारवाईही होऊ शकतो. पण पाणी थांबवणे हा उपाय नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)