कलंदर: पत्रास कारण की…

उत्तम पिंगळे

तीर्थस्वरूप काका यांसी,
साष्टांग नमस्कार. गेल्या अनेक आघाडयांवर सरकार पुरून उरले आहे, तसेच आगामी निवडणुका लक्षात घेता पुढील दिशा काय असावी, याकरता आपले मार्गदर्शन हवे आहे, म्हणून हा पत्रप्रपंच. आम्ही तिघे अचानक एकत्र भेटलो असल्यामुळे आपणास पत्र पाठवावे हा विचार आला. काही वेगळे आंदोलन करावयाचे असल्यास तसे सांगावे आमच्याकडे सध्या ऊसदर व अल्पसंख्याकांचे प्रश्‍न असे विषय दिसत आहेत. आपण सांगाल त्याप्रमाणे त्या दिशेने मी मार्गक्रमण करू.
आपले,
धनाजी (बीड),
दादासाहेब (पुणे)
इंजिनराज (मुंबई )

काकासाहेब बारामतीकर यांनी
ताबडतोबीने तिघांना उत्तरे दिली…
चि. धनाजी (बीड) यास,
अनेक आशीर्वाद. आपण आपल्या पक्षाचा परिषदेतील बुलंद आवाज आहात. आज आपले काका हयात नाहीत. त्यांनी जो कार्यकर्त्यांचा संच घडवला तो बहुतेक आपल्या बहिणाबाईंकडे आहे. त्यामुळे घरगुती वाद चव्हाट्यावर न आणता आपण तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करावे. आपल्या बहिणाबाई काही साध्यासुध्या नसून त्यांनी अलीकडेच ते जाहीरपणे सांगितले आहे तरी या वादाला बगल देऊन कार्य करणे आवश्‍यक आहे. सरकार प्रमुखांना त्यांना सल्ला देणारे असे काका नसूनही ते काम उत्कृष्ट करत आहेत, याची नोंद घ्यावी त्यामुळे आपणास किती काम करावयाचे आहे ते समजेल. कळावे.
आपले,
काका.
चि. दादासाहेब (पुणे)
अनेक आशीर्वाद. आपण आपल्या पक्षातील योग्य कार्यकर्त्यांना पुढे आणून त्यांच्या कामाचे चीज होईल असे त्यांना वाटले पाहिजे, असे कार्य करणे आवश्‍यक आहे. सध्या आपली ग्रहस्थिती योग्य नाही (म्हणजे मी तसे काही मानत नसलो तरी प्रसंगच असा आला आहे) सध्या अडचणीचा ग्रह आपल्या राशीकडे वळलेला आहे व त्यांची वक्रदृष्टी पडू शकते. म्हणून आपली प्रतिमा कशी स्वच्छ राहील ते पाहणे गरजेचे आहे. अशा वेळी सामान्य कार्यकर्ता आपल्या पाठीमागे उभा राहणे आवश्‍यक आहे. त्याची काळजी घ्यावी. तसेच आपली प्रकृतीही सांभाळावी.
(ता.क. आपण आपल्या चिरंजीवांस घाईघाईने लोकसभेचे तिकीट देण्याची मुळीच घाई करू नये.)
आपलेच
काका

चि. इंजिनराज (मुंबई )
अनेक आशीर्वाद. मागे दोन वेळा आपण जाहीर भेटलो, तसेच एकदा गुपचूप भेटलो. आपल्याला महत्त्वाचा निर्णय घेणे बाकी आहे. कार्यकर्त्यांनाही “इंजिन’ नेमके कोणत्या दिशेने जाणार आहे, ते समजत नाही. तसेच कितीही नाही म्हटले तरी इंजिनाच्या मागे नेमके किती डबे आहेत यावरच त्याचे मूल्य ठरत असते. मागील भेटीत मी आपणास निक्षून सांगितले होते की, आपण आमच्या आघाडीत सामील व्हावे. आपला पक्ष एका वेलीच्या स्वरूपात असून त्याला एका मोठ्या आधाराची गरज आहे. आघाडीत सामील झाल्यास आपल्याला सर्वत्र आधार मिळेल.
आपले… काका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)