#कलंदर: पडघम (निवडणुकांचे)… 

उत्तम पिंगळे 
आयोगाचा कोंबड्यांनं निवडणुकीची बांग दिली,
पक्ष कार्यालयांची कुंडी उघडली गेली।
खुर्च्यांवरील धुळीची झाडलोट झाली,
कुणी कशा तेथे गेले होते कधी?।।
‘जयपुरी’ प्रदेशात लगबग सुरू झाली,
नेते घालू लागले पारंपारिक वेश।
मोठमोठ्या पुढाऱ्यांसाठी,
आता म्हणू लागतील ‘पधारो म्हारे देस’ ।।
‘भोपाळ’ प्रदेशी झाल्या सुरू वाटाघाटी,
कुणाचेही कुणापाशी बने आता सूत ।
कोणतेच प्रश्न असणार नसतील,
तर काढतील उकरून ‘कार्बाइडचे’ भूत ।।
‘तेलंगणी’ राजा आता होई मनी खूश,
तारीख आल्याने जीव भांड्यात पडे ।
राज्यात आधी निवडणूक होईल,
म्हणून मनी आनंद कारण मनासारखे घडे ।।
‘मिझोरमी’ आता मनी चलबिचल,
एका हाती राज्य टिकवायचे कसे? ।
बाकी आजूबाजू कमळाची बाजी,
मनी म्हणून त्यांच्या काळजी वसे ।।
‘छत्तीसगडी’ अठरापगड जाती,
रमणासही ना कळे ठेवू कसा ताळमेळ ।
सर्वांशी एकत्र आणावे अशक्‍य,
तरीही लागे करावी संमिश्र ती भेळ ।।
‘हत्तीची’ साखळी तिकडे ‘माया’ सोडी,
म्हणे आता निवडणुकी धाव वेगे वेगे ।
‘कंदिलांच्या’ प्रकाशी यादव कुळ जाणे,
आपणही घ्यावी धाव लगबगे ।।
‘सायकलीचे’ स्वार तयार होऊ लागले,
पाहती तपासून हवा चाकातील ।
‘दीदींची’ वाचाळ वाणी सुरू होई,
हवे तसे शब्द सोडे मुखातील ।।
‘युवराज’ म्हणे मी तयार आहे,
सर्वांनी मज बसवावे प्रधानमंत्री ।
गुडघ्यांच्या बाशिंगधारी युवराजांना ना कळे,
बाकी सर्व तेथे पाताळयंत्री ।।
महाराष्ट्र देशी जाई पक्षांची मरगळ,
करण्या जो तो उठू लागे तयारी पक्की ।
कुणीही कोठेही उडी मारू पाही,
आतले आवाजे करी सीट पक्की ।।
‘इंजिनाची’ डागडुजीही करणे अपरीहार्य,
नाहीतर नक्की धावायचे ते कसे ।
‘घडयाळधारी हात’ मदत करू पाहे,
वाट पहात आहे इंजिन कैसे फसे ।
‘धनुष्याला’ आता पडू लागले कोडे, नक्की कोठे न्यावा मावळीचा थवा ।
‘छात्र युवराज’ झटके तो आळस,
नीटपणे पाहू लागले ‘टायरची’ हवा ।।
‘रामदासभाई’ कवी मोठे थोर,
त्यांनाही वाटे असावे कमळाशीच सूत ।
नाहीतर दुसरे भावंड तयांचे,
औरंगाबादी काढी जातीयतेचे भूत ।।
‘मुंबापुरीचा’ सरदार तो मूखी हसू लागे,
ठेवूनिया गाली नागपुरी संत्री ।
शेवटची खेळी अल्पावधीसाठी,
अतृप्तांच्या तृप्तीसाठी घडवणार मंत्री ।।

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)