#कलंदर: नोटबंदी फेल? 

– उत्तम पिंगळे 
मागील आठवड्यात नोटाबंदीवर उलटसुलट चर्चा होत गेल्या. रिझर्व्ह बॅंकेने घोषणा केली की 99.3 टक्‍के नोटा परत आलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे रविवारी प्राध्यापक मराठमोळे यांच्या घरी गेलो रिझर्व्ह बॅंकेने दिलेला कबुली जबाबावर प्रश्‍न विचारला.
प्राध्यापक म्हणाले, मुळातच नोटाबंदीचे जे ध्येय होते ते म्हणजे काळा पैसा गायब करणे, भ्रष्टाचार, बनावट नोटा व दहशतवाद्यांना मिळणारी मदत रोखणे. यापैकी केवळ बनावट नोटा बाहेर गेल्याचे आपण मानू शकतो. भ्रष्टाचार आपल्या देशाला पाचवीलाच पूजलेला आहे आणि एक कायदा निघाला की त्याला अंमलबजावणीपूर्वीच पळवाटा तयार होत असतात. मला कित्येकदा वाटतं की वकील वर्ग व सीए हे लोकांना कायदे पाळून कसे जगायचे की कायदे कसे मोडून सहीसलामत सुटायचे व पैसा कमवायचा ते शिकवतात ते कळतचं नाही. अर्थात सर्वच जण असे असतात असे नाही.त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
दहशतवाद्यांना पूर्वी जसा पैसा मिळायचा, तसाच आताही मिळेल उलट मी तर वाचले आहे की नवीन दोन हजाराच्या डुप्लिकेट नोटा जुन्या नोटांपेक्षा करणे सोपे आहे व तशा आल्याही आहेत. आता काळा पैसा जमा करणे म्हंटले तर जवळजवळ सर्वच पैसा बॅंकेत जमा झालेला आहे. मग काळा पैसा गेला कुठे? जनधन खात्यात सुमारे 80 हजार कोटी रुपये जमा झालेत ते कुणाचे होते? व ते परत काढले गेले का?ते काढताना काही आडकाठी आणली गेली की नाही ते पाहावे लागेल.तसेच इतर सर्व खात्यांत कोट्यावधी रुपयांची रक्कम जमा झालेली आहे ती तपासली गेली का? नाहीतर हा नुसताच फार्स झाला असे म्हणावे लागेल.
एकूण पैसा अर्थव्यवस्थेत जमा झाला हे चांगले झाले पण न्यात उत्पन्नापेक्षा किती तरी जास्त पैसा एखाद्या खात्यात आला असेल व त्याला काही विचारले गेले नसेल तर काळा पैसा आपोआप पांढरा झाला असे मानावे लागेल. म्हणजे विना कर पैसा पांढरा झाला. म्हणजेच ज्यांनी पैसे भरले त्याचे तीस टक्‍के पैसे अधिकृत वाढले असेच म्हणायला लागेल. असे पैसे जमा करणाऱ्यांवर काय कारवाई केली, ते कुठे नमूद केलेले नाही. विना कर पैसा अर्थव्यवस्थेत आलाच, तर मागणी वाढून महागाई वाढेल व तसेच झालेले आहे. यामध्ये सामान्य माणूस भरडला गेला हे नक्की. प्राध्यापकांचे आभार मानून निघू लागलो. मला आमच्या गण्याची आठवण झाली. तो दिल्लीत खास स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांना पाहायला गेला होता. नोटाबंदीने नाराज झाला होता आल्या आल्या त्याने गाणे सुरू केले…
नमो दर्शना जायाचं आणि जायाचं नी जायाचं 
आनंद पोटात माझ्या येईना रे येईना. 
आनंद पोटात माझ्या येईना रे येईना…धृ… 
गेलो दिल्लीपुरी थेट घेतली नमोची भेट 
या या डोळ्यांचा राग काही जाईना 
आनंद पोटात माझ्या येईना रे येईना… 
‘जॅकेट’ सावळे सुंदर गोजिरवाणे हे मनोहर 
नजरेत आणिक काही येईना. 
आनंद पोटात माझ्या येईना रे येईना… 
‘नोटाबंदीचा’ हा खेळ खेळे नमोजी प्रेमळ 
खेळ खेळोनी ‘ध्येय’ साध्य होईना. 
आनंद पोटात माझ्या येईना रे येईना… 
नारेबाज नमोदंग ‘प्यारे भाईयों’ अभंग 
या या वचनाची हौस पुरी होईना. 
आनंद पोटात माझ्या येईना रे येईना… 
आनंद पोटात माझ्या येईना रे येईना… 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)