कलंदर: नियमपालन

उत्तम पिंगळे

“यात्रियों कृपया ध्यान दे। डीजीसीए निर्देश नुसार श्रीनगर हवाई अड्डेसे उडान भरते एवं उतरने की स्थिति में सभी खिडकीयां बंद रखे। इसीलिए यात्रियों से अनुरोध है कि वह अपनी खिडकी बंद रखें।’ गेल्याच आठवड्यात श्रीनगर विमानतळावरून मुंबईकडे येताना ही सूचना आली. पुन्हा इंग्रजीतही घोषणा झाली. तरीही कित्येक प्रवाशांनी खिडक्‍या बंद न केल्याने मग विमान कर्मचारी तेथे जाऊन खिडक्‍या बंद करून घेत होते. दोन दिवसांपूर्वी जम्मू श्रीनगर मार्गावरही तिच परिस्थिती होती. मग प्रवासी कुतूहलापोटी हळूच खिडकी उघडताना दिसत होते व तेथे कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन सर प्लीज, मॅडम प्लीज… म्हणून त्यांना खिडक्‍या बंद करावयास लावत होते. मुंबईत उतरताना उलटी सूचना होती की, सर्व प्रवाशांनी आपापल्या खिडक्‍या उघड्या कराव्यात. मला यातील हे गौडबंगाल समजेना. मग मी परवाच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो व त्यांना हाच प्रश्‍न विचारला.

श्रीनगरमधून टेक ऑफ किंवा लॅंडिंगसाठी विमानातील प्रवाशांना खिडक्‍या बंद करा सांगतात व मुंबईत तेच त्या खिडक्‍या उघडण्यास सांगतात. प्राध्यापक म्हणाले की, गेल्याच महिन्यात त्यांचे एक डॉक्‍टर मित्र गेले होते. त्यांनाही हाच अनुभव आला होता. मग प्राध्यापकांनी त्यांना माहीत असलेला खुलासा केला. ते म्हणाले की, विमानाचे अपघात सर्वसाधारणपणे लॅंडिंग व टेकऑफ करताना जास्त होतात. अशा वेळी आपत्कालीन उपाययोजना करून प्रवाशांना बाहेर काढले जाते व त्यासाठी अवधी फक्‍त दीड मिनिट असतो. अशा वेळी तेथे जास्तीतजास्त उजेड असावा म्हणून सर्वच खिडक्‍या लॅंडिंग टेकऑफ वेळी उघड्या असाव्यात हा सर्वसाधारण जागतिक स्तरावर नियम आहे. भारतातही तोच नियम आहे फक्‍त जम्मू काश्‍मिरातील जम्मू, श्रीनगर व लेह या तीन विमानतळांच्या बाबत बरोबर उलटे आहे.

प्राध्यापक पुढे म्हणाले, पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राइक केला गेला व त्यानंतर जम्मू काश्‍मीरातील वरील सर्व विमानतळ काही काळ व्यावसायिक उड्डाणासाठी बंद केले होते. मग पुन्हा ते सर्व चालू केले त्यावेळी हा नियम आला. विमान कर्मचारी कोणतेही कारण सांगत नाहीत ते फक्‍त डीजीसीएची इन्स्ट्रक्‍शन आहे एवढेच सांगतात. प्राध्यापक पुढे म्हणाले की, त्यांच्या एकदा वाचनात आले की रक्षा मंत्रालयातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या आटीवर सांगितले की, मुख्य कारण म्हणजे सुरक्षाच आहे. काश्‍मीरातील विमानतळांची सुरक्षा कशी आहे, काय काय आयुधे कोठे कोठे ठेवली आहेत, सुरक्षाकर्मी कुठे आहेत (म्हणजे धावपट्टीलगत किती किती अंतरावर किती जण आहेत) हे कुणाला समजू नये हाच मुख्य हेतू आहे.

एवढी सुरक्षा असूनही कित्येक हल्ले अजूनही होत आहेत. याचा सरळ अर्थ आहे की आपल्याकडील काही फुटीरवादी गटांचा त्यांना पाठिंबा आहे. काही लोक प्रवासी बनून विमानातून प्रवास करताना खिडकीतून बाहेर संरक्षणासाठी काय काय खाणाखुणा आहेत ते टिपून वा मोबाइल व कॅमेऱ्याने फोटो व व्हिडिओ काढून गुप्तपणे लीक करू शकतात. म्हणून फोटोज्‌ व व्हिडिओज्‌ काढण्यासही मनाई आहे. म्हणूनच नागरी हवाई खात्याने हा नियम केला आहे. अर्थात अधिकृतपणे नक्‍की कोणीही दुजोरा देत नाही. देशातचा जागरूक नागरिक या नात्याने आपण जर काश्‍मीरला जात असाल तर केबिन क्रूने दिलेले निर्देश तंतोतंत पाळणे आपले कर्तव्य आहे. अशा ठिकाणीही काही लोक हळूच खिडक्‍या उघडत असतात व त्यांच्या मागे केबिन क्रू धावत असतात हे भूषणावह नाही. शेवटी देशाची सुरक्षा सर्वात मोठी आहे व त्याला कोणीही अपवाद नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)