कलंदर: नवे आणि जुने…

उत्तम पिंगळे

नेहमीप्रमाणे 2018 ने नवीन येऊ घातलेल्या 2019 ला नवीन वर्षाची सूत्र सुपूर्द केली. म्हणजे नाट्य किंवा साहित्य संमेलनाचे जुने अध्यक्ष संमेलनावेळी सूत्रे नवीन अध्यक्षांच्या हातात सुपूर्द करतात म्हणजे नक्‍की काय करतात माहीत नाही; पण तसेच काही समजा. तसे 2018 ने 2019 च्या हाती नववर्षाची सूत्रे सुपूर्द केली.
2018 : स्वागतम्‌ 2019. तुझे स्वागत असो. आता आम्ही इतिहासजमा होणार व आगामी सालाची सूत्रे मी आपणाकडे सोपवित आहे.
2019 : धन्यवाद पण मी असे ऐकले आहे की मला एकदम कठीण वर्ष जाणार म्हणे. मी येथे येण्याआधी भविष्याचा काळकोठडीत होतो तेथून वर्तमानात कसे वावरावे हे तुझा व तुझ्या पूर्वींच्या वर्षांचा अभ्यास करताना जाणले आहे.
2018 : पण कठीण म्हणजे कोणत्या अर्थाने?
2019 : जागतिक दृष्टीने. ग्लोबल वॉर्मिंग या वर्षात अजून वाढणार आहे. तसेच पूर्वी लढाया थेट रणांगणात आमने-सामने होत; परंतु आता व्यापारयुद्ध सुरू झाले आहे. हे व्यापारयुद्ध या आगामी वर्षात अधिक तीव्र असेल. यामुळे जागतिक आर्थिक घडामोडी महत्त्वाच्या असतील.
2018 : अरे, बरीच माहिती काढली आहेस. वर्तमानाची चांगली तयारी करून आला आहेस.
2019 : हो, बरोबरच आहे. आपल्या भारतवर्षातही हे वर्ष महत्त्वाचे असणार आहे. याचे कारण येऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुका, तसेच महाराष्ट्र प्रदेशातही निवडणुका आहेतच.
2018 : अजून काय नवीन?
2019 : नवीन असे काही नाही आणि तसेही मला कित्येकदा वाटते की आपण फक्‍त जमा काळाचे ठराविक वेळेतील नामकरण असतो. तसेही आपल्या हातात काही नसते.
2018 : असं कसं? पण महत्त्वाच्या गोष्टींबरोबर तुझे नाव राहणारच आहे. जसे 2018 महत्त्वाच्या घडामोडींबरोबर माझे नाव जोडले गेले आहे.
2019 : ते ठीक आहे, पण नवीन असे काही आपल्या हातात थोडेच असते? कित्येकदा त्याच त्याच समस्या व त्यासाठी तीच तीच आश्‍वासने नवीन मेहनत काहीही न करता काही तरी चांगले घडावे ही अपेक्षा ठेवणे हे सर्व विचित्र वाटते. हे बघ कधी कधी प्रजासत्ताक दिन वा स्वातंत्र्यदिनी आपले राष्ट्राध्यक्ष भाषण करतात. अशा वेळी वाटतं की, चुकून गेल्या वर्षीच्या भाषणाची कॅसेट लावली तरी काहीही मोठा फरक पडेल असे वाटत नाही. कारण त्याच समस्या व त्यांच्यावर काहीही न झालेल्या उपाययोजना. तीच आश्‍वासने तसेच मतदान त्याच प्रकारचे लोक निवडून येणार आणि नवीन काही होण्याचे आपण अपेक्षा करणार हे खूप चुकीचे आहे.
2018 : खरं आहे आता मला वर्तमानातून भूतकाळात जावे लागेल व तुला वर्तमानात यावे लागेल. माझ्याकडून तुला मनापासून शुभेच्छा!
2019 : धन्यवाद. सकल जनतेला नव्या वर्षात सुबुद्धी लाभावी व नवीन, चांगल्या गोष्टी घडाव्यात व माझे नाव अशा चांगल्या गोष्टींशी निगडित व्हावे, हीच माफक अपेक्षा आहे.
पराधीन आहे जगती,
काळ मानवाचा…
दोष ना इसवी सनांचा…


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)