#कलंदर : दैव जाणिले कुणी…? 

संग्रहित छायाचित्र

– उत्तम पिंगळे 

माणूस जन्माला येऊन जगतो हेच पटत नाही. तो जन्माला आला की मृत्यू अटळ आहे. अशा वेळी माणूस आपल्या जीवनशैलीने त्या मृत्यूला दूर लोटण्याचा प्रयत्न करीत असतो. आपण कुपोषणाचे मृत्यू पहातो. त्या बालकांना योग्य आहार न मिळाल्याने ती दगावतात. दुसरीकडे अतिशय नाजूक बालकही इन्क्‍युबेटरमध्ये ठेवून वाचवले जाते. म्हणजेच येऊ घातलेला मृत्यू टाळणे म्हणजे जगणे होय. पुढे वय वाढू लागल्यावर आपण काय खातो, किती व्यायाम करतो, कसे वागतो आपले विचार कसे आहेत, आपली जीवनशैली कशी आहे यांच्यावर सारे अवलंबून असते. हेच सर्व मृत्यूपर्यंत सोबत करीत असतात. काही लोक समाजासाठी कार्य करतात. त्यामुळे ते समाजाच्या चांगले लक्षात राहतात. तुमचे लक्षात राहणे हे तुम्ही किती वर्षे जगलात, यापेक्षा कसे जगलात यावर अवलंबून असते.

-Ads-

आता असे जगत असताना कित्येकांना वेगवेगळ्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. विशिष्ट मुहूर्त पाहून कार्य सुरू करणे, अथवा भविष्य जाणून घेणे व मगच पुढे पाऊल टाकणे असे कित्येकदा घडत असते. ज्योतिष ‘शास्त्र’ आहे की नाही हा अजूनही वादाचा विषय आहे. कारण एकदा शास्त्र म्हटले की त्याचा प्रत्यय वेळोवेळी तसाच यावा लागतो. झाडावरून फळ पडले की ते जमिनीवरच पाडणार आकाशात नव्हे. म्हणजे “बाप दाखव किंवा श्राद्ध कर’ असे शास्त्र म्हणते. अशा वेळी कित्येक व्यक्ती ज्योतिष्याच्या आहारी जाताना दिसतात. भविष्य ठोकताळ्यांवर अवलंबून असते.म्हणजे पूर्वी अमुक एक ग्रहस्थिती असताना, असे झाले किंवा ग्रहण झाले असताना असे घडले म्हणजे ते तसे घडू शकते, असा ताळा मांडला जातो. असे घडू नये म्हणून “काळजी घ्या’ असा संदेश दिला जायचा; पण त्याची खात्री नव्हती. खात्री नसेल तर विज्ञान ते मान्य करीत नाही. अशा वेळी आपण पहातो की, ज्योतिषी व्यावसायिक झालेले आहेत. त्यांचे पेवच फुटलेले आहे. कित्येक सुशिक्षित म्हणवून घेणारे यात अलगद अडकतात.

याचे मुख्य कारण म्हणजे कोणतीही समस्या स्वतःवर आली की, मग त्यांचे मन डगमगते. मग “विचारून तर पाहू’ असे म्हणून पावले ज्योतिषाकडे वळतात. ज्योतिषांच्या जाहिरातीही असतात की, 24 तासांत अनुभव न आल्यास फी परत. कुणीही फी मागायला जात नाही. कारण त्यांचा पर्यायच असा असतो की, मनोभावे आपण दिलेला तोडगा करावा अथवा लाभ होणार नाही. मग करणाऱ्याला वाटते की आपलेच काहीतरी चुकले असेल. कित्येकदा उत्तमपत्रिका जमलेल्यांचे घटस्फोट होतात तर पत्रिका न जमलेल्यांचे विवाह चांगले टिकतात. कित्येकदा ग्रहांची शांती करावयास सांगितले जाते, असा ग्रह कित्येकांच्या राशीत असतोच. पण तुम्ही फक्‍त शांती केलीत तर तुम्हाला अपाय होणार नाही हे कसे? अशा वेळी समस्याग्रस्त व्यक्‍तीला नाडले जाते. गावातील भगताकडे जाणे किंवा पॉश हायफाय फेस रिडरकडे जाणे एकच आहे. एकूणच या सशुल्क भविष्याचा बाजार झाला आहे.

पोलादपूर घाटात एक भीषण अपघात झालेला आपण ऐकला असेलच. एकाच संस्थेतील तीस जण मृत्युमुखी पडले. केवळ एक जणच योगायोगाने वाचला. आता मला सांगा की, जे सर्वजण गेले ते सर्व एकाच राशीचे होते?

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)