कलंदर: दुटप्पी… 

उत्तम पिंगळे 

अवनी वाघिणीचा आत्मा स्वर्गात पोहोचताच त्याचे लक्ष्य कोपऱ्यातील दोन काळवीटांच्या आत्म्यांकडे गेले. मरणानंतर वैरभाव नसल्यामुळे त्या दोघांकडे पाहून तिला बरे वाटले.काळवीटांच्या आत्म्याने तिचे स्वागत केले. खूप नशीबवान आहेस, तुझ्या मरणाने सर्वत्र तुझीच चर्चा चालू आहे. विविध संघटना, विद्यार्थी, प्राणी मित्र यांचे मोर्चे निघत आहेत. आमचे बाबतीत बिष्णोई समाज सोडता कुणीही पुढे आलेला नाही. उलट आम्हाला मारणाऱ्या सलमानचा सर्वत्र उदो उदो चालू आहे. आज वीस वर्ष झाली आमच्या मरणाला. पाच वर्षांची शिक्षा झालेली असूनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर अवनीचा आत्मा म्हणे, त्या पृथ्वीतलावर सर्वात चतुर जर कुणी असेल तर तो फक्त मनुष्यप्राणी होय. माणसांमध्ये वारा वाहील तशी पाठ फिरवावी असे म्हटले जाते.

माझी व तुमची केस हे उत्तम उदाहरण आहे. 1998 रोजी तुम्हाला मारल्यानंतर बिष्णोई समाज सोडता बाकी सर्वजण सलमानच्या पाठीशी उभे होते. युवक, विद्यार्थी, बॉलीवूड सर्वजण सलमानच्या पाठी उभे कारण त्यांचे पिक्‍चर पुरे व्हायचे होते. निर्मात्यांचा पैसा त्यात अडकला होता. तरुणांच्या गळ्यात आजही तो ताईत आहे, उलट अशा व्यक्‍तींनी सार्वजनिक जीवनात चांगले आचरण करणे आवश्‍यक आहे. त्याच्यावर अजूनही काही केसेस आहेत लोकांना त्याच्याशी काही घेणे देणे नाही. ते त्याच्याच पाठीशी आहेत म्हणूनच शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही.

माझी केस जरा वेगळी आहे. जंगलातील खाणे कमी झाले आहे. जंगलतोडीने भक्ष मिळणे मुश्‍किल झाले आहे. बरं माझे भक्ष म्हणजे हरीण, ससे हे मनुष्य लोकांचेही आवडते खाद्य आहे. जंगल तोड माणूसच करणार व माझे भक्षही मारणार मग मी काय खाणार? अशी परिस्थिती आहे. नाईलाजाने मला पाळीव प्राणी व माणसांवर हल्ले करावे लागले. जगण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून माणसांवर हल्ले केले व नरभक्षक बनले आणि म्हणूनच मारली गेली. विशेष म्हणजे आज माझ्या बाजूनी मोर्चे काढणारे प्राणीमित्र व सिनेतारका तुमच्या वेळी गूपचूप एसीमध्ये बसून होते. आता माझ्या हत्येचे राजकारणही केले जात आहे. विरोधक आक्रमक बनलेले आहेत. एरवी त्यांना त्यांच्या मतदारांसाठी पाणी व साधे रस्तेही देता येत नाहीत ते नेते आज माझ्या पाठीशी आहेत. निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे जो तो प्रकाशात कसा राहील त्याची काळजी घेत आहे. लोक त्यांचीच पोळी भाजून घेत आहेत. पैसे अडकल्याने सारे बॉलीवूड सलमानच्या मागे उभे आहे. पण जर माझी हत्या कोणी सिनेस्टारने केली असती तर हेच बॉलीवूड गूपचूप बसले असते. म्हणून मी सांगते की सर्वांत धूर्त मनुष्यप्राणी आहे. स्वतःचा फायदा करून घेण्याकरता तो कोणत्याही थराला जाऊ शकतो व बिनभोबाटपणे दुटप्पीपणा दाखवू शकतो. माझ्या इतर बांधवांच्या स्वप्नात जाऊन मी तेच सांगणार आहे की माणसाच्या नादी लागू नका त्यापासून चार हात दूर राहा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)