कलंदर: दिवाळी खरेदी 

उत्तम पिंगळे 

सर्वत्र दिवाळीची खरेदी चालू आहे. आपण पाहतो की वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या स्कीम लावलेल्या आहेत. जसे शून्य डाऊन पेमेंट किंवा शून्य टक्के व्याज तसेच क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डवर पाच ते 10 टक्के कॅशबॅक मिळेल. इतर सणांपेक्षा दिवाळीचे महत्त्व जास्त आहे, कारण हा सण संपूर्ण देशभर साजरा केला जातो. तो प्रादेशिक किंवा काही राज्यांपुरताच मर्यादित नसतो. कामगार वर्ग व नोकरदारांनाही याच वेळी बोनस मिळालेला असतो. कित्येकदा या बोनसचे काय करावयाचे ते आधीच ठरलेले असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजकाल आपण पाहतो की मॉल व मेगा स्टोअर्स मोठया प्रमाणात वाढत आहेत. तेथे आपल्याला नेहमीच्या लागणाऱ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळू शकतात. वेगवेगळ्या दुकानात जाण्याची गरज नसते. तेथे गेल्यावर विविध वस्तू अशा आकर्षक रितीने मांडलेल्या असतात की, कितीदा आपण आवश्‍यक नसतानाही खरेदी करतो. वीस वस्तूंची आपण यादी घेऊन गेलो असेल तर येताना 27 वस्तू होतात. यातच मॉलवाल्यांचे यश सामावलेले असते. मॉलमध्ये विविध वस्तू मोठया प्रमाणात संपत असल्याने त्यांनाही त्या कमी दराने मिळतात. दिवाळीसारख्या सणांमध्ये चायनिज मालही सर्वत्र येऊन धडकतो. एकूणच लोकांकडून भरपूर खरेदी होत असल्याने, जो तो आपला माल कसा संपेल, ते पाहात असतो.

पण असे कित्येक घटक वा लोक असतात जे दिवाळीची वाट पाहत असतात. त्यांनाही या मोठ्या सणात चार दोन पैसे कमवण्याची संधी मिळत असते.जसे पणत्या बनवणारे! आता आपण पाहतो इलेक्‍ट्रिक पणत्याही मिळतात पण बऱ्याच घरी अजूनही मातीच्या पणत्या लावतात. तसेच दर वर्षी त्यात काही पणत्यांची भरही घातली जाते. बांबू पट्टीचे कंदील तसेच कापडी कंदील. विविध प्रकारचे रंग रांगोळ्या विविध प्रकारची उटणी, उदबत्ती वा धूप, कपड्यांचे गालीचे तसेच विविध प्रकारच्या फराळाच्या वस्तू. अनेक शिकत असलेले विद्यार्थीही आपापल्या वस्तू बनवत असतात जसे केटरिंग किंवा हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी अनेक खाद्यपदार्थ व चॉकलेट्‌स तसेच कला शाखेतील विद्यार्थी मातीच्या पणत्या, दिवे वा विविध भेट देण्याच्या वस्तू बनवत असतात.

आपण साऱ्यांनी अशा लोकांकडून वस्तू खरेदी करणे इष्ट ठरते. विद्यार्थ्यांसाठी केवळ पैसा म्हणून नव्हे तर त्यांनी केलेल्या वस्तूला किंवा कलेला दाद म्हणून यांच्या नातेवाईक तसेच त्यांच्या मित्रमंडळाने त्यांच्याकडून खरेदी करणे आवश्‍यक आहे.
न जाणो यातूनच कोणी एखादा पुढे उद्योजक होऊन पुढे अनेक लोकांना रोजगारही मिळवून देईल. त्याप्रमाणेच आधी सांगितलेल्या वस्तू असे कंदील, दिवे, पणत्या, उटणी, धूप हे बनविणारे ग्रामीण कारागीर दिवाळीची वाट पाहात असतात. अशा वस्तू बनवण्यात त्यांचे पूर्ण कुटुंब कित्येक दिवस मागे लागलेले असते. आपण अशा अनेक वस्तू रस्त्याच्या बाजूला किंवा बाजारात थेट ग्रामीण भागातून आलेल्या पाहात असतो. अशा लोकांकडून जास्त घासाघीस न करता आपण वस्तू खरेदी कराव्यात.

आपल्या या वस्तूंची खरेदी मॉल व मेगा शॉपमधून न करता थेट यांच्याकडूनच करावी. जी कुटुंबे केवळ दिवाळीसाठी या वस्तू बनवण्याच्या मागे लागलेली असतात अशांना आपल्याकडून मदत होईलच. पण मदतीपेक्षा त्यांच्या मेहनतीची थेट पावती मिळाल्यास त्यांचीही दिवाळी आनंदी होईल, असं वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)