#कलंदर: जय हिंद!

– उत्तम पिंगळे

गुरुवारी 72 वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. सुट्टी असल्याने सायंकाळी प्रा. मराठमोळे यांच्या घरी गेलो होतो. तेही घरात स्वातंत्र्यदिनाच्या बातम्याच बघत होते. मला पाहताच म्हणाले, “काय झाला साजरा स्वातंत्र्यदिन?’ मी म्हणालो झाला की, सकाळीच आमच्या बाजूला महापालिकेची शाळा आहे; दरवर्षी मी तेथेच जातो.’ “बरं.. असे आहे तर,’ एकंदर त्यांच्या बोलण्यात जरा निराशा होती. मी त्यांना विचारले की, कसला विचार करताय? त्यावर ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा लेखाजोखा पाहिला असता, आता त्याला दुर्दैवानं व्यावसायिक स्वरूप आले आहे.

आज आपण पाहतो की मोठमोठे सेल लावलेले असतात. कोणतीही सुटी अगर विकेंड आला, तरीही लगेच सेल घोषित होतो. या सेलमध्ये मुख्यतः विक्री वाढवणे हाच हेतू असतो. आपण मॉलमध्ये सेल म्हणून जातो तेथे जाऊन खूप खरेदी करतो घरी आल्यावर समजते की, किती तरी अनावश्‍यक वस्तू आपण खरेदी केलेल्या आहेत आणि हेच त्यांचे यश असते. तुमच्या लहानपणी शाळेत प्रभातफेरी होत असावी तसेच देशभक्तीपर भाषणे होत असावीत. आता ते अभावानेच दिसते. कित्येक ठिकाणी कंपल्सरी आहे रे म्हणून जायला लागते असा सूर दिसतो.

मुळातच स्वातंत्र्याचा अर्थ पण अगदी संकुचित घेतलेला आहे. ब्रिटिशांना आपण हाकलून दिले एवढाच. पूर्ण नीट विचार केला तर कित्येक ठिकाणी त्यावेळी सुशासन होतेच. सर्व खटले शिक्षा वेळच्या वेळी मिळायच व कायद्याचा दरारा होता. आता आमच्या गल्लीतला नगरसेवकही स्वत:ला गल्लीचा राजा समजत आहे.सत्ता ही उपभोगाची वस्तू झालेली असून सर्व सत्ताधीशांना आपणच सर्वेसर्वा आहोत असेच वाटत आहे. पोलीस खाते, सीआयडी, सीबीआय हे सर्व सरकारी दबावाच्या खाली वावरताना दिसत आहेत. अलीकडे तर सर्वोच्च न्यायालयातही राजकारण शिरत होते पण तूर्तास ते वाचले आहे. मग मी विचारले की यावर उपाय काय? यावर ते म्हणाले की उपाय आहे.

अगदी बालवयातच संस्कार दिले गेले पाहिजेत सर्व शाळांत देशभक्तीचे धडे लहानपणीच दिले गेले पाहिजेत.तसेच सैनिकी शिक्षण व सैनिकी शिस्तही दहावीपर्यंत दिली गेली पाहिजे कारण लहानपणी मनावर जे कोरले जाते ते आयुष्यभर राहते. म्हणूनच आवश्‍यक आहे. सैनिक शहीद झाल्यास दोन चार दिवस हळहळ व्यक्त केली जाते. आपण जर पाहायला गेलो तर वर्षाला साधारण अडीचशे सैनिक शहीद झाले आणि ते सुद्धा पाकिस्तानच्या दहशतवादामुळेच.पण आपण सैन्यात गेला म्हणजे मारायला गेला असेच गृहीत धरतो.

सैनिक उदयाला यावा पण शेजारच्या घरी असे म्हटले जाते. आपण काय करतो मुलगा बारावी पास झाला की त्याला एक शानदार दुचाकी घेऊन देतो. इंजिनिअरिंगनंतर लगेच एसी पीसी असा जॉब कर म्हणजे झाला सेटल. बाकी समाजाशी आपले काही घेणे देणे नाही. गेल्या वर्षभरात भारतात रस्ते अपघातात दीड लाख लोक मृत्युमुखी पडले म्हणजे दिवसाला सरासरी चारशे दहा. आणि सैन्यातील वार्षिक मृत्यूचे प्रमाण भारतातील एका दिवसाच्या अपघातांपेक्षाही कमी आहे. अशा वेळी त्याला सैन्यात जाण्यास प्रोत्साहन करणार नाहीत पण शानदार बाईक घेऊन रस्त्यावर मारायला बिनदिक्कत पाठवतील. अशी दळभद्री विचारसरणी दुर्दैवाने पालकांचीही झालेली आहे. आता तुम्हीच ठरवा काय योग्य काय अयोग्य.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)