#कलंदर:  कॅन्डल लाइट डिनर… 

 उत्तम पिंगळे 
परवाच्या रविवारची गोष्ट. माझा मित्र जो मुंबई उपनगर कंपनीत इंजिनिअर आहे त्याचा हा रात्री साडेआठला गावाकडून फोन आला. म्हणे जेवायला ये. मग हसत हसत म्हणाला की, गेले तीन दिवस गावामध्ये वीज नाही. वादळी पावसाने दोन तीन ठिकाणी तारेवरती झाडे पडली. तसेच काही ठिकाणी पोलही पडले. आजी-आजोबांच्या तिथीसाठी गावी आलो होतो. दुसऱ्या दिवसापासून इन्व्हर्टरची बॅटरीही संपली. त्यामुळे अंधारच अंधार आहे. मी तिकडे ऑफिसमध्ये सर्वांना वीज पुरवतो.
अजूनही ऑफिसमधून फोन येताहेत की अमुक एक सोसायटीचे लाईट गेले, कुठे स्ट्रीट लाईट गेले, कुठे शॉक लागतोय. मी येथूनच आमच्या वायरमनला गाईड करत आहे. मी इथे घामाघूम आणि तिकडे मुंबईत लाईट कसा रिस्टोअर करा ते सांगतोय. मुख्य म्हणजे बऱ्याच दिवसांनी सर्वजण एकत्र आहोत. मी विचारल्यावर म्हणाला की, तो त्याचे कुटुंब त्यांच्या दोन मुली एक मास्टर्स व दुसरी बॅचलर्स करत आहे, बहीण, बहिणीचा इंजिनिअर मुलगा व धाकटा भाऊ त्याची लहान मुलगी असे 12-13 जण घरी आहोत. आमचे जेवण तयार आहे व आता मेणबत्तीच्या उजेडात जेवण करायचे आहे. यावरून त्याला आठवले की गावाकडे त्याच्या बारावीपर्यंत वीज व एसटीही नव्हती तो आमच्या तालुक्‍याच्या गावी सायकलने येत असे. कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास केला आणि आता हजारो लोकांना वीज पुरवत आहे. जुन्या आठवणींना उजाळा आला म्हणून फोन केला.
मी म्हणालो, हा तर दुग्धशर्करा योग आहे. एक म्हणजे घरातले सर्वजण एकत्र जमणे हे आजकालच्या जीवनात जवळजवळ अशक्‍य होऊन गेले आहे. “तुम्ही सर्वजण आज एकत्र कॅंडल लाइट डिनर घेणार आहात?’ तोही हसू लागला. मी म्हणालो, तुला तर मुंबईमध्ये माहीत आहे की, असे डिनर आपण हॉटेलमध्ये जाऊन केले तर ते कितीला पडेल? एक म्हणजे हॉटेलवाले तुझ्यासाठी लाईट एकदम डीम किंवा जवळ बंद करणार. म्हणजे त्यांचे बिल कमी येणार. तुमच्या टेबलावर मेणबत्त्या लावणार व तुम्हाला डिनर सर्व्ह करणार. तेथेही तुम्हाला त्यांच्याकडे असेल त्यातीलच मेनू घ्यावा लागेल. त्याच वेळी तुम्ही त्या हॉटेलमध्ये टेबल मॅनर्स किंवा एटिकेट्‌सच्या नावाखाली मोठ्या आवाजात बोलूही शकणार नाही. बरे या सर्वांसाठी पैसे मोजणार व वरती टीपही देणार. जेवणही पोटभर होणार नाही कारण वेळेचे भानही ठेवावे लागेल व तुमच्यानंतर तेथे कुणीतरी येणार असते. आता तुम्ही सर्व एकत्रपणे मनमुरादपणे गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
बरं तेही आईच्या हातचे चुलीवरचे कालवण, गरम गरम भाकरी व मिरचीचा ठेचा आणि काय हवे? तो ही अगदी बरोबर बोललास असे म्हणाला. शेवटी समोरील परिस्थिती आपण कसे पाहतो त्यावर असते. ग्लास आर्धा रिकामा म्हणायचा की भरलेला ते आपल्याच हाती असते. विशेष म्हणजे ज्या परिस्थितीत आपण काहीही करू शकत नाही, ती आपण कशी स्वीकारतो ते महत्त्वाचे आहे. आता तुम्ही फाईव्हस्टारमधील कॅन्डल लाइट डिनर समजून घेतल्यास आनंदच होणार. तोही तेच म्हणाला. मुलं थोडी कुरबूर करताहेत, त्याना समजावतो. मीही म्हणालो की, आता वेळ दवडू नका. गरम गरम डिनरचा आस्वाद घ्या कारण जेवण तयार आहे व फोन ठेवला.
पुलंचं एक वाक्‍य आठवले की, शेजारच्याचा रेडिओच्या आवाजाचा त्रास होत असेल तर तो आपल्यासाठीच लावलेला आहे असे समजावे मग त्रास कमी होतो. मग स्वत:शीच म्हणालो, शेवटी आनंद हा मानण्यावर आहे!

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)