#कलंदर: कष्टाचे चीज. . व ‘चीजचे’ चित… 

– उत्तम पिंगळे 
 
गेल्या आठवड्यात खेळांचा प्रभाव सर्वत्र राहिला. महत्त्वाचे म्हणजे आशियाई खेळात भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी झाली. अनेक नवनवीन व उदयोन्मुख खेळाडूंनी आपली नावे पदकांवर कोरली. पण त्याचबरोबर इंग्लंडमध्ये इंग्लंडने चौथी क्रिकेट कसोटी जिंकून मालिकाही जिंकली. टेस्ट मॅच चौथ्या दिवसात संपली. नेहमीप्रमाणे मी प्राध्यापक मराठामोळ्यांकडे गेलो.
गोकुळाष्टमी तसेच गजाननाचे आगमन या विषयावरील चर्चा सुरू असतानाच मी प्राध्यापकांकडे खेळाचा विषय काढला. प्राध्यापकांनी वरील दोन्ही खेळांविषयी आपले मत मांडले. सुरुवातीलाच ते म्हणाले की, भारताची यावेळी आशियाई खेळांमध्ये सर्वोत्कृष्ट अशी कामगिरी झालेली आहे. भारताला 15 सुवर्ण, 24 रौप्य, 30 कांस्यपदके मिळाली. विविध खेळाडूंनी प्रथमच पदके जिंकलेली आहेत. यामध्ये त्यांचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे मुख्य योगदान आहे. केवळ खेळावरील प्रेमामुळे आवश्‍यक ती साधने नसतानाही प्रयत्न करून ज्यांनी पदके मिळवली त्यांचे खरोखर अभिनंदन करावे तेवढे थोडेच.
पुढे ते असेही म्हणाले की त्यांच्यावर आता बक्षिसांचा वर्षाव होईल केंद्र व त्यांची त्यांची राज्ये त्यांना पुरस्कार व रोख रक्‍कम देतील. अर्थात, हे चांगलेच आहे पण सरकारने अशी मदत उगवत्या खेळाडूंच्या सरावासाठी खर्च केली तर कित्येक गुणी खेळाडू अजूनही उदयाला येतील. म्हणजे या खेळाडूंना पुरस्कार देऊ नये असे नाही ते महत्त्वाचे आहेच पण असे खेळाडू तयार होणे जास्त महत्त्वाचे आहे व त्यासाठी जास्त खर्च करावा. विजयी खेळाडूंच्या कष्टाचे चीज झाले असेच म्हणावे लागेल कारण कित्येकांनी पदरमोड करून खेळासाठी जीवापाड प्रयत्न केलेले आहेत. 
मग आवाजाचा जरा रोख बदलून म्हणाले, एशियाडमध्ये कष्टाचे चीज झाले दुसरीकडे चीज खाणारे चीत होऊन गेले. वन डे, ट्‌वेंटी ट्‌वेंटी, आयपीएलमध्ये करोडो रुपये कमावतात मग जाहिरातींवरही पैसे कमवतात गब्बर होतात मग त्यांना खरा क्रिकेट म्हणजे बोअर होतो. आता कसोटी मॅच पाच दिवसही चालत नाही. लोकांनीही झटपट क्रिकेट डोक्‍यावर घेतलेले आहे. त्यामुळे खरोखरचे क्रिकेट लयाला जाणार आहे. ठीक आहे कालाय तस्मै नम: अरे सर्वच जण झटपट क्रिकेट पाहताहेत मग पाहू दे. पण मग बीसीसीआय नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन कशी होऊ शकते? बीसीसीआयचे नक्की स्थान काय? त्यांना कर लागतो का नाही? हे सर्व लोकांसमोर आले पाहिजे.
अलीकडे म्हणजे 2007 नंतर ज्यावेळी आयपीएल चालू झाले त्या वेळेपासून आयकर खाते बीसीसीआयच्या मागे टॅक्‍स देण्यासाठी लागलेले आहे. अब्जावधींचे उत्पन्न असलेली ही क्रिकेटची संघटना नॉन प्रॉफिटेबल होउ शकत नाही.बीसीसीआयनेही काही टॅक्‍स भरलेला आहे पण सर्व प्रकरण न्यायालयात गेलेले आहे.सरकारने यात हस्तक्षेप करून बीसीसीआयकडून रीतसर कर गोळा करावा. आपल्याकडे अनेक हिरे आहेत पण त्यांना पैलू पाडण्याची गरज आहे ते या गोष्टींमुळे साध्य होईल. बीसीसीआयचे नेमके स्वरूप काय आहे तसेच त्याचा ताळेबंदही लोकांसमोर येणे आवश्‍यक आहे. क्रिकेटला बीसीसीआयने चांगली वा व्यावसायिक कोणतीही दिशा देवोत.
कारण तसेही क्रिकेट जास्त देशात खेळले जात नाही. पण त्यांचा कारभार पारदर्शी होणे महत्त्वाचे आहे. ज्यांनी आयुष्यात कधी क्रिकेट खेळलेले नाही असे कित्येक अध्यक्ष होऊन गेले आहेत. येथेही राजकारण खेळले जाते. अशा वेळी ही संस्था पूर्णपणे व्यावसायिक घोषित करून तिच्याकडून योग्य तो कर वसूल केला जावा. तो कर इतर खेळांतील खेळाडूंच्या खेळाच्या सरावासाठी मिळवून दिल्यास देशात अनेक नव नवीन खेळाडू तयार होतील.अशा खेळाडूंनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले असता त्या खेळांना अधिक चालना मिळेल. आपणांस काय वाटते? 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)