कलंदर: ओझे… 

उत्तम पिंगळे 

विद्यार्थ्यांच्या दप्तराचा प्रश्‍न आता ऐरणीवर आलेला आहे. नवीन अभ्यासक्रमात अधिक पुस्तकांमुळे आता एक किलोने दप्तर अधिक वाढणार आहे.या विषयावरही आता उलट सुलट चर्चा होतील.प्राध्यापक मराठमोळ्यांनी त्यांचे मत स्पष्टपणे मांडले. ते म्हणाले की, मी तुम्हाला सांगतो की, मुळातच शिक्षणाचा बोजवारा उडत चालला आहे. कित्येक हायफाय शाळा व कॉलेजेसमध्ये लाखांनी फी घेतली जात आहे तर ग्रामीण भागांमध्ये कित्येक एक शिक्षकी शाळा असून एकाच वेळी पहिली ते चौथीचे वर्ग एकच शिक्षक घेत आहे.दप्तराचे ओझे भौतिक दृष्ट्‌या वाढले असले तरी त्यातून ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते की नाही हा प्रश्‍न पडलेला आहे.

प्राध्यापक म्हणाले की, पूर्वी आकलन काय झाले ते पाहिले जायचे. जसे लहान वर्गातील विद्यार्थ्यांना मुद्द्यावरून गोष्ट किंवा एखादी अर्धवट कथा पूर्ण करणे अशा प्रकारचे प्रश्‍न असत. तेथे विद्यार्थ्याला स्वतःत विचार मांडण्यास वाव होता आता फक्‍त प्रश्‍न मोठमोठे व त्यांची संख्या वाढत आहे. तसेच परीक्षा पॅटर्नही समजावून दिले जात आहेत.परीक्षा कशी पास होणे यांचेही टेकनिक निर्माण झालेले आहे काही ऑप्शन्स टाकूनही उत्कृष्टपणे परीक्षा उत्तीर्ण होणे शक्‍य आहे.सर्वस्वी परीक्षेतील मार्कांवर अवलंबून आहे.बरं मार्कांवर अवलंबून असले तरी पुन्हा इंजिनीअरिंग, मेडिकल, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट, लॉ इत्यादीसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा म्हणजे मूळ परीक्षेतील मिळालेल्या गुणांना पुन्हा दुय्यम स्थान दिले जाते.मग हजारो प्रकारच्या प्रश्नांची पुस्तके, त्यातील वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्‍न सोडवण्याचे टेकनिक खासगी क्‍लासेस शिकवतात. अशा क्‍लासेसमध्ये शिकवणारेही अशा प्रकारची परीक्षा क्रॅक देऊन पास झालेले असतात.

मुळात शिकवणे हीसुद्धा एक कला आहे हे आपण विसरत चाललो आहोत. अत्यंत हुशार विद्यार्थी हा चांगला शिक्षक होतोच असे नाही. म्हणजेच शिकवणे हे सर्वांनाच जमते असे नाही.शिकवलेले विद्यार्थ्याला समजले की नाही हे पडताळणे महत्त्वाचे असते. पुस्तकातून शब्दांचे अर्थ मिळतात परंतु त्याचे आकलन शिक्षकच करून देतो. तसे नसते तर फक्‍त पुस्तक घेऊन किंवा वाचून हवे ते ज्ञान घेता आले असते. म्हणूनच शिक्षणाचा मूलभूत ढाचा तपासून त्या प्रमाणात अभ्यासक्रम निर्माण करणे आवश्‍यक आहे. आज विद्यार्थी परीक्षार्थी बनत चालले असून केवळ पास होणे हेच त्यांचे ध्येय बनत चालले आहे.

शिक्षणाचा बाजार बनून क्‍लासेसना खूप महत्त्व आले आहे व ते घोकंपट्टीचा परीक्षार्थी घडवत आहेत. ज्ञान हा हेतू मागे पडत आहे मग आपण पहातोच असे परीक्षार्थी शिक्षण घेऊन (ज्ञान घेऊन नव्हे) बाहेर पडल्यावर त्यांना साधा चार ओळीचा अर्जही लिहून देता येत नाही. विद्यार्थी हे ज्ञानार्थी बनले पाहिजेत, अशी शिक्षणाची पद्धत विकसित केली पाहिजे. शिक्षण म्हणजे व्यक्‍तीचा सर्वांगीण विकास होय असे महात्मा गांधी म्हणत.

आजची शिक्षणपद्धती तसे करू शकत नाही हे वास्तव आहे.आणि म्हणून वारंवार त्यामध्ये काही तरी प्रयोग केले जात आहेत. मानलं की प्रचंड विद्यार्थी संख्या आहे पण केवळ शिक्षण देणे म्हणजे ज्ञान दान नव्हे. विना परीक्षा आठवी पर्यंत नेणे म्हणजे शिक्षणाच्या नावे पाट्या टाकणे होय याचा विचार कधी होणार. त्यामुळे दप्तराच्या ओझ्यापेक्षा परीक्षार्थी शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांवर पडणारा ताण व त्याचे पडणारे ओझे हे दप्तरी ओझ्यापेक्षा फार भीषण ठरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)