कलंदर: उंची… 

उत्तम पिंगळे 

परवा चक्‍क सरदार पटेलांचा पुतळा व होऊ घातलेल्या आंध्र विधानसभेची इमारत यांच्यात चर्चा सुरू झाली होती व ती मी स्वप्नात पाहिली. आता तुम्ही म्हणाल की जी इमारत बांधलीच नाही ती स्वप्नात कशी दिसली तर स्वप्नात काहीही दिसू शकते आणि तिचे मॉडेल आपण वृत्तपत्रात पाहिले आहेच. तर त्यातील संभाषण देत आहे.

-Ads-

इमारत : नमस्ते सरदारजी.
सरदार : पण मी आपल्याला ओळखलं नाही.
इमारत : बरोबर आहे. अजून मी कागदावरच आहे. माझे मॉडेल तयार झालेले आहे मी होऊ घातलेली आंध्र विधानसभेची अमरावतीतील नवीन इमारत.
पुतळा : हार्दिक अभिनंदन. अशी इमारत उभी राहिल्यावर तू नक्कीच उठून दिसशील व तुझे वेगळेपण ठरेल हे नक्कीच. तुझ्या आगमनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!
इमारत : धन्यवाद. पण माझे वैशिष्ट्य्‌ काय माहीत आहे का?
पुतळा : ते मी कसे सांगू? तूच सांग.
इमारत : मी भारतातील सर्वात मोठी इमारत ठरणार आहे. माझी उंची जवळजवळ 260 मीटर म्हणजे आपल्यापेक्षाही 60 मीटर जास्त राहणार आहे.
पुतळा : छान छान. मुळातच मी जगातील सर्वात मोठा पुतळा ठरल्याने झालेल्या आनंदापेक्षा विचित्र वाटत आहे, पण आता तू माझ्यापेक्षा उंच ठरणार हे ऐकून बरे वाटले. मग नीट ऐक केवळ उंचीमुळे कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ होत नसतो. त्यामुळे तुझ्या उंचीचा तुला गर्व नसावा तरच तुझे महत्त्व वाढेल.
इमारत : म्हणजे मी समजले नाही.
पुतळा : आपले लाल बहादूर शास्त्री. उंची पाच फूट एक इंच पण देशाचे पंतप्रधान झाले ते त्यांच्या कार्याच्या उंचीमुळेच.
इमारत : म्हणजे मला काय करावे लागेल ते कृपया सांगाल का? ज्या योगे माझ्या उंचीचा मला अभिमान वाटेल.
पुतळा : अवश्‍य. कोणतीही मोठी वस्तू वाखाणली जाते तिच्या उंची व विविध वैशिष्टयांमुळेच पण त्याबरोबरच तिच्याबरोबर असलेल्या शिस्तीमुळेही. मुळातच तुझे आगमन एकाच भाषेच्या राज्याचे दोन तुकडे होऊन दोन वेगवेगळी राज्ये झाल्याने झालेले आहे. मी असताना वेगवेगळ्या भाषिक, धार्मिक संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून दाखवले होते. असो तो वेगळा विषय आहे. मग असे पाहा की तुझ्या उद्‌घाटनानंतर तुझ्यामध्ये वावरताना कडक अशी शिस्त आणली जावी. इतर राज्यांच्या विधानसभांपेक्षा तू केवळ उंच आहेत असे ओळखले न जाता इतरांपेक्षा सर्वात जास्त शिस्तीची आहेस असे ओळखले गेल्यास मला मनापासून जास्त आनंद होईल. इतर राज्यांतील विधानसभांमधील लोकप्रतिनिधींनी तुझा आदर्श घ्यावा व विधानसभेमध्ये शिस्त असावी तर ती तुझ्यासारखी असे सर्वांनी म्हटले जावे. तुझ्या कामकाजाचा अभ्यास केवळ आपल्या देशात नाही तर जगातील लोक प्रतिनिधींनी करावा असे तुझ्यातील लोकांचे वर्तन असावे. बाकी कसं करायचं ते तूच ठरव.
इमारत : आपला आशीर्वाद असल्यास नक्कीच तसेच होईल.

What is your reaction?
26 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)