#कलंदर : आभासी मित्र! 

– उत्तम पिंगळे 

माझा याच वृत्तपत्रातील ‘फ्रेंडशिप डे’ हा छोटा लेख वाचून प्राध्यापक मराठमोळे खूश झाले व मला येता जाता भेटून जा म्हणून सांगितले. त्याचप्रमाणे मी त्यांच्याकडे गेलो ‘फ्रेंडशिप डे’चा धागा पकडून मला म्हणाले, “अनेक वेगवेगळे डेज्‌ साजरे केले जातात. मदर्स डे, फादर्स डे, विमेन्स डे असे अनेक. पण मैत्री दिवस साजरा करणे म्हणजे मित्रत्वाची हार होय, असे मला वाटते. मी त्यांना विचारले की, हे कसे काय? त्यावर ते म्हणाले –

-Ads-

शिक्षणाने प्रगती झाली हे मान्य. पण आपण बघतो की शिक्षणाने सगळ्यांचा आयक्‍यू वाढलेला आहे (इंटलिजन्स कोशंट) तुमचे पुस्तकी ज्ञान जास्त आहे. पण त्याच बरोबर इक्‍यू (इमोशनल कोशंट) कमी कमी होत गेलेला आहे. जो तो स्वतःला प्रॅक्‍टिकल समजत असून भावनांचे स्थान आता दुय्यम होत चाललेले आहे. कुटुंबे वेगवेगळी होत चाललेली दिसत आहेत. असे होत असताना माणूस हा नोकरी व्यवसायात व आत्मकेंद्री बनत चालला आहे. त्याला आपले नातेवाईक, जवळचे नातवाईक व जवळचे मित्र, बालपणीचे दोस्त यांच्याबद्दल काही वाटत नसून, माझे फेसबुकवर 600 मित्र आहेत हे अभिमानाने सांगत आहे. कित्येकांना कोणतीही ओळख-पाळख नसताना मित्र म्हणून घेत असतो; त्यांना वेगवेगळे शुभेच्छा संदेश रोज पाठवत असतो. तो जाणीवपूर्वक विसरतो की, उद्या काही आपल्याला गरज पडली तर हे 600 जण धावत येणार नसून आपले जवळचे मित्र, जवळचे नातेवाईक व अगदी शेजारचेच प्रथम येऊ शकतात. या आभासी मित्रांच्या गराड्यात घोळत राहण्यापेक्षा त्याला असे वाटत नाही की, एखादे दिवशी आपल्या नातेवाईकांना बोलवावे किंवा जवळच्या मित्रांशी संवाद साधावा. सर्वत्र व्यावसायिकता आली आहे व विकतची मैत्री घ्यावीशी वाटत आहे. खरोखरची नाती जपत नसल्यामुळेच या “व्हर्च्युअल मैत्री’चा उदो उदो केला जात आहे.

“मदर्स डे’चा उल्लेख मध्ये केला होता. आपल्या संस्कृतीतच “मातृ देवो भव: पितृ देवो भव: आचार्य देवो भव:’ म्हणजेच या तिघांचे स्थान हे देवा समान आहे. त्यांचे रोज जरी स्मरण केले तरी खूप. तसेच आपल्यापाशी नातेवाईक नाहीत. मित्र नाहीत म्हणून असे व्यावसायिक ‘फ्रेंडशिप डे’ साजरे करणे होत आहेत. आपल्यापाशी नसलेले मिळवण्याचा माणसाचा हा आभासी प्रयत्न असतो. स्वामी विवेकानंद याचे बाबतीत एक किस्सा सांगितला जातो. लंडनमध्ये एक प्रोफेसर विचारतात की, समजा रस्त्यावर एका बाजूला ज्ञानाची पुस्तके पडली आहेत व दुसरीकडे पैसे पडले आहे तर आपण काय उचलाल. यावर विवेकानंद क्षणार्धात म्हणतात की, मी पैसे उचलेन. त्यावर सर्वांसमोर खजील करण्याकरता प्राध्यापक म्हणतात, “बघा मी असतो तर मी पुस्तके उचलली असती; हा पैसे उचलणार आहे.’ त्यावर स्वामीजी शांतपणे म्हणतात की, बरोबर आहे ज्याचापाशी जे नसते तेच माणूस घेतो.’ विनोदाचा भाग सोडला तर आज सर्वत्र हेच होत आहे. आपण एकटे पडत जात आहोत व हे आपल्याच वागण्यामुळेच होत आहे हे माणूस विसरत आहे. मग अशा वेळी या व्यावसायिक आभासी मैत्रीत माणूस अडकला जात आहे असे माझे ठाम मत आहे.

प्राध्यापकांचे हे परखड विचार आपल्यालाही नक्‍कीच विचार करायला लावतील.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)