कलंदर: आपला फोनू !

उत्तम पिंगळे

भ्रमणध्वनी म्हणजे आपल्या ‘बोलीभाषेत’ आपण ज्याला सेलफोन वा मोबाइल म्हणत असतो तो. सुरुवातीला प्रचंड महाग व एक “स्टेट्‌स सिम्बॉल’ म्हणून समजले जाणारे हे यंत्र पुढे पुढे एवढे स्वस्त व स्मार्ट होत गेले की त्याने जन्मदात्यास व त्याचा वापर करणाऱ्या माणसाला आता बावळट बनवून टाकलेले आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुणांना व अनेक वयोवृद्ध लोकांनाही या मोबाइलने वेड लावून टाकलेले आहे. वेगवेगळ्या स्वरूपातील हे यंत्र हा सर्वच लोकांच्या नित्य जीवनाचा अविभाज्य भाग ठरत चाललेले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अगदी अडाणी माणसापासून उच्च विद्याविभूषित लोकांना त्याने मोहित करून टाकले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कधी कधी विचार करताना असा हा मोबाइल आपल्याला कधी कधी अडचणही वाटू शकतो. कित्येक असे प्रसंग वा वेळा असतात की, ज्यावेळी मोबाइल वाजू नये असे मनापासून वाटते .बस किंवा लोकलमध्ये प्रचंड गर्दीमध्ये असा मोबाइल खिशात वा आपल्या ब्रिफकेसमध्ये असेल तर त्याला हाताळने शक्‍य नसते. अशा वेळी फोन आला तर तो घेणे शक्‍य नसते. मग व्यक्ती विचार करू लागते ऑफिसातून बॉस फोन असेल का? किंवा कुणाला काही झाले कि काय? किंवा घरातून निघतांना काही विसरलो तर नाही ना? शरीराची काहीही हालचाल न करता फक्त मनात विचार करणे शक्‍य असते. कित्येकदा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये फोन वाजू नये असे अपेक्षित असते. हॅंडसेट व्हायब्रेट मोडवर ठेवला तरीही लक्ष विचलित होते. अशावेळी फोन येऊ नये असेच वाटत असते. कर्जदारास धनकोचा फोनच येऊ नये, असे वाटतं. एखाद्या आनंदाच्या वेळी घरमालकांचा भाड्यासाठी तगादा लावण्याचा फोन येणे आनंदावर विरजण पडल्यासारखे वाटते.एखाद्या धार्मिक सभेत बसलेले असता किंवा कुणाच्या अंत्यविधीनंतर झालेल्या शोकसभेत फोन वाजणे अडचणीचे वाटते.

विद्यार्थ्यांचा निकाल अलीकडे पालकांच्या मोबाइलवर देण्यात येतो त्यावेळी पेपर कठीण गेले असतील तर त्यावेळी तो मोबाइल अडचणीचा वाटू शकतो. मोबाईल आता एवढा स्मार्ट झाला आहे की, त्याला फोन म्हणणे हा त्याचा घोर अपमान केल्यासारखे होईल. मोबाइलमधील विविध सुविधा व त्या सोबत आलेले सॉफ्टवेअर व इंटरनेट या सगळ्यांचा संगम झाला. माझा मोबाइल काय करू शकत नाही? क्षणोक्षणी त्याची आपल्याला मदत होत असते. आपल्या हिशेबासाठी कॅल्क्‍युलेटरचे काम करू शकतो. त्यामधील कॅमेरा तर खूपच उपयोगी असतो. फोटो काढणे व व्हिडिओ करणे सहज शक्‍य होते तसेच ऑडिओ रेकॉर्ड करणेही शक्‍य होते.

घड्याळ तसेच गजर व स्टॉपवॉच असे विविध उपयोगी आपण करू शकतो. एफएम रेडिओ तर सर्वच तरुणाई कानात घालून बसलेली असते. आतील प्रोग्रामने आपण त्याचा कॉम्प्युटर सारखा वापर करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल बनवणे त्या मेलने पाठवणे तसेच नेट सह सर्व प्रकारचे बॅंकिंग व्यवहार, बिले भरणे, ऑनलाइन शेअर ट्रेडिंग करणे.
मोबाईल काय करू शकत नाही हाच प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास, होमवर्क, ऍसेसमेंट सर्व व्हॉट्‌सऍप वर होऊ लागले आहे. कितीदा आपण मोबाईल विसरून ऑफिसमध्ये निघालो आणि आठवले तर परत येऊन मोबाइल घेऊन जातो. तसेच तो ऑफिसमध्ये राहिला तर बैचेन होऊन जातो. अर्थात “अति सर्वत्र वर्ज्यते’ म्हटलेले आहेच त्याचेही साइड इफेक्‍टस्‌ होत असतात असे आपण आता जाणत आहोत.म्हणूनच आजकालच्या जमान्यात आता मोबाईलला आपण ‘असून कधी कधी अडचण तर नसून बहुतेक वेळा खोळंबा’ असेच म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)