कलंदर: अप-प्रचार?

उत्तम पिंगळे

काल विसरभोळे सरांना बाजारात पाहिले, हाक मारली. ऊन वाढत होतं म्हणून म्हणालो, जरा उसाचा रस पिऊ. मग रसवाल्यापाशी बसलो.

विसरभोळे: मग काय? निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झालेली दिसते.
मी: कुठे काय? आपल्याकडे अजून म्हणावा तसा जोर पकडलेला नाही.
विसरभोळे: बरोबर आहे, आपल्याकडे अजून थोडा अवकाश आहे; पण मी एकंदरीत देशपातळीवर म्हणत आहे.
मी: हं! आता जशी निवडणूक जेथे जेथे जवळ येत आहे तसा त्याचा प्रचार वाढता आहे.
विसरभोळे: होय, पण पूर्वीची निवडणूक व आताची निवडणूक यात बराच फरक पडला आहे.
मी: हो, आता इलेक्‍ट्रॉनिक मीडिया, कॉम्प्युटर, सेलफोनमुळे इकडची माहिती तिकडे क्षणात पोहोचते.
विसरभोळे: पूर्वीच्या व आताच्या प्रचारात नव्हे तर एकूणच निवडणूक प्रक्रियेतही फरक पडलेला आहे.
मी: हो, पूर्वी त्या मोठमोठ्या पेट्या होत्या. ती मतपत्रिकेची पुस्तके, उमेदवार जास्त असेल तर ही मोठी लांबलचक मतपत्रिका, त्यात आपल्या उमेदवाराचे नाव शोधणे मोठे कष्टाचे होते.
विसरभोळे: तुम्ही फक्त भौतिक बदलाबाबत बोलत आहात. मी भौतिकबरोबर वैचारिक बदलही म्हणत आहे.
मी: म्हणजे नक्की काय ?
विसरभोळे: मला माहिती आहे, सुमारे तीस-चाळीस वर्षांपूर्वी निवडणुकीची माहिती फक्त रेडिओच्या बातम्या व वर्तमानपत्रात जास्त मिळत असे. मागं वडीलधाऱ्या मंडळींच्या रात्री गप्पा रंगत असत. मला आठवते की, आमच्या चाळीतील काही सरकारी नोकर म्हणजे ते ऑफिसमध्ये पट्टेवाले असायचे; पण मला वाटायचे की, त्यांना कितीतरी माहिती आहे.प्रचार बहुधा ट्रक व टेम्पो यातून होत असे. पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसाठी चिवडा व चहापाण्याची सोय असायची. गावागावांत प्रचार करताना पत्रके, बिल्ले वाटले जायचे.
मी: होय, मलाही आठवत आहे. पण आता प्रचार हायटेक झालेला आहे.
विसरभोळे: हायटेक झालाय; पण तो संख्यात्मक. गुणानुसार नाही.
मी: पण, आजही प्रचारसभा दणक्‍यात होतात.
विसरभोळे: आता नेते एसी गाडी शिवाय बाहेर पडत नाहीत. सार्वजनिक जाहीर प्रचार आता कमीच पडत चाललेला आहे. प्रचारही आता आउटसोर्स केला जातोय असे म्हटल्यास वावगे होणार नाही. गल्ली, वाडी वा गाव येथील म्होरक्‍याला गाठून त्याला पैसे दिले जातात. लोकांसाठी खानपान जेवणावळी तसेच प्रसंगी पैसे, दारू वाटप असेही स्वरूप काही ठिकाणी दिसत आहे. अर्थात पूर्वी असे नव्हते असे नाही; परंतु प्रमाण कमी होते. आता पैसा व त्याबरोबरच्या अनेक अनिष्ट पद्धती निवडणूक म्हटल्यावर ओघानेच येत असताना दिसतात. पूर्वी पक्षाची विचारधारा असे. त्याच अनुषंगाने पक्ष काय काय कार्य करेल, कोणती धोरणे असतील ते सांगितले जायचे. मुख्यत: समग्र विचार केला जायचा. जसे दळणवळण, महागाई, संरक्षण, बेकारी, शिक्षण यावर चर्चा होत असे. व्यक्तीश:आरोप फार कमी असत. आता तर कर्जमाफी, अनुदान अशी गरिबांना गाजरे दाखवून त्यांना आळशी बनण्याचा सर्वांनीच विडा उचललेला दिसतो. त्यांना रोजगार देऊन मोबदला द्यावा, असे कुणालाच वाटत नाही. बरं जे कोणी निवडून येणार ते त्यांच्या खिशातून थोडेच हे अनुदान देणार आहेत? बिचारे प्रामाणिक करदाते यात भरडले जाणार आहेत. प्रचाराची पातळी तर विचारूच नका. निवडणूक आयोग तसेच सुप्रीम कोर्ट यांनाही यात दखल घेऊन अमुकएक नेत्यास दोन दिवस प्रचारबंदी असा आदेश द्यावा लागत आहे. एकंदरीत उमेदवारांची प्रगल्भता कमी कमी होत जात आहे व ती त्यांच्या प्रचारातही उतरली आहे. असो, कालाय तस्मै नम:

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)