कर सवलतीत शहरी-ग्रामीण भेदभाव

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आदर्श पर्यावरण संतुलन सोसायटी बक्षीस योजनेत आता “रेटींग’ नुसार सामान्य करात सवलत दिली आहे. मात्र, शहरी व ग्रामीण भागातील सोसायटींमध्ये भेदभाव करण्यात आला आहे. या “रेटींग’ मिळवणाऱ्या शहरी भागातील सोसायटींना सामान्य करात किमान 25 टक्‍के सवलत मिळणार आहे. मात्र, ग्रामीण भागातील सोसायटीने त्याच दर्जाचे काम केल्यास त्यांना केवळ 10 टक्‍केच सवलत मिळणार आहे.

स्थायी समितीच्या येत्या मंगळवार दि. 30 ला होणाऱ्या साप्ताहिक बैठकीत हा विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. शहरात पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोसायटींना प्रोत्साहन देण्यासाठी सामान्य करात सूट देण्याची बक्षीस योजना जाहीर केली आहे. स्थायी समितीच्या 19 सप्टेंबर 2017 सभेतील ठराव क्रमांक 993 आणि 16 जून 2017 महापालिका समिती सभेच्या 84 नुसार बक्षिसाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ही योजना 2017 ते 2020 या तीन वर्षासाठी आहे. प्राप्त गुणांकनानुसार सामान्य करात सूट देण्यासाठी महापालिका दोन अधिकारी, अशासकीय संस्थेचा एक प्रतिनिधी आणि एका प्रसार माध्यमाच्या एका प्रतिनिधीच्या एका समितीची स्थापनादेखील करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बक्षिस योजना धोरणानुसार क्षेत्रीय कार्यालय निहाय सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या गृह प्रकल्पांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. मात्र, या योजनेचे यंदा पहिलेच वर्ष असल्याने याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या बक्षिस योजनेत सहभाग होणाऱ्या सोसायटींमुळे कचरा वाहतूक व विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका व अन्य शासकीय यंत्रणेवर पडणारा अतिरिक्‍त ताण काही प्रमाणात कमी होत आहे. या योजनेत सहभागी गृह प्रकल्पांना 66 पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास सामान्य करात निश्‍चित गुणांकानुसार सवलतीमध्ये बदल केले आहेत. पहिल्या गटात 12 ते 100 फ्लॅटस्‌, दुसऱ्या गटात 100 पेक्षा अधिक फ्लॅटच्या सोसायटींचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी सोसायटीला केवळ दोन वेळा पारितोषिक दिले जाणार आहे.

शहरी भागात फाईव्ह स्टार तीन सोसायटींना आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी तपासणीमध्ये शहर स्तरावरील 86 ते 100 गुणांक मिळणाऱ्या सोसायटींना किमान 15 ते 25 टक्के सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. मात्र, शहर स्तर वगळून अन्य सोसायटींनी हिच कामगिरी बजावल्यास किमान 5 तर कमाल 10 टक्के सामान्य करात सूट दिली जाणार आहे.

आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी निकष व गुणांक पुढीलप्रमाणे –
1) इमारत परिसरात 100 टक्के कचरा वर्गीकरण 30
2) पाणी संवर्धन, पाणी पुनर्चकण, पाणी पुन: वापर 20
3) सौर उर्जा प्रकल्प, एल. ई. डी. दिव्यांचा वापर 15
4)वृक्षारोपण, संवर्धन व लॅण्ड स्केपिंग 20
5) पर्यावरणपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम 15
एकूण 100

शहराचा चोहोबाजूने विस्तार होत असून “स्मार्ट सिटी’अंतर्गत अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सर्वच शहरांना पर्यावरण ऱ्हास व कचऱ्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. या प्रश्‍नी शहरातील सर्व सोसायट्या व गृहप्रकल्पांचा सक्रीय सहभाग राहिल्यास, हा प्रश्‍न सोडविण्यास खऱ्या अर्थाने सहकार्य होणार आहे. ही योजनेत यशस्वी करायची असल्यास शहरी, ग्रामीण भागातील सोसायट्या व गृहप्रकल्प असा भेदभाव महापालिका प्रशासनाने करू नये.
निखिल मुनोत, पर्यावरण तज्ज्ञ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)