कर वसुली, बेशिस्त वाहतूक अन्‌ अतिक्रमण आता रडारवर

महापालिकेची लवकरच धडक कारवाई
नगर – सीनानदी पात्रातील अतिक्रमण हटविण्याची धडक मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता थकीत कर वसुली, शहर स्वच्छता, बेशिस्त वाहतूक व अनधिकृत बांधकामासह अतिक्रमणे रडारवर आली आहे. याबाबत लवकरच कारवाई सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी दिले.
याबाबत नगररचना, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण विरोधी पथकाला माहिती संकलित करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. द्विवेदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध यंत्रणा प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त प्रदीप पठारे, नगररचनाकार संतोष धोंगडे, बांधकाम विभागाचे विलास सोनटक्के, प्रकल्प विभागाचे प्रमुख मेहेत्रे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी पैठणकर, मुख्य लेखा अधिकारी मानकर, कर संकलन अधिकारी कैलास भोसले यांच्यासह चारही प्रभाग समित्यांचे प्रभाग अधिकारी, करनिरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
द्विवेदी यांनी चारही प्रभाग अधिकाऱ्यांकडून कर थकबाकीवसूलीचा आढावा घेतला. ज्यांच्याकडे जास्त प्रमाणात थकबाकी आहे, त्यांच्याकडून ती तातडीने वसूल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रभागनिहाय अधिकाऱ्यांना कर वसुलीचे उद्दिष्टे देण्यात आली असून ते उद्दिष्टे पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. महापालिकेमार्फत नागरिकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर, विकासकामे करण्यासाठी कर वेळेवर भरणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अशा थकबाकीदारांकडून वसुलीची कार्यवाही करा.गेल्या 12 दिवसांत महापालिकेकडे केवळ 1 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. संबंधित बड्या थकबाकीदारांना नोटीसा दिल्या असतील तर जप्तीची कार्यवाही सुरु करा, असे आदेश त्यांनी दिले.
महापालिका अधिकाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, यासंदर्भात कोणताही दबाव घेण्याची गरज नाही. कायद्याप्रमाणे कार्यवाही करा,असे द्विवेदी म्हणाले. पुढील 15 दिवसांत थकबाकी वसुलीचे प्रमाण प्रत्येक प्रभागात वाढले पाहिजे. दरम्यान, शहरात विविध ठिकाणी पे एँड पार्क, नो पार्कींग, पार्किंग झोन करण्यात येणार आहेत. यासंदर्भात अधिकाधिक नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी आणखी 10 दिवसांची मुदत देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहिर केले.
शहरात बेशिस्त वाहतूकीमुळे कोंडीला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूकीला चाप बसण्यासाठी यापुढे कारवाई केली जाणार आहे. तसेच अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे देखील हटविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकामाला तशा सुचना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी शहर स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी धडक कार्यवाही करा. शहर स्वच्छतेचे काम सफाई कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित करुन घेण्याबरोबरच नागरिकांनी रस्त्यावर किंवा मोकळ्या ठिकाणी कचरा टाकला आणि शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न केला तर अशा नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. ठिकठिकाणी असणारे अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाका, दुकांनाच्या बाहेर कचरा पेट्या ठेवण्याबाबत संबंधित दुकानदारांना सूचना द्या. असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)