कर्वे रस्त्यावर उद्यापासून वाहतूक बदल चाचणी

– मेट्रोच्या कामासाठी दोन पर्यायांची होणार तपासणी

पुणे – वनाज ते धान्य गोदाम मेट्रोमार्गात नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यासाठी शनिवारी रात्रीपासून कर्वे रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यासाठी दोन पर्याय समोर आले असून प्रत्येक पर्यायाची प्रत्येकी दोन ते तीन दिवस चाचणी घेणार असल्याची माहिती या मेट्रो मार्गाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी शुक्रवारी दिली.

कर्वे रस्त्यावरील मेट्रो मार्गासह अभिनव चौक आणि नळस्टॉप चौकात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो आणि इतर वाहतुकीसाठीचा दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. तो एसएनडीटी महाविद्यालयापासून पुढे जाणार असल्याने येथील मेट्रो स्टेशन आणि या दुमजली उड्डाणपुलाचे काम एकाच वेळी सुरू केले जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोने वाहतूक पोलिसांची परवानगी मागितली होती. ती मिळाली आहे.

मात्र, ही चक्राकार वाहतूक केल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन येत्या मंगळवारी वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते या महामेट्रो आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी केली असून या रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करून चक्राकार वाहतूक, अथवा आहे त्याच मार्गावर बॅरिकेड लावून वाहतूक सुरू ठेवण्याचे पर्यायही मेट्रोने दिला आहे.

त्यानुसार, या दोन्ही पर्यायाची चाचपणी उद्यापासून केली जाणार असल्याचे गाडगीळ म्हणाले. तसेच या दोन्ही वाहतूक बदलाच्या प्रयोगानंतर अंतिम पर्यायाची निवड वाहतूक पोलिसांकडूनच केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

पर्याय क्र. 1- चक्राकार वाहतूक
महामेट्रोने नियोजन केलेली ही चक्राकार वाहतूक कर्वे रस्त्याकडून डेक्कनकडे येणाऱ्या वाहनांसाठी असेल. त्यानुसार, कर्वे रस्त्यावरून पुढे आलेली वाहने एसएनडीटी महाविद्यालायच्या समोरून विधि महाविद्यालय रस्त्यावरील आठवले चौकात येतील. तेथून वळसा घेऊन ही वाहने पुन्हा अभिनव चौकात कर्वे रस्त्यावर येतील. ही वाहतूक वळविल्यानंतर एसएनडीटी महाविद्यालय ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे. तर डेक्कनकडून कर्वे रस्त्याने तसेच पुढे पौड रस्त्यावर जाणारी वाहतूक नियमितपणे सुरू राहिल.
 

पर्याय क्र. 2- आहे त्या मार्गावर बॅरिकेड
यापूर्वी राबविलेल्या चक़्राकार वाहतुकीस विरोध झाल्याने तसेच पाहणीवेळी या भागातील स्थानिकांनीही त्यास नकार दिल्याने महामेट्रोने सध्याच्या रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी साडेआठ मीटरचे बॅरिकेडिंग करून उर्वरीत रस्त्याने वाहतूक कायम ठेवावी, असेही सूचविण्यात आले आहे. त्याचीही चाचपणी पोलीस करणार आहेत. त्यासाठी तात्पुरते बॅरिकेडिंग पोलीसच करणार असल्याने गाडगीळ यांनी स्पष्ट केले. मात्र, मेट्रोच्या कामामुळे उर्वरीत रस्ता काही ठिकाणी 7 तर काही ठिकाणी 5 मीटरचा राहणार आहे. त्यामुळे हा पर्याय मान्य झाल्यास या रस्त्यावरील पदपथ कमी करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)