कर्मयोगिनी पंडिता रमाबाई

माधुरी तळवलकर

रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती समाजामध्ये जेवढी आहे, तेवढे पंडिता रमाबाईंविषयी फारसे बोलले जात नाही. खरे तर त्यांचे कार्य फार व्यापक आणि काळाच्या पुढे जाणारे होते. पंडिता रमाबाईंचा जन्म 23 एप्रिल 1808 रोजी झाला. एकोणिसाव्या शतकातील स्त्री-सुधारणा चळवळीवर ज्यांनी महत्त्वाचा ठसा उमटविला, त्यांमध्ये पं.रमाबाईंचे स्थान महत्त्वाचे आहे. आईवडिलांच्या मृत्यूनंतर पं.रमाबाईंनी भावासमवेत खूपदा वादळवाऱ्याला तोंड देत, उपासतापास काढत, मैलोगणती म्हणजे चार हजार मैल चालत भणंग आयुष्य काढले. वाटेत त्या प्रवचने देत, लोकांचे प्रबोधन करीत. त्यांचे संस्कृतातले अठरा हजार श्‍लोक पाठ होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्त्रियांच्या उद्धारांच्या योजनांसाठी भारतातून मदत मिळाली नाही म्हणून परदेशातून भरघोस साहाय्य रमाबाईंनी मिळवले. अविकसित देशाच्या उन्नतीसाठी परकी देशांकडून मदत मिळवण्याची कल्पना पहिल्यांदा म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी पं.रमाबाईंनी अंमलात आणली. सनातन्यांचा विरोध पत्करून शारदा सदन शाळेची त्यांनी स्थापना केली. स्त्रीचे वस्तूमूल्य त्यांनी नाकारले. स्त्रीपुरुषांना समान प्रतिष्ठा व हक्क मिळण्यासाठी स्त्रीसंघटनांची आवश्‍यकता त्यांनी लक्षात आणून दिली. कुतुहलाने त्यांच्या व्याख्यानाला पुरुष एकटे जात. पण आपले विचार स्त्रियांपर्यंत पोचावेत म्हणून त्यांची पुरुषांना अट असे की, प्रत्येक पुरुषाबरोबर घरातील एक तरी स्त्री हवी.

पंडिता रमाबाईंची कुशाग्र बुद्धिमत्ता, तळमळीची ध्येयासक्‍ती व प्रभावी व्यक्‍तिमत्त्व ह्यामुळे देश-परदेशातील माणसे भारावून जात. त्यांच्या मागणीवरूनच मुलींचे पहिले हायस्कूल हुजूरपागा सुरू झाले. लेडी उफरीन फन्ड स्थापन करून पं.रमाबाईंनी स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.

केडगावला शंभर एकरांचा बरड माळ होता. तिथे त्यांनी विहिरी खोदल्या. आश्रमाच्या जमिनीतली शेती, बागा बहरू लागल्यावर रमाबाई मुलींकरवी आपला माल विकू लागल्या. लोहारी, सुतारी, गवंडीकामे, खोदकामे, हातमाग, छपाई, व्यवस्थापन, हिशोब ही सर्व कामे मुली व स्त्रियाच करीत होत्या.

शारदासदनातील रहिवाशांची अखंड उद्यमशीलता आणि शिस्तबद्धतेने चाललेले उद्योग पाहून देशीपरदेशी पाहुणे तोंडात बोटे घालीत. या मिशनमधल्या हातमागावरील वस्त्रेच रमाबाईंसकट सर्वजण नेसत. खादीचा हा प्रयोग गांधीयुगाच्या कितीतरी अगोदर पं.रमाबाईंनी केलेला दिसतो. धान्य, तेल, भाजीपाला, दूधदुभते सर्व सुबत्ता त्यांनी स्वतः कमावलेली होती. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पं.रमाबाई सरकारी ऑर्डरी घेऊन त्यांना माल पुरवीत असत. जीआयपी रेल्वेतील गार्ड, पोर्टर वगैरेंच्या बॅजेस वगैरेची ऑर्डर त्या पुरवीत. कुटिरोद्योग व स्त्री-उद्योजकता प्रथम त्यांनी सुरू केली. त्यांचे कर्तृत्व पाहून एका ब्रिटिश नागरिकाने म्हटले, “एक भारतीय रेजिमेंट सांभाळायला दोन कर्नल, ले.कर्नल, अनेक मेजर, कॅप्टन, लेफ्टनन्ट्‌स लागतात आणि इथे ही एकाकी स्त्री, जातधर्मवयभाषा वगैरे दृष्टीने भिन्न, दरिद्री, असंस्कारित, गांजलेले असे दोन हजार लोक घेऊन शिस्तशीरपणे संस्थेचे व्यवस्थापन सहजपणे करते, हा जगातील प्रत्येक स्त्रीपुरुषाला मोठा आदर्श आहे.’

आपल्या सुधारणेची व्याप्ती त्यांनी दलित, शोषित जनतेपर्यंत नेली. मध्यप्रदेश, गुजराथ येथे भीषण दुष्काळ पडला, तेव्हा स्वतः चा जीव धोक्‍यात घालून खडतर प्रवास करून त्या तिथे गेल्या. हाडांचे सांगाडे झालेल्या हजारो रोगी, अपंग, निराश्रित स्त्रियांना घेऊन त्या इथे महाराष्ट्रात आल्या. त्यांची सर्व प्रकारची सेवा करून त्यांना वाचविले. रमाबाईंचा लढा मानवमुक्‍तीच्या दिशेने, सर्व व्यक्‍ती समान ह्या धोरणाने चालला. त्यामुळेच त्यांनी भारतातील अंधांची पहिली शाळा काढली. म्हाताऱ्या, दुबळ्या स्त्रियांसाठी प्रीतीसदन सुरू केले. प्रथमपासूनच जरा धीट असलेल्या मराठी स्त्रीला अधिक धीट करण्याचे श्रेय अव्वल इंग्रजी काळातील लोकहितवादी, फुले वगैरे सुधारकांइतकेच रमाबाईंनाही द्यावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)