कर्मभोग

सत – असत

आसुमल हा कोण होता कोठून आला? हे सुरुवातीला कोणालाच माहित नव्हते. कोणी म्हणायचे, तो हिमालयातून आला, तेथे त्याला सिद्धी प्राप्त झाली तर कोणी म्हणायचे तो साक्षात ईश्‍वराचा अवतार आहे आणि भक्तांसाठी अवतार घेतलेल्या ईश्‍वराचे मूळ स्थान विचारायचे असते का ? आसुमलचे डोळे मात्र जबरदस्त होते, कोणी म्हणायचे तो हिप्नोटॉइज करतो तर कोणी म्हणायचे त्याच्या डोळ्यातच तेवढी जरब आहे. मात्र पाहता पाहता आसुमलने आपल्या भगतगणांचा परिवार वाढविला.

-Ads-

अनेक ठिकाणी जमिनी खरेदी करून आपले स्वतंत्र आश्रम स्थापन केले. प्रवचनांनिमित्त तो आश्रमाला भेटी द्यायचा त्यावेळी त्याच्या भक्‍तगणांत कमालीचा उत्साह संचारायचा. त्याच्या दर्शनासाठी तोबा गर्दी व्हायची. त्याचे दर्शन सहज आणि सुलभ व्हावे म्हणून पैशाची ‘बोली’ही व्हायची. त्यामुळे साहजिकच आसुमलकडे अल्पावधीतच प्रचंड माया जमा झाली. त्याच्या जोरावर त्याने आपल्या अनेक आश्रमात आलिशान ‘मोक्षकुटी’ उभारल्या.

सत्संग मेळाव्यातील आपल्या प्रवचनात आसुमल प्रामुख्याने कर्मयोगावर बोलायचा. ‘जैसी करनी वैसी भरनी ‘ असे तो आपल्या भक्‍तजनांना नेहमी सांगायचा. जणू काही आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना जशी गीता सांगितली तसाच ‘उपदेश’ तो आपल्या भक्तांना करायचा. आणि भक्‍तजनांनाही त्याचा हा उपदेश फार आवडायचा.

सत्संग मेळाव्यासाठी आलेल्या महिला भक्‍तांकडे मात्र त्याचे विशेष लक्ष असल्याचे अनेकांना जाणवायचे. अधिक पसंत पडलेल्या महिला भक्‍तांना ‘मोक्ष’ देण्यासाठी तो त्यांना ‘मोक्षकुटी’त घेऊन जायचा. त्या महिलाही ‘मोक्षप्राप्ती’साठी काहीही करून घ्यायला तयार असत. शिवाय आपण ‘ब्रम्हज्ञानी’ आहोत आणि ‘ब्रम्हज्ञानी’ ने केलेले कसलेही वर्तन हे ‘पाप’ असूच शकत नाही अशी त्याने आपल्या भक्तांना आधीच शिकवण देऊन ठेवली होती.

नंतर नंतर आसुमलला महिलांना ‘मोक्ष’ देण्याचा कंटाळा येऊ लागला.आश्रमात काही महिलांबरोबर आलेल्या बालिकांना जर आपण ‘मोक्ष’ दिला तर आपले ‘ब्रम्हतेज’ आणखी वाढेल म्हणून त्याने काही बालिकांनाही ‘मोक्षप्राप्ती’ देऊ केली. मात्र एक बालिका खंबीर निघाली. तिला आसुमलने ‘मोक्षप्राप्ती’साठी केलेली जबरदस्ती आवडली नाही. तिने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊ नये म्हणून आसुमलने त्यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली त्यांना धमक्‍याही दिल्या. मात्र पोलीस अधिकारी त्याला बधले नाहीत. कारण त्यांचाही ‘कर्मयोगा’वर विश्‍वास होता. ‘जैसी करनी वैसी भरनी ‘ हे आसुमल आपल्या भक्तजनांना सांगत असणारे ‘वचन’ त्यांना सिद्ध करून दाखवयाचे होते.

पोलिसांनी आसुमलला अटक करून त्याच्यावर खटला भरला आणि न्यायालयानेही आसुमलला जन्मभर तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली. एका परीने न्यायमूर्तीसाहेबांनी आसुमलचीच इच्छा पूर्ण केली असे म्हणावे लागेल कारण मागे एकदा केंव्हा तरी आसुमलने आपल्या प्रवचनात ”मलाही तुरुंगात जावेसे वाटते, तेथील जीवन कसे असते हे मला अनुभवायचे आहे” असे सांगितले होते. आसुमलच्या ‘कर्मयोगा’चे अशा पद्धतीने ‘कर्मभोगा’त रूपांतर झाले.

…आणि आता आम्हाला मिळालेल्या खास माहितीनुसार आसुमल तुरुंगातील कैद्यांसमोर ‘कर्मयोगा’ ऐवजी ‘कर्मभोगा’वर प्रवचन करत असतो म्हणे.

– सत्यश्री

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)